Rumors of my joining BJP are spread by Amol Kolhe : Adhalrao | Sarkarnama

कोल्हे यांच्याकडूनच माझ्या भाजपप्रवेशाची अफवा : आढळराव 

नितीन बारवकर 
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

काही नाही मिळाले की आढळराव भाजपमध्ये जाणार, ही कंडी चांगली पिकते आणि विरोधक ती शिताफीने पिकवतात.

शिरूर (जि. पुणे) : "वैविध्यपूर्ण भूमिका निभावण्यात पटाईत असलेल्यांनी शिरूर मतदार संघात रडीचा डाव सुरू केला आहे. केंद्र सरकारच्या विरोधातील आमचे कांदा आंदोलन यशस्वी झाले असताना त्यांना पोटशूळ उठला आहे. ते नाहक माझी बदनामी करीत असले; तरी सोंगाड्यांच्या भूलथापांना जनता आता भूलणार नाही,' अशा शब्दांत शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव न घेता आज (ता. 17 सप्टेंबर) त्यांच्यावर पुन्हा टीका केली. 

काही नाही मिळाले की आढळराव भाजपमध्ये जाणार, ही कंडी चांगली पिकते आणि विरोधक ती शिताफीने पिकवतात, अशा शब्दांत आढळराव यांनी खासदार कोल्हे समर्थकांचा समाचार घेतला. ते म्हणाले, "राज्यातील सत्तेत राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेनेसोबत असल्याने आम्ही महाविकास आघाडी धर्माचे पालन करून शांत होतो. तथापि, आमच्या निष्ठेच्या उचापती सुरू केल्यानेच निष्ठावंत शिवसैनिक भडकले. त्यातून त्यांचे खरे चित्र कार्टूनच्या माध्यमातून समाजासमोर आल्यावर ते आणखी बिथरले. थेट दमाची भाषा वापरली. तरीही आम्ही दुर्लक्ष केले.' 

"कांदा निर्यातबंदीवरून आम्ही केंद्र सरकारच्या विरोधात शिरूर मतदार संघाबरोबरच; पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रान पेटवल्यानंतर आणि हे आंदोलन यशस्वी झाले असताना तेथून जनसामान्यांचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी आमच्या भाजप प्रवेशाची कंडी जाणीवपूर्वक पिकवली. यातही निश्‍चितच त्यांचाच हात आहे. कारण सद्यस्थितीत त्यांना आता दुसरे कुठलेही काम राहिलेले नाही.

एखादे फेसबुक लाईव्ह करायचे, एखाद-दुसरी पत्रकबाजी करायची आणि खूप काम केल्याच्या आविर्भावात कुठल्यातरी चॅनेलला थाटात बाईट द्यायची. याशिवाय दुसरा उद्योग नसलेल्या लोकांचे मतदार संघाकडे व मतदार संघातील जनतेकडे पूर्ण दूर्लक्ष झाले आहे. शिरूर मतदारसंघात कोरोनाचा कहर सुरू असताना आम्ही गावोगाव लोकांमध्ये जाऊन त्यांना दिलासा देण्याचे काम करीत आहोत. मात्र, मोठ्या ऐटीत माध्यमांसमोर बोलणारे मतदार संघात एकदासुद्धा फिरकलेले नाहीत,' असा आरोप आढळराव यांनी कोल्हे यांच्यावर केला. 

"केंद्र सरकारच्या विरोधात कालच मी शिवसैनिकांसोबत रस्त्यावर उतरलो असताना भाजपमध्ये जाण्याचा संबंध येतोच कुठे? असा सवाल आढळराव पाटील यांनी केला. ते म्हणाले, "मी भाजपच्या वाटेवर असल्याची कुठल्याही वर्तमान पत्रात प्रसिद्ध न झालेले वृत्त बातमीपत्राप्रमाणे डिझाईन तयार करून कोण व्हायरल करत आहे, हे न समजण्याइतकी शिरूर मतदार संघातील जनता निश्‍चितच दुधखुळी नाही.' 

"लॉकडाउनचे गेले चार महिने मी मतदार संघात फिरत असून मुक्काम पोस्ट लांडेवाडी आहे. त्यामुळे सरसंघचालकांना भेटायला नागपूरला गेल्याची काडी कुणी टाकली, हे सर्वसामान्य लोकांना चांगलेच ठाऊक आहे.

आमच्या वरिष्ठ नेत्यांचे माझ्याविषयीचे मत गढूळ करण्यासाठी हा उपदव्याप केला असला; तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पक्षनेतृत्वाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. विरोधकांच्या या खोडसाळ खेळीचा त्यांच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही,' असा दावा आढळराव यांनी केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख