नवनीत राणा यांना अमरावतीची जनता रिटेक देणार नाही! - Rupali Chakankar criticizes MP Navneet Rana | Politics Marathi News - Sarkarnama

नवनीत राणा यांना अमरावतीची जनता रिटेक देणार नाही!

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 8 जून 2021

नवनीत राणा यांच्यामध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आता खासदारकीचा राजीनामा द्यावा. 

नागपूर : अमरावतीच्या लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्याक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी नवनीत राणा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.  (Rupali Chakankar criticizes MP Navneet Rana)

त्या संदर्भात त्यांनी ट्वीट केले आहे. त्या म्हणाल्या की ''नवनीत राणा यांच्यामध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावे. खोटे जातीचे प्रमाणपत्र देऊन खासदारकी जिंकली आहे. त्यांनी जनतेची दिशाभूल केली आहे. अभिनय क्षेत्रात आणि खऱ्या आयुष्यात खुप मोठा फरक असतो. अभिनयात रिटेक देता येतात पण खऱ्या आयुष्यात रिटेक नसतात, त्यामुळे आता नवनीत राणा यांना अमरावतीची जनता रिटेक देणार नाही, अमरावतीच्या जनते बरोबरच त्यांनी डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचाही अपमान केला'' असल्याचा आरोप चाकणकर यांनी केला आहे.

हे ही वाचा : 'अच्छे दिव आले, पेट्रोल शंभर रुपये लिटर झाले'

अमरावती हा लोकसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. मात्र, खासदार नवनीत कौर यांनी लुहाणा समुदायाच्या आरक्षणातून निवडणुकीसाठी अर्ज भरला होता. त्याच्या जात प्रमाणपत्राला शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव आडसूळ यांनी न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर न्यायालयाने आज निकाल दिला आहे. नवनीत राणा याचे जात प्रमाणपत्र रद्द करत उच्च न्यायालयाने त्यांना दोन लाख रुपये दंड आणि सहा आठवड्यात सर्व प्रमाणपत्रक जमा करण्याचे आदेश दिले आहेत. खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.  

आनंदराव आडसूळ आणि सुनील भालेराव यांनी ही याचीका दाखल केली होती. याचिकेमध्ये म्हटले होते की अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होता. पण नवनीत राणा या लुहाणा जातीच्या आहेत. त्यांच्या वडिलांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द ठरवले आहेत. असे असतानाही बनावट दस्तऐवजाच्या आधारावर राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवली. ही मतदारांची फसवणूक असून त्यांची निवड अवैध आहे. त्यांची निवड रद्द ठरवण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती. 

हे ही वाचा : खासदाराशी वाद वाढवून राज्यपाल पडले तोंडघशी

उच्च न्यायालयाने राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द केले. त्यामुळे राणा यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास दुध का दुध आणि पाणी का पाणी झाले असल्याचे अडसूळ म्हणाले. राणा यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवली होती. घटनेच्या चौकटीत हा फार मोठा गुन्हा असल्याचे आडसूळ म्हणाले. यामुळे राणा यांना तुरुंगावारदेखील घडू शकतो, असेही आडसूळ यांनी सांगितले. आनंदराव आडसूळ यांच्या वतीने अॅड. सी. एम्. कोरडे, अॅड. प्रमोद पाटील व अॅड. सचिन थोरात यांनी बाजू मांडली. 
Edited By - Amol Jaybhaye   

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख