तुम्ही व्यापाऱ्यांना फटकवा; मी त्यांचे लायसन्स रद्द करतो  - Sanjay Kale, Chairman, Junnar Market Committee, warns traders against lowering tomato prices | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

तुम्ही व्यापाऱ्यांना फटकवा; मी त्यांचे लायसन्स रद्द करतो 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 18 जून 2021

त्या व्यापाऱ्याचे लायसन्स रद्द केले जाईल.

पुणे  ः उत्तर भारताला उन्हाळी हंगामात सर्वाधिक टोमॅटो पुरवठा करणाऱ्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव उपबाजार समितीमध्ये आज (ता. १८ जून) टोमॅटोचे बाजारभाव व्यापाऱ्यांनी पाडल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. आंदोलनात थेट जुन्नर बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनीच आंदोलनात सहभाग घेत तुम्ही व्यापाऱ्यांना फटकवा. मी व्यापाऱ्यांचे लायसन्स रद्द करतो, असे सांगून त्यांनी व्यापाऱ्यांना इशारा दिला. दरम्यानच्या काळात नारायणराव उपबाजार समितीत मोठा गोंधळ पहायला मिळाला. (Sanjay Kale, Chairman, Junnar Market Committee, warns traders against lowering tomato prices)
 
शेतकरी आज सकाळी जेव्हा टोमॅटो घेऊन विक्रीसाठी नारायणगाव उपबाजार समितीत आले, तेव्हा 20 किलोच्या क्रेटला एकशे पन्नास ते एकशे साठ रुपये प्रतिक्रेट बाजारभाव होता. परंतु व्यापाऱ्यांनी संगनमत करून हा बाजारभाव क्रेटसाठी वीस ते तीस रुपये केल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यानंतर शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. या वेळी सभापती संजय काळे यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविला. शेतकऱ्यांची पिळवणूक करण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांनी केल्यास त्या व्यापाऱ्याचे लायसन्स रद्द केले जाईल, असेही सभापती काळे यांनी या वेळी स्पष्ट केले. 

हेही वाचा : भरणेंचे पालकमंत्रिपद घालविण्याचा प्रयत्न करणारांचा होणार करेक्ट कार्यक्रम
 

व्यापारी जर शेतकऱ्यांची लुबाडणूक करत असतील, तर अशा व्यापाऱ्यांना फटकावा, असेही सभापती काळे हे आवेशात बोलून गेले. विशेष म्हणजे एकदा, दोनदा नाही तर तब्बल तीन वेळा ते तावातावाने असेच बोलले. त्याला शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. या वेळी संजय काळे यांनी सर्व बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना आदेश दिले की आजपासून सर्व कर्मचारी बाजार समितीमध्ये तैनात राहतील. जर व्यापाऱ्यांनी भाव पाडले आणि शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली, तर व्यापाऱ्यांवर कारवाई करून त्यांचे लायसन्स रद्द करू, असा इशारा दिला. या सर्व परिस्थितीत काही काळ बाजार समितीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

त्यावेळी बाजार समिती कारवाई का करत नाही?

उत्तर भारतामध्ये सर्वाधिक टोमॅटो नारायणगाव मार्केटमधून निर्यात होतात, त्यासाठी उत्तर प्रदेश, दिल्ली या परिसरातून दरवर्षी पाचशे ते हजार व्यापारी टोमॅटो खरेदीसाठी येत असतात. मात्र, बाजार समितीच्या सभापतीनेच जर शेतकऱ्यांना चिथावणी दिली, तर व्यापारी तिकडे काणाडोळा करतील आणि पर्यायाने त्याचा परिणाम शेतकऱ्यांनाच भोगावा लागेल. या ठिकाणी खरेदी होणारा टोमॅटो बाहेरील व्यापाऱ्यांनी खरेदी केला नाही, तर पर्यायाने शेतकऱ्यांना मोठे नुकसान होईल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीच्या सभापतीने असे चिथावणीखोर वक्तव्य करणे कितपत योग्य आहे, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे? दरम्यान, व्यापारी सातत्याने बाजारभाव पाडतात, त्यावेळेस बाजार समिती कारवाई का करत नाही, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख