रुग्णवाहिकांच्या सायरनने चुकतोय काळजाचा ठोका; परिवहन विभाग करणार कारवाई - RTO orders to Keep ambulance sirens off at night | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पुण्यातील हॉटेल सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहणार : अजित पवारांच्या बैठकीत निर्णय

रुग्णवाहिकांच्या सायरनने चुकतोय काळजाचा ठोका; परिवहन विभाग करणार कारवाई

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 13 मे 2021

नागरिकांमध्ये आजाराबाबत प्रचंड भिती निर्माण होऊन नैराश्य येत आहे.

पुणे : कोरोनाचा कहर वाढल्याने रुग्णांना उपचारासाठी ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे रस्त्यांवरून धावणाऱ्या रुग्णवाहिकांच्या सायरनचा आवाज सतत कानावर पडत असतो. या सायरनचा आवाज ऐकला की अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास होत आहे. याबाबतच्या तक्रारी परिवहन विभागाकडे आल्या आहेत. (RTO orders to Keep ambulance sirens off at night) 

पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे. त्यामध्येच ज्येष्ठ नागरिकांबाबतच्या तक्रारींचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये नमूद केल्यानुसार, रुग्णांची ने-आण करणाऱ्या रुग्णवाहिकांबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. गर्दी नसतानाही तसेच प्रामुख्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावर वाहतूक नसतानाही रुग्णावाहिकांचे चालक अकारण हॅार्न वाजवत व सायरन सुरू ठेवत आहेत. यामुळे नागरिकांच्या मनामध्ये अकारण भिती निर्माण होत आहे.

हेही वाचा : गृहमंत्री अमित शहा हरवले! दिल्ली पोलिसांत तक्रार

साथीच्या आजारामध्ये नागरिकांचे मनोधैर्य खचत आहे. तसेच रात्रीची झोपमोडही होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये आजाराबाबत प्रचंड भिती निर्माण होऊन नैराश्य येत आहे. याचा परिणाम ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर थेट होत आहे. या तक्रारींच्या आधारे रुग्णवाहिका चालकांना शिंदे यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. 

हॅार्न व सायरनचा अनावश्यक वापर केल्याने ध्वनी प्रदुषणामध्ये वाध होत आहे. तसेच नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्याही तक्रारी आहेत. आवश्यकता असल्यासच सायरनचा वापर करावा. रात्रीच्या वेळी रहिवाशी भागातून सायरनचा वापर करू नये, असे आदेश शिंदे यांनी दिले आहेत. तसेच याबाबत तक्रारी आल्यास रुग्णवाहिका चालक व मालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. 

परराज्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी RTPCR बंधनकारक

राज्यात पुण्या-मुंबईसह अन्य काही शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी इतर जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढतच चालले आहेत. त्यामुळे राज्य शासनाने राज्यातील लॅाकडाऊन एक जून रोजी सकाळी सात वाजेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच लॅाकडाऊनमधील सर्व निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. शासनाकडून आज 'ब्रेक द चेन' मोहिमेची सुधारीत नियमावली आज जाहीर करण्यात आली. 

देशातील इतर राज्यांमध्ये कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे. त्यामुळे आता यापुढे परराज्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असेल तरच राज्यात प्रवेश दिला जाईल. ही चाचणी जास्तीत जास्त ४८ तासांपूर्वीची असायला हवी, असे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच यापूर्वी १८ एप्रिल व एक मे रोजीच्या आदेशानुसार, कोरोनाचा संसर्ग अधिक असलेल्या ठिकाणांहून येणाऱ्यांवर घालण्यात आलेली बंधनेही कायम राहणार आहेत. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख