`सेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी पालिका निवडणुकाही एकत्र लढवाव्यात` - sena, congress and ncp should contest local bodies elections together suggests Sanjay Raut | Politics Marathi News - Sarkarnama

`सेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी पालिका निवडणुकाही एकत्र लढवाव्यात`

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

तीनही पक्षांत समन्वय असल्याचा दावा....

पुणे : मुंबईच नव्हे; तर आगामी काळात पुणे आणि पिंपरी चिंचवड या महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुका आगामी काळात आहेत. सध्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस हे तीन पक्ष एकत्र सरकार चालवत आहे. त्यांच्यात समन्वय चांगला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तीन पक्षांनी एकत्र येऊन लढविणे राज्याच्या हिताचे आहेत, असे सांगत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकत्रित लढविण्याचे सूतोवाच पुण्यात पत्रकारांशी बोलताना केले.

भाजपवर टीका करताना ते म्हणाले, ""नवीन सरकार पुढे आव्हाने निर्माण करण्याचे काम विरोधी पक्ष करीत आहे. पण राज्यात किंवा केंद्रात आपले विरोधक असूच नये, त्यांना राजकारणात वा समाजकारणात राहण्याचा अधिकार नाही, अशी वृत्ती वाढली आहे. हा राजकीय दहशतवाद देशाला घातक आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नेते आहेत. राष्ट्रीय स्तरावरील नेता होण्याची क्षमता आहे. आम्ही त्यांचा सन्मानच केला. पण त्याचे मुख्यमंत्रीपद गेल्याने ते धक्का पचवू शकले नाही. पण कुणी सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेले नाही.''

उर्मिला मातोंडकरबाबत मौन
उर्मिला मातोंडकर यांना विधान परिषदेची शिवसेनाकडून उमेदवारीबाबत राऊत म्हणाले, ""मीही चर्चा ऐकली आहे. परंतु परिषदेच्या बारा जागांवर मंत्रिमंडळात चर्चा होईल. तीन पक्ष त्या नावांवर निर्णय घेतलीे आणि मुख्यमंत्री ही नावे राज्यपालांकडे पाठवतील, त्यानंतर नावे समजतील.''

राज्याचे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचे प्रश्‍न घेऊन राज्यपालांना भेटणे, हाच महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका त्यांनी राज ठाकरे यांच्या राज्यपाल भेटीबाबत केली.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. या विषयी राजकारण करून वातावरण तापवू नये. हा विषय केंद्राच्या अख्त्यारित आहे, त्यात पंतप्रधानांनी लक्ष घातले पाहिजे. साताऱ्याचे उदयनराजे भोसले आणि कोल्हापूरचे संभाजी राजे दोघे भाजपचे नेते आहेत. या दोन्ही राजांनी हा विषय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरबारात घेऊन जावा. त्यांच्या नेतृत्वाखाली हा विषय सुटला, तर कुणाला वाईट वाटणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख