राज्यपालांना भेटणारे महाराष्ट्राचा अपमान करताहेत : संजय राऊत - Sanjay Raut said Government stable No need to worry | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यपालांना भेटणारे महाराष्ट्राचा अपमान करताहेत : संजय राऊत

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 31 ऑक्टोबर 2020

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कॉंग्रेसच्या खंबीर पाठिंब्यावर उभी आहे. हे सरकार उर्वरित चार वर्षांचा कार्यकाळ अत्यंत चांगल्या प्रकारे पूर्ण करणार आहे. 

पुणे : विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी राज्य सरकारकडे जाण्याऐवजी राज्यपालांकडे जाणारे लोक महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत, अशी टीका शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज केली. विजेच्या बिलासारखा प्रश्‍न घेऊनही लोक राज्यपालांना भेटत आहेत असा उल्लेख करून त्यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावरही टीका केली.

विविध प्रश्‍नांवर राजकीय मंडळी सध्या राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी भेट घेत आहेत. प्रश्‍नांच्या सोडवणुीकसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा सल्ला देण्याऐवजी राज्यपाल हे शरद पवार यांना भेटण्याची सूचना करीत आहेत. यामागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सक्षम नाहीत हे राज्यपालांना सिद्ध करायचे आहे का? तसेच हा मुख्यमंत्रीपदाचा अवमान नाही का ? या प्रश्‍नावर राऊत यांनी सविस्तर उत्तर दिले

प्रश्‍नांच्या सोडवणुकसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याऐवजी राज्यपालांकडे जाणारे लोक उलट महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत, असे राऊत यांनी सांगितले.

पुण्यात बोलताना खासदार राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ‘‘ राज्याला जबाबदार विरोधी पक्षाची गरज आहे. सरकारला सत्तेत येऊन एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला आहे. त्यामुळे सरकार पडण्याची वाट न पाहता आता तरी जबाबदार विरोधी पक्ष म्हणून भाजपाने भूमिका बजावण्याची गरज आहे.

आपल्या विरोध करणाऱ्याला त्रास देण्याची भूमिका घेण्याचे सध्याचे देशातील राजकीय वातावरण आहे. मात्र, लोकशाहीवर विश्‍वास असलेल्या शिवसेनेला जबाबदार व खंबीर विरोधी पक्ष हवा, असे वाटते. विरोधी मताची आम्ही नेहमीच आदर करतो. त्यामुळे भाजपाने आतातरी सत्ते येण्याचे स्वप्न सोडून देऊन चांगला विरोधी पक्ष म्हणून काम करावे.’’

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कॉंग्रेसच्या खंबीर पाठिंब्यावर उभी आहे. हे सरकार उर्वरित चार वर्षांचा कार्यकाळ अत्यंत चांगल्या प्रकारे पूर्ण करणार आहे. त्यामुळे सरकारच्या स्थिरतेबाबात कुणीही चिंता बाळगण्याची गरज नाही.

कोरोनाच्या असाधारण परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत कुशलतेने जबाबदारी पार पाडली आहे. देशातील इतर राज्यांची तुलना केली तर आपल्या राज्यात कारोनोचा मुकाबला करण्यासाठी सरकारच्या पातळीवर अत्यंत चांगली काळजी घेण्यात आल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर शिवसेनेच्यावतीने विधानपरिषदेवर जाणार का असे विचाराले असता त्यांनी या प्रश्‍नाला बगल देत जोपर्यंत मुख्यमंत्री बंद लिफाफ्यात १२ जणांची नावे पाठवत नाहीत, तो पर्यंत अशाप्रकारच्या चर्चा होत राहणार असे त्यांनी सांगितले. भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत विचारले असता, या संदर्भातील कोणतीही माहिती आपल्याकडे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख