बिहार निवडणुकीत संजय राऊतांचा कौल तेजस्वी यादवांना - Sanjay Raut's vote for Tejaswi Yadav in Bihar elections | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

बिहार निवडणुकीत संजय राऊतांचा कौल तेजस्वी यादवांना

उमेश घोंगडे
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

जनमताचा अंदाज कुणालाही येत नाही.

पुणे : जनमताचा अंदाज कुणालाही येत नाही. बिहार निवडणुकीत तेथील कदाचित राष्ट्रीय जनता दलाला बहुमताने निवडून देईल तसेच तेजस्वी यादव मुख्यमंत्री होतील, असे सांगत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या यशाबाबत आशावाद व्यक्त केला.

पुण्यात बोलताना, राऊत यांनी बिहार निवडणुकीवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘‘ लोकांच्या मनात काय आहे याचा अंदाज सहजाजहजी येत नाही. बिहार निवडणुकीकडे देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडे साऱ्यांचेच लक्ष आहे. ही निवडणूक योग्य वातावरणात पार पडली तर निकाल वेगळे लागू शकतात. तेजस्वी यादवसारखा तरूण नेता एकाकी लढतोय.

भलेही त्याच्या घरातील सदस्य तुरूंगात असतील. मात्र, बिहारच्या जनतेकडून त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे निकालानंतर तेजस्वी यांच्या नेतृत्व बिहारला लाभू शकते.’’

बिहारमध्ये विद्यमान मुख्यमंत्री नितीशकुमार व भारतीय जनता पक्षाची युती आहे. लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान स्वतंत्रपणे लढत आहेत तर लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचे नेतृत्व त्यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्याकडे आहे. लालूप्रसाद यादव सध्या तुरूंगात आहेत. त्यामुळे राष्ट्रीय जनता दलाचे नेतृत्व तेजस्वी यांच्याकडे आहे.

भाजपा व नितीशकुमार विरूद्ध तेजस्वी व चिराग अशी बिहारची निवडणूक संध्या रंगात आहे. या निवडणुकीत ‘एमआयएम’मुळे विभागणी होणाऱ्या मुस्लीम मतांचा फटका कॉंग्रेस व काही प्रमाणात तेजस्वी यादव यांना बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

चिराग यांच्या लोक जनशक्ती पक्षाचा फटका नितीशकुमार यांना बसेल, असे सांगण्यात येत आहे. मतदानाचा अंदाज घेतला असता या निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल व भारतीय जनता पार्टी हे दोन पक्ष म्हणून फायद्यात राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भाजपा व नितीशकुमार मिळून पुन्हा एकदा संयुक्त सरकार स्थापन करण्याची शक्यता अधिक असली तरी नितीशकुमार यांच्या जागा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

तेजस्वी यादव यांना एमआयएममुळे फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असली तरी गेल्यावेळची आमदारांची संख्या ते निश्‍चितपणे कायम राखतील, असे त्यांना मिळणाऱ्या प्रतिसादावून दिसत आहे. बिहारमधली सध्याची ही राजकीय स्थिती असली तरी खासदार राऊत यांनी व्यक्त केलेला आशावाद सत्यात उतरतो की नाही हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख