रमेश थोरातांच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले; पण विजयाचा बाण राहुल कुलांचा ! 

दौंड विधानसभेची2019 ची निवडणूक भाजपचे विजयी आमदार राहुल कुल व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार रमेश थोरात या दोघांनाही बोचत राहिली आहे.
Ramesh Thorat's activists set on firecrackers; But the arrow of victory belongs to Rahul Kul
Ramesh Thorat's activists set on firecrackers; But the arrow of victory belongs to Rahul Kul

केडगाव (जि. पुणे) : निवडणूक म्हटली की हार-जीत असते. पराभूत उमेदवाराला सल टोचत राहते, तर विजयी उमेदवार सत्ता भोगत असतो. मात्र दौंड विधानसभेची 2019 ची निवडणूक भाजपचे विजयी आमदार राहुल कुल व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पराभूत उमेदवार रमेश थोरात या दोघांनाही बोचत राहिली आहे. मंत्रिपदाची संधी हुकल्याने कुल यांना रूखरूख आहे, तर 746 मतांनी झालेला पराभव थोरात यांच्या जिव्हारी लागला आहे. 

दौंड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस विरूद्ध महायुती असे चित्र पहिल्यापासून होते. महायुतीकडून आमदार राहुल कुल यांनी उमेदवारी मागितली होती. राष्ट्रवादीतील नाराज इच्छुकांना आमदार कुल यांनी हवा दिली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कुल यांचे संबंध चांगले असल्याने त्यांनी राष्ट्रवादीच्या नाराज इच्छुकांना थेट फडणवीसांच्या दरबारी नेले. त्यामुळे राष्ट्रवादीला ऐन निवडणुकीत खिंडार पडले. 

जानकरांनी स्वतःला मंत्रिपद घेत  कुलांना वंचित ठेवले

विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीतील प्रचार सभांमध्ये "राहुल कुल यांना विजयी करा, मी त्यांना मंत्री करतो' असे राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर ठासून सांगत होते. मतदारांनी दौंडला प्रथमच मंत्रिपद मिळणार म्हणून कुल यांनी भरभरून मते दिली. मात्र प्रत्यक्षात जानकर यांनी स्वतःला मंत्रिपद घेत कुल यांना वंचित ठेवले. जानकर यांनी शब्द पाळला नाही; म्हणून दौंडमधील कुल यांचे कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज झाले. कुल यांची महामंडळावरही वर्णी लागू शकली नाही. कुल यांनाही ती सल होता. 

 जानकर यांना अंधारात ठेवत कुल भाजपत

सन 2019 च्या निवडणुकीत कुल हे रासपचे उमेदवार असतील, हे जानकर यांनी अगोदर जाहीर केले होते. मात्र, फडणवीस यांनी कुल यांना मंत्रिपदाचा शब्द दिला होता. त्यामुळे कुल शरीराने रासपत, तर मनाने भाजपत होते. "रासप'त राहिलो तर मंत्रिपदाबाबत पुन्हा 2014 ची पुनरावृत्ती होऊ शकते, या विचाराने कुल यांनी जानकर यांना अंधारात ठेवत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे कमळ हातात घेतले. जानकर यांनी कुल यांना बेदखल केले. जानकर कुल यांच्या प्रचारालाही आले नाहीत. या प्रकारामुळे तालुक्‍यातील धनगर समाज नाराज झाला. या नाराजीला राष्ट्रवादीने हवा दिली. 

मेगा भरती होऊनही कुल काठावर पास 

राज्यात भाजपची सत्ता येणार, असे चित्र दिसत असताना रमेश थोरात यांच्यावर काही पदाधिकारी नाराज होते. शेवटच्या टप्प्यात भाजपमध्ये "मेगा भरती' झाली. दौंड शहरातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक नंदू पवार यांनी आमदार कुल यांना सर्वप्रथम पाठिंबा दिला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार राजाराम तांबे यांनीसुद्धा राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्षाला रामराम केला. कुल यांनी थेट तांबे यांची मुख्यमंत्र्यांशी भेट धडवून आणत थोरात यांना पहिला धक्का दिला. आनंद थोरात व महेश भागवत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कुल यांच्या मध्यस्थीने मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. 


पवार-फडणवीसांच्या सभा 

निवडणूक लोकसभेची असो की विधानसभेची ज्येष्ठ नेते शरद पवार फक्त सांगता सभा घेतात. मात्र, या निवडणुकीत पवार यांनी सहा सभा घेतल्या. यात पवार यांच्या वरवंडच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या सभेला प्रतिउत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी चौफुला येथे सभा घेतली. या सभेलाही मोठा प्रतिसाद मिळाला. 


आरोप-प्रत्यारोप हाच अजेंडा 

खरेतर कोणतीही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढली जावी, अशी मतदारांची अपेक्षा असते. मात्र आरोप प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक गाजली. रमेश थोरात यांनी भीमा-पाटस कारखाना, राहू सोसायटीतील गैरप्रकार, राहुची नळपाणी पुरवठ्यातील चुका, आणि वैयक्तिक टीका यावर भर दिला. दौंडचे निर्णय मंत्रालयात करायचे की बारामतीत अशी टीका कुल यांनी केली. कुल यांनी या टीकेबरोबरच मुळशीचे पाणी, पुणे-दौंड लोकल, एमआयडीसी या तीन महत्वकांक्षी प्रकल्पावर प्रचारातून भर दिला. मुळशीचे पाणी आणि भीमा-पाटस या दोन मुद्द्यांभोवती निवडणूक फिरत राहिली. 

कॉंटे की टक्करमध्ये कुल विजयी 

दौंड विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार आमदार राहुल कुल यांना विजयासाठी अखेरपर्यंत झगडावे लागले. पुणे जिल्ह्यात भाजप-शिवसेनेतील प्रस्थापितांचा दणदणीत पराभव होत असताना कुल यांनी मिळविलेला विजय महत्वाचा मानला गेला. भाजपची स्थापना झाल्यानंतर दौंडमध्ये 2019 मध्ये प्रथमच कमळ फुलले. कुल यांनी 1400 कोटी रूपयांची कामे करूनही अपेक्षित मताधिक्‍य घेता आले नाही. 

लोकसभा निवडणुकीत आमदार कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना दौंड तालुक्‍यातून 7053 मतांची आघाडी मिळाली होती. हे मताधिक्‍यसुद्धा कुल यांना राखता आले नाही. रासपची उमेदवारी न घेतल्याने कुल यांच्यापुढील अडचणी प्रांरभी वाढल्या होत्या. आनंद थोरत, महेश भागवत, नंदू पवार, राजाराम तांबे यांच्या भाजपप्रवेशामुळे कुल यांना अपेक्षित मताधिक्‍य मिळाले नाही. मात्र, हे सर्वजण कुल यांना विजयापर्यंत घेऊन गेले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दौंडमध्ये सभा झाली नाही. त्याचाही फटका थोरात यांना बसला. पवार यांना प्रचाराला बोलवले नाही की पवार आले नाहीत, ही बाब अद्याप गुलदस्त्यात आहे. 

पवार लाटेत कुलच तरले... 

पुणे जिल्हा हा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता शरद पवार यांनी पुणे जिल्ह्याची निवडणूक सुत्रे स्वतःच्या हातात घेतली. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची लाट होती. पुणे जिल्ह्यात महायुतीचे विजय शिवतारे व भेगडे या मंत्र्यांचा दारूण पराभव होत असताना कुल या लाटेतही तरून गेले. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत महायुती भुईसपाट होत असताना राहुल कुल यांनी पवारांच्या बालेकिल्ल्यात निसटता का होईना मिळविलेला विजय उल्लेखनीय म्हणावा लागेल. 

राहुल कुल यांना नशिबाची साथ 

ग्रामपंचायत मतमोजणीसारखा अनुभव तालुक्‍याने या निवडणुकीत घेतला. मतमोजणीच्या एकूण 22 फेऱ्या होत्या. पंधराव्या फेरीपर्यंत कुल यांना सहा हजाराचे मताधिक्‍य होते. त्यानंतर प्रत्येक फेरीला कुल यांची आघाडी 500 ते 600 मतांनी कमी कमी होत 20 व्या फेरीपर्यंत कुल यांचे मताधिक्‍य अवघे 598 मतांवर आले. 21 व्या फेरीत कुल यांचे मताधिक्‍य 486 वर आले. निकालातील सस्पेन्स कमालीचा वाढत गेला. शेवटच्या 22 व्या फेरीत 9068 मते शिल्लक होती. मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष करणारे कार्यकर्ते स्तब्ध झाले होते. 22 वी फेरी म्हणजे शेवटचे षटक.

कोण बाजी मारणार याचीच कुजबुज चालू होती. एवढ्यात थोरात विजयी झाल्याची सोशल मीडियावर पोस्ट आली. मग काय अवघ्या काही मिनिटांत थोरातांच्या कार्यकर्त्यांनी तालुक्‍यात दिवाळी साजरी केली. या दोघांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय करणारी ही 22 वी फेरी होती. अखेर 22 वी फेरी संपली आणि कुल हे 746 मतांनी विजयी झाले. शेवटच्या दोन फेऱ्यात 19,200 मते मोजायची शिल्लक असताना कुल यांची 598 मतांची सीमारेषा थोरात यांना पार करता आली नाही. कुल यांना नशिबाने साथ दिली, अशी चर्चा मतमोजणी केंद्रात होती. 

लाल दिव्याची पुन्हा हुलकावणी 

गत विधानसभा निवडणुकीत भाजपने 105 तर शिवसेनेने 56 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. मात्र मुख्यमंत्रिपदाच्या भांडणातून महायुती फुटली. शिवसेनेला राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसने पाठिंबा देत सरकार स्थापन केले. या निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकूनसुद्धा भाजप सत्तेपासून दूर राहिले. महायुतीला बहुमत मिळाल्याने आमदार कुल हे मंत्री होणार जवळपास निश्‍चित होते. पुणे जिल्ह्यातून महायुतीतून एकमेव राहुल कुल विजयी झाले होते. त्यामुळे तालुक्‍याच्या मंत्रिपदाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अहंकारामुळे महायुती सरकार स्थापन करू शकली नाही अन्‌ तालुक्‍याला मंत्रिपदाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली. 

Edited By Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com