शरद पवारांचे पहिले मुख्यमंत्रिपद...आणि संभाजीराव काकडे....

या निवडणुकीत पवारांनी संभाजीराव काकडे यांचे काम केले.
Sambhajirao Kakade's important role in making Sharad Pawar Chief Minister
Sambhajirao Kakade's important role in making Sharad Pawar Chief Minister

सोमेश्वरनगर (जि. पुणे) :  वसंतदादा पाटील यांचे सरकार १९७८ मध्ये उलथून टाकण्यात आले. त्यानंतर शेकाप व जनता पक्षाने पाठींबा दिलेल्या पुलोद आघाडीचे राज्यात सरकार सत्तेवर आले. त्यावेळी मुख्यमंत्रिपदी शरद पवार (Sharad Pawar) यांना निवडण्यामध्ये संभाजीराव काकडे (Sambhajirao Kakade) यांचा मोलाचा वाटा मानला जातो. कारण, त्यावेळी शंकरराव चव्हाण यांचेही नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आले होते. पण, आणीबाणीतील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना जनता पक्षाकडून विरोध झाला. त्यानंतर पुढे आलेल्या पवारांच्या नावाला काकडेंसह जनता पक्षाकडून पाठिंबा देण्यात आला. (Sambhajirao Kakade's important role in making Sharad Pawar Chief Minister)


माजी खासदार व समाजवादी नेते संभाजीराव (लाला) काकडे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. निंबुत (ता. बारामती) येथील सहकारमहर्षी (कै.) मुगुटराव काकडे व सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष (कै.) बाबलाल काकडे, राज्य पणन महामंडळाचे उपाध्यक्ष शामकाका काकडे यांचे ते बंधू होते. ज्येष्ठ बंधूंच्या ग्रामीण राजकारणात लालांनी रस न घेता वरीष्ठ पातळीवर काम केले.

सुरुवातीला त्यांनी पुणे जिल्हा सहकारी औद्योगिक सोसायटीचे महाव्यवस्थापक म्हणून पुणे शहरात काम केले. त्यावेळी पानशेत, वरसगाव, कुकडी धरणग्रस्तांसाठींचे आंदोलन अथवा दुर्गम भागातील वाहतूक सुविधांसाठीचे आंदोलन केले. ते पाहून तत्कालिन नेते मालोजीराजे निंबाळकर यांनी काँग्रेसमधून फुटलेल्या संघटन काँग्रेसचे त्यांना जिल्हाध्यक्ष केले. लालांनी या पक्षाचे अधिवेशन शनिवारवाड्यासमोर मोरारजीभाई देसाई यांच्या उपस्थितीत घेऊन संघटनकौशल्य दाखवून दिले. पुढे जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे यांच्यासोबत देशातील समाजवादी चळवळीत वाढले. माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग, चंद्रशेखर हे त्यांचे जवळचे मित्र, तर मोरारजी देसाई यांचे तर ते मानसपुत्रच होते.  

पवारांसाठी स्वतःचा प्रचार बाजूला ठेवला


पुलोद आघाडीकडून १९८४ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार हे बारामतीतून, तर जनता पक्षाकडून संभाजीराव काकडे हे खेडमधून (आताचा शिरूर मतदारसंघ) लढले होते. त्या निवडणुकीत स्वतःचा प्रचार बाजूला ठेवून काकडे यांनी पवारांना मदत करत शिरूर, दौंड, पुरंदर पिंजून काढले होते. त्या निवडणुकीत शरद पवार निवडून आले. पण, खेड मतदारसंघातून संभाजीराव काकडे हे १८ हजार मतांनी पराभूत झाले. त्या निवडणुकीत रामकृष्ण मोरे निवडून आले होते. 

काकडे-पाटील जय-पराजय

दरम्यान, एकच वर्षात शरद पवार यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्या जागेवर संभाजीराव काकडे यांनी दावेदारी केली. या निवडणुकीत पवारांनी संभाजीराव काकडे यांचे काम केले. त्यामुळे इंदापूरचे शंकरराव पाटील यांना ४९ हजार मतांनी पराभूत व्हावे लागले. पाटलांना पराभूत करत काकडे दुसऱ्यांदा खासदार बनले. त्यापुढे १९८९ मध्ये मात्र जनता दलाकडून काकडे पुन्हा बारामती लोकसभेसाठी उभे राहिले. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार शंकरराव पाटील यांच्या बाजूने ताकद पणाला लावली. परिणामी ६९ हजार मतांनी काकडे यांचा शंकरराव पाटील यांच्याकडून पराभव झाला. यानंतर लाला शेवटपर्यंत पवारांचे कडवट राजकीय टीकाकारच राहिले.  


निवडणुका सोडून चळवळीत सक्रीय 

विधानसभा लढवायची इच्छा नसताना लालांनी जनता दलाकडून १९९० बापूसाहेब थिटे यांच्या विरोधात आमदारकीची निवडणूक लढविली. त्यात त्यांचा पराभव झाला. पुन्हा १९९४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. जनता पक्षही आक्रसत गेला, त्याची शकले झाली आणि हिंदुत्ववादी राजकारणाने महाराष्ट्र ढवळून काढला. त्यामुळे लालांनी निवडणुका न लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, जनता दलाने त्यांना राज्यसभेवर पाठवायचे ठरविले. परंतु ऐन मतदानावेळी कम्युनिस्ट पार्टीचा उमेदवार रेल्वेस अडथळा आल्याने वेळेत पोचू शकला नाही आणि अर्ध्या मतांनी लालांचा पराभव झाला. यानंतर लालांनी दूध, कांदा यासाठी आंदोलन केले. विशेषतः एन्रॉनविरोधी आंदोलनात ते जास्त सक्रीय होते. आदिवासींसाठी हिरडा सहकारी संस्थेची स्थापना त्यांनी केली. रावसाहेबदादा पवार यांना घोडगंगा साखर कारखाना उभारणीत मोलाचे सहाय्य केले. मुंबई बाँबस्फोट, बाबरी मशीद विध्वंस या प्रकारांनी ते व्यथित व्हायचे. 

खुद्द यशवंतरावांनी निरोप देऊनही काँग्रेसमध्ये जाणे टाळले

सोमेश्वर कारखाना, बारामती तालुका यातील राजकारणात मात्र त्यांनी फारसा रस घेतला नाही. तालुक्यातील २२ जिराईत गावांबाबत मात्र पोटतिडकीने बोलत असत. राज्याच्या राजकारणातील गोपीनाथ मुंडें-किसनराव बाणखेलेंपासून ते विजय शिवतारे यांच्यापर्यंत नव्या पिढीचे ते सल्लागार होते. लाला अर्बन बँक त्यांच्या नावाने सुरू करण्यात आली आहे. खुद्द यशवंतराव चव्हाण यांनी निरोप देऊनही त्यांनी काँग्रेसमध्ये जाणे टाळले. समाजवादी विचारांशी त्यांनी अखेरपर्यंत निष्ठा जपली. सध्याच्या दलबदलू व वैचारिकतेशी देणेघेणे नसलेल्या राजकारणात लालांचे महत्व आणखीनच अधोरेखित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com