'भीमा पाटस' सुरू होणार नाही.. कारखाना मोडीत काढणाऱ्यांना जनता घरी बसवेल... - ramesh thorat criticizes Bhima Patas Factory rahul kul   | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

'भीमा पाटस' सुरू होणार नाही.. कारखाना मोडीत काढणाऱ्यांना जनता घरी बसवेल...

संतोष काळे
बुधवार, 31 मार्च 2021

'भीमा पाटस'च्या खासगीकरणाला ऊस उत्पादक सभासदांचा कायम विरोध राहिल.

राहू : "भीमा पाटस कारखान्याचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू आहे. कारखान्यावर सुमारे पाचशे कोटी रुपये कर्ज असल्याने डबघाईला आलेला आहे. कारखाना कदापी सुरु होणार नाही," असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी व्यक्त केले आहे. थोरात पत्रकार परिषदेत बोलत होते. कारखाना बंद असताना देखील उस बिलापोटी 2 कोटी 87 लाख रुपयाचे रक्कम नेमकी कुठे वाटप केले याचाही खुलासा करावा, अशी मागणी थोरात यांनी केली आहे. 

थोरात म्हणाले की, काल झालेल्या ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मी दहा वेळा हात वर करूनही (उंचावूनही) मला बोलण्याची संधी दिली नाही. ही कसली हुकुमशाही आहे. भीमा पाटसच्या खासगीकरणाला  ऊस उत्पादक सभासदांचा कायम विरोध राहिल. सहकार मोडीत काढणाऱ्यांना दौंडची जनता घरी बसल्याशिवाय राहणार नाही. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारखाना सुरू करण्यासाठी 36 कोटी दिले होते, हे नेमके कोठे वापरले याचा राहुल कुल यांनी खुलासा करावा, भीमा पाटस कारखान्यांची 49 हजार सभासद असताना फक्त 156 जणांनीच सहभाग घेतला. यावरून कारखान्याचा कारभार कसा चालला आहे हे जास्त सांगायला नको. 

जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या तुलनेत भीमा पाटसने दर वर्षी प्रति हंगामाला सुमारे पाचशे रुपये बाजार भाव एफआरपीपेक्षा कमी देऊन ऊस उत्पादक सभासदांना अक्षरशा चुना लावला. आमच्याकडे कारखाना असताना बारा लाख मेट्रिक टनापर्यंत ऊसाचे गाळप करून साडेअकरा टक्के सरासरी साखर उतारा मिळत होता.त्यावेळी कारखाना आमच्या ताब्यात असताना 38 कोटीचे कारखान्यावर कर्ज होते. आणि 75 कोटीची साखर शिल्लक होती, अशी परिस्थिती असताना कुल यांच्या ताब्यात कारखाना चालवायला दिला. सध्या कारखान्याचे तीन तेरा वाजले आहे. एका ट्रॅक्टरवर पाच पाच बँकांचे कर्ज 'या' महाशयांनी काढलेले आहे.
   

साखर गोदामात साधारणता पन्नास ते सत्तर हजार साखरेचे पोती शिल्लक होती. ती का विकली नाही साखर गोदामाला आग लागली नसून आग लावण्यात आली आहे. याची संबंधित विभागाने चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे थोरात यांनी सांगितले. यावेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष दत्तात्रेय शेलार, उपाध्यक्ष अशोक गव्हाणे,  लक्ष्मण दिवेकर, भानुदास नेवसे, सूर्यकांत खैरे, नानासाहेब जेधे, नानासाहेब फडके आदी उपस्थित होते.
   

भीमा पाटसची निवडणूक लढविणार नाही.. 
"भीमा पाटस सारखी आर्थिक बिकट अवस्था देशात कुठल्याच कारखान्याची झालेली नाही. इतका कारखाना खिळखिळा करून ठेवला आहे. सर्वसाधारण गोरगरीब सभासदांची तळमळ घ्यायला नको. कारखान्याचे अक्षरशा खत झाल्यामुळे कारखान्याची निवडणूक मी कदापि लढविणार नाही," असे थोरात यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख