बापूंची गुगली, आमदारांचा बाऊंसर, भाऊंची फिरकी...वडगाव शेरीत रंगली राजकीय जुगलबंदी  - Sambhaji Raje and Girish Bapat at the inauguration of Anil Tingre ward works | Politics Marathi News - Sarkarnama

बापूंची गुगली, आमदारांचा बाऊंसर, भाऊंची फिरकी...वडगाव शेरीत रंगली राजकीय जुगलबंदी 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 1 फेब्रुवारी 2021

नगरसेवक अनिल टिंगरे यांच्या विकास निधीतून धानोरीत साकारलेल्या जलतरण तलाव, बहुउद्देशीय सभागृह आणि बॅडमिंटन कोर्टच्या उद्घाटन समारंभाचे. खासदार संभाजीराजे भोसले आणि खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले.

पुणे : आम्ही सगळे आजी माजी पदाधिकारी फोनवरून 'संपर्कात' असतो म्हणत आमदार सुनील टिंगरे यांनी टाकलेला बाऊंसर, तुम्ही एकमेकांच्या संपर्कात असल्याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, असे म्हणत खासदार बापट यांनी घेतलेली फिरकी. वडगाव शेरीतील आमदारकी म्हणजे 'फिरता' चषक आहे, अशी माजी आमदार बापू पठारेंची गुगली आणि चौथा चषक बॉबीकडे जाणार का, निवेदकाच्या या मिश्किल कोटीवर पडलेल्या टाळ्या...पुणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशी भन्नाट राजकीय जुगलबंदी धानोरीतील नागरिकांना अनुभवायला मिळाली.
    
निमित्त होते पुणे महानगरपालिकेने नगरसेवक अनिल टिंगरे यांच्या विकास निधीतून धानोरीत साकारलेल्या जलतरण तलाव, बहुउद्देशीय सभागृह आणि बॅडमिंटन कोर्टच्या उद्घाटन समारंभाचे. खासदार संभाजीराजे भोसले आणि खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे, माजी आमदार बापू पठारे, भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक, भाजपचे स्थानिक नगरसेवक अनिल (बॉबी) टिंगरे, नाना सांगडे, ऐश्वर्या जाधव, शिवसेनेचे नितीन भुजबळ, विशाल टिंगरे आदी सर्वपक्षीय मंडळी पहिल्यांदाच एका व्यासपीठावर उपस्थित होते.

महानगरपालिकेच्या पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकी अगोदर राजकीय पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग आणि आउटगोइंग होणार आहे. अजित पवारांनी तर पुन्यात सत्तेसाठी कंबर कसली आहे. आउटगोइंगचा जास्त फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. धानोरीत भाजपचे तीन नगरसेवक आहेत. अजित पवारांचे समर्थक असणारे परंतु सध्या भाजपमधून नगरसेवक झालेले बॉबी टिंगरे पुन्हा राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. आजच्या कार्यक्रमातही अनिल टिंगरे यांनी व्यासपीठावर भाजप चिन्हाचा उल्लेख टाळून सर्वपक्षीय मंडळींचे फोटो छापले होते. सर्वपक्षीय मंडळी एकत्र आल्याने राजकीय जुगलबंदीची उत्सुकता श्रोत्यांना होती,  ती यावेळी पूर्ण झाली.
 
आमदार सुनील टिंगरे म्हणाले, बॉबी आणि मी अगोदारपासून एकमेकांविरोधात क्रिकेट खेळायचो. आमचा 'सामना' अजूनही सुरूच आहे. हार-जीत होत असली तरी आतून आमची मैत्री आहे. सर्व विरोधकांशी मी फोनवरून संपर्कात असतो. कार्यकर्त्यांनीही न भांडता एकमेकांच्या संपर्कात राहावे.

त्यावर माजी आमदार बापू पठारे म्हणाले, वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा आमदार बदलले. येथील आमदारकी म्हणजे जणू फिरता चषक आहे. हा चषक चौथ्यांदा कोणाला मिळणार, याचा निर्णय सुज्ञ मतदारांच्या हाती आहे. 

आमदार टिंगरे यांच्या टिप्पणीवर खासदार गिरीश बापट म्हणाले, वडगाव शेरीतील विरोधक नेते मंडळी जरी एकमेकांच्या संपर्कात असले तरी त्यांचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. भामा-आसखेडचे श्रेय सगळ्यांना आहे. आमदार असताना बापूंनी योजना सुरू केली व पाण्याच्या टाक्‍या बांधल्या, जगदीश मुळीक यांनी पाईपलाईन केली आणि सुनील टिंगरे यांनी तोटी बसवली. 

खासदार संभाजीराजे भोसले म्हणाले, वडगाव शेरी येथील सर्व राजकीय विरोधक चांगल्या कामासाठी एकत्र येतात हा प्रसंग समाजाला दिशा देणारा आहे. देशातील खासदारांचा निधी कोरोनामुळे गोठवला आहे. तो पुन्हा मिळावा यासाठी दिल्लीत आवाज उठवणार आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख