पुण्यातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार  - Schools in Pune will remain closed till December 13 : Mayor Murlidhar Mohol | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्यातील शाळा 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार 

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

तत्कालीन परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

पुणे : पुणे शहरातील खासगी आणि महापालिकेच्या शाळा येत्या 13 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी (ता. 21 नोव्हेंबर) दिली. 

येत्या सोमवारपासून म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून मुंबई आणि ठाणे वगळता राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा बंदच राहण्याची शक्‍यता आहे.

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्‍यता आरोग्य विभागाकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पुण्याचे महापौर मोहोळ यांनीही येत्या 13 डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

येत्या 13 डिसेंबर रोजी कोरोना महामारीच्या स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर पालकांशी चर्चा करून आणि तत्कालीन परिस्थिती पाहून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे महापौर मोहोळ यांनी या वेळी सांगितले. तोपर्यंत पुणे शहरातील महापालिकेच्या सर्व आणि खासगी शाळाही बंदच ठेवण्यात येणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले. 

दरम्यान, राज्य सरकारने मुंबई आणि ठाणे वगळता राज्यातील इतर शाळांमधील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याची अंमलबजावणी करणे अवघड दिसत आहे. कारण, शाळा सुरू करण्यापूर्वी करण्यात येत असलेल्या चाचण्यांमध्ये अनेक शिक्षकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याच्या सरकारच्या निर्णयावर प्रश्‍नचिन्ह लागले होते.

शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारीच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची चिंता मात्र वाढली आहे 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख