पुण्याच्या उपमहापौरपदासाठी 'आरपीआय'च्या सुनीता वाडेकर यांचे नाव निश्चित - RPI Sunita Wadekar name confirmed for Pune Deputy Mayor post | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्याच्या उपमहापौरपदासाठी 'आरपीआय'च्या सुनीता वाडेकर यांचे नाव निश्चित

अमोल कविटकर 
मंगळवार, 16 मार्च 2021

आरपीआयच्या अंतर्गत बैठकीत सुनिता वाडेकर यांच्या नावावर एक मुखाने शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

पुणे : पुण्याच्या उपमहापौरपदी आरपीआयच्या नगरसेविका आणि विद्यमान गटनेत्या सुनिता वाडेकर यांची निवड निश्चित झाली आहे. लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. शेंडगे यांनी राजीनामा दिल्यानंतर उपमहापौरपद वाडेकर यांच्याकडे जाणार, हे आरपीआयने आधीच निश्चित केले होते. आरपीआयच्या अंतर्गत बैठकीत वाडेकर यांच्या नावावर एक मुखाने शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे उपमहापौर पदाच्या निवडणुकीची केवळ औपचारिकताच बाकी आहे. 

पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद भाजपकडेच राहणार, की आरपीआयला दिले जाणार? यावर खल सुरू होता मात्र, आरपीआयने हे पद आपल्याकडेच राहावे, यासाठी वरिष्ठ पातळीवर फिल्डिंग लावली होती आणि त्याला यश मिळाले आहे. भाजप उपमहापौरपद आरपीआयला द्यायला राजी झाले आहे. उपमहापौपद आरपीआयला देऊ नये, असाही एक मतप्रवाह भारतीय जनता पक्षात स्थानिक पातळीवर होता. 

उच्चशिक्षित युवकाने नाकारले भाजपचे तिकीट

स्थानिक पातळीवरील हे मत वरिष्ठ पातळीवर मात्र फारसे तग धरू शकले नाही, म्हणूनच आधी आरपीआयकडे असलेले उपमहापौरपद पुन्हा आरपीआयलाच देण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला. त्यानुसारच शेंडगे यांनी राजीनामा दिला आहे. सुनिता वाडेकर या आरपीआयच्या नगरसेविका असून त्या आरपीआय गटाच्या विद्यमान गटनेत्या ही आहेत. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या बातमीला आरपीआयच्या वरिष्ठ सुत्रांनीही दुजोरा दिला आहे. ही निवड एकमताने झाली असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

माजी सभागृहनेते धीरज घाटे यांच्या राजीनाम्याची सोबतच उपमहापौरपदाचा राजीनामा होणार होता. मात्र स्थानिक पातळीवर भाजपामध्ये असलेल्या दोन मतप्रवाहमुळे यावर निर्णय होऊ शकला नव्हता. मात्र आता निवडणुकांसाठी केवळ दहा महिन्यांचा कालावधी उरल्यामुळे यावर निर्णय घेतला गेला आहे. 

भाजपने आरपीआयला पुन्हा उपमहापौर देण्याच्या घेतलेल्या या भूमिकेचा आगामी महापालिका निवडणुकीत कसा फायदा होणार, हेही पाहणे उत्सुकतेचे आहे. भाजपला गेल्या महापालिका निवडणुकीच्या निवडणुकीत मिळालेल्या यशात आरपीआयचाही वाटा होता. आरपीआयचे केवळ पाच नगरसेवक निवडून आले असले, तरी शहरातील विविध मतदारसंघात आरपीआय फॅक्टर भाजपसाठी यश देणारा ठरला होता. त्यामुळे आगामी निवडणुकीतही या फॅक्टरचा फायदा होईल अशी भाजपला आशा आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख