RSS office bearers criticize PMC corporators | Sarkarnama

कामचुकार नगरसेवकांची संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून कानउघाडणी 

उमेश शेळके
मंगळवार, 19 मे 2020

लॉकडाउनचा कालावधी तीन वेळा वाढविण्यात आल्यामुळे शहरातील अनेक भागातील नागरिकांचे हाल सुरू आहेत. नगरसेवक कुठे आहेत, असा प्रश्‍नही नागरिकांकडून विचारला जात आहे. त्याची दखल खुद्द संघाच्या पदाधिकाऱ्यांना घ्यावी लागली आहे. 

पुणे : कोरोनाबाधित रुग्ण सापडला, तेथे भेट द्या, क्वारंटाईन सेंटरला भेट देऊन तेथे असलेल्या नागरिकांच्या काय अडचणी आहेत, त्या जाणून घ्या.... प्रभागात एकही माणूस उपाशी राहिला नाही पाहिजे... त्यासाठी बाहेर पडा.. अशा तिखट शब्दांत भाजपच्या कामचुकार नगरसेवकांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांतातील एका वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी कानउघाडणी केल्याचे समजते. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 23 मार्चपासून लॉकडाउन लागू करण्यात आल्या. लॉकडाउनचा कालावधी तीन वेळा वाढविण्यात आल्या. त्यामुळे शहरातील अनेक भागातील नागरिकांचे हाल सुरू आहेत. तर नगरसेवक कुठे आहेत, असा प्रश्‍नही नागरिकांकडून विचारला जात आहे. त्यांची दखल खुद्द संघाच्या पदाधिकाऱ्यांना घ्यावी लागली. 

लॉकडाउनच्या काळात कोणी कोणी आणि काय काय मदत केली, यांचा माहिती दररोज पक्षाकडून घेतली जात आहे. त्यामध्ये शहराच्या काही भागात पक्षाचे नगरसेवक मनापासून काम करीत आहेत. तर काही नगरसेवक केवळ दिखाऊपणा करीत असल्याचे आढळून आले. काम मुंगीएवढे करून पक्षाला हत्तीएवढे केल्यासारखे भासवत असल्याचे काही उदाहरणे समोर आली आहेत. महापालिकेत पक्षाचे शंभर नगरसेवक आहेत. त्यापैकी तीस ते चाळीस टक्के नगरसेवक अशा प्रकारे कामचुकारपणा करीत असल्याचे त्यातून पुढे होते. 

दोन दिवसांपूर्वी संघाच्या या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी वेबीनारच्या माध्यमातून कामाचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना करताना कामचुकार नगरसेवकांची कानघडणी केली. त्यामुळे पक्षात हा चर्चेचा विषय झाला आहे. पुणे शहरात पक्षात गटातटाचे राजकारण सुरू आहे. काही गटाचे नगरसेवक पक्षाच्या आदेशाला जुमानत नसल्याचे यापूर्वीही अनेकदा समोर आले आहे. या महामारीच्या काळात पक्षाने दिलेल्या सूचनांना त्यांनी केराची टोपली दाखवली असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आले. त्यामुळे पक्षाच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांसमोरच संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने कानउघाडणी केल्यामुळे ते आता तरी काम करतील,अशी अपेक्षा पक्षाकडून व्यक्त केली जात आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख