पडळकरांना आता आम्ही सोडणार नाही... संभाजी ब्रिगेडचा इशारा - Sambhaji Brigade warns MLA Gopichand Padalkar | Politics Marathi News - Sarkarnama

पडळकरांना आता आम्ही सोडणार नाही... संभाजी ब्रिगेडचा इशारा

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 12 फेब्रुवारी 2021

चांगल्या सोहळ्याला गालबोट लावण्याचा प्रकार आमदार गोपीचंद पडळकर यांनी केल्याची टीका संभाजी ब्रिगेडने केली आहे. 

पुणे : जेजुरी गडावरील अहिल्यामाई होळकरांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माळव्याचे श्रीमंत यशवंतराव होळकर, युवराज संभाजीराजे छत्रपती आणि सर्व सामाजिक संघटनांच्या प्रमुखांच्या हस्ते होणार आहे. परंतु एका चांगल्या सोहळ्याला गालबोट लावण्याचा प्रकार आमदार गोपीचंद पडळकर यांनी केल्याची टीका संभाजी ब्रिगेडने केली आहे. 

पडळकर यांनी जेजुरीमध्ये शरद पवार यांच्यावरही टीका केली. यावरही संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, शरद पवार हे देशाचे पुरोगामी नेते आहेत. त्यांचा अपमान सहन करणार नाही. त्यामुळे आता पडळकरांना आम्ही सोडणार नाही, असा इशारा गायकवाड यांनी दिला. 

हेही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवार गोपीचंद पडळकरांवर भडकले...

भाजप आमदार गोपींचंद पडळकर यांनी आज पहाटे जेजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक हे अनावरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते उद्या होणार आहे. पडळकर यांच्या या स्टंटनंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर गायकवाड यांनी पडळकरांनी जोरदार टीका केली.

गायकवाड म्हणाले, संभाजी ब्रिगेडचा विचार हा समाजातील तेढ कमी करुन त्यांच्यात सलोखा निर्माण करण्याचा आहे. जेजुरी गड हे सर्व समाजाचे श्रद्धास्थान आहे. जेजुरी गडाला असणारे ऐतिहासिक महत्व पाहता त्याठिकाणी आजपर्यंत शहाजीराजे - छत्रपती शिवाजी महाराज, आद्यक्रांतीविर उमाजी नाईक या महापुरुषांची स्मारके उभी करण्यात आली. परंतु ज्या अहिल्यामाईंनी जेजुरी गडाचा जीर्णोद्धार केला, भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याचे तलाव बांधले त्यांचेच स्मारक जेजुरी गडावर नसणे ही अनेकांची खंत होती.

त्याच दृष्टीने  जेजुरी देवस्थानच्या विश्वस्त मंडळासमोर राजमाता अहिल्यामाईंचा पूर्णाकृती पुतळा साकारण्याची संकल्पना मांडली. संभाजी ब्रिगेडचे जेजुरी शहराध्यक्ष आणि मार्तंड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त संदीप आप्पा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पुतळ्याचे काम सुरु झाले. पुण्याच्या धायरीतील शिल्पकार महेंद्र थोपटे यांनी मेहनत घेऊन अहिल्यामाईंचा बारा फुटांचा पूर्णाकृती पुतळा साकारला, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

जेजुरी गडावरील अहिल्यामाई होळकरांच्या पुतळ्याचे अनावरण देशाचे नेते शरद पवार, माळव्याचे श्रीमंत यशवंतराव होळकर, युवराज संभाजीराजे छत्रपती आणि सर्व सामाजिक संघटनांच्या प्रमुखांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेण्यात आला. पडळकर यांनाही या सोहळ्याचे निमंत्रण मार्तंड देवस्थान ट्रस्टने दिले होते, असे गायकवाड यांनी सांगितले.

गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका

सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या दृष्टीने त्यांनी अनावरणाच्या आधीच अंधारात स्वतः या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला. चिथावणीखोर वक्तव्येही केली. खरे तर अहिल्यामाई होळकरांच्या पुतळ्याचे अनावरण असे चोरासारखे अंधारात होणार नाही, ते दिवसा जनतेच्या उपस्थितीतच होणार आहे. पडळकरांनी केलेलं कृत्य निषेधार्ह आहे, अशी खरमरीत टीका गायकवाड यांनी केली आहे. 

सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांना समाज कधीही स्वीकारणार नाही. १३ फेब्रुवारीला अहिल्यामाई होळकरांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या प्रतिमेला साजेसे असे आणि दिमाखतच होईल, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख