रमेशआप्पांचे चिंरजीव म्हणाले, 'दादा, Get well soon... ' 

पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात व आमदार राहुल कुल यांच्यात विळ्या भोपळ्याचे राजकीय वैर आहे.
Ramesh-Thorat-Rahul-Kul8.
Ramesh-Thorat-Rahul-Kul8.

केडगाव (जि.पुणे) : दौंडमधील भाजपचे आमदार राहुल कुल यांना कोरोना झाल्याचा अहवाल मंगळवारी आला अन् दौंड तालुक्यात खळबळ उडाली. काल दिवसभर आमदारांच्या कोरोनाचा विषय चर्चेत राहिला. या चर्चेत आणखी एक चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे तुषार रमेश थोरात यांच्या पोस्टची. पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात व आमदार राहुल कुल यांच्यात विळ्या भोपळ्याचे राजकीय वैर आहे. 

राजकारण करत असताना दोघेही एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. सुभाषआण्णा कुल व रमेशआप्पा थोरात हयात असताना ही आण्णा-आप्पांची जोड गोळी पुणे जिल्ह्यात फेमस होती. दोन्ही कुटुंबांचे घरोब्याचे संबंध. सुभाष कुल यांच्या निधनानंतर हे संबंध तर राहिले नाहीतच उलट कुल - थोरात कुटुंबांमध्ये विळ्या भोपळ्याचे वैर निर्माण झाले. १६ वर्ष एकत्र राजकारण करणारी ही घराणी एकमेकांसमोर उभी टाकली. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत कुल व थोरात यांच्यात काँटे की टक्कर होऊन रमेश थोरात यांचा अवघ्या ७४६ मतांनी पराभव झाला. हा पराभव थोरात कुटुंबियांबरोबरच कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला.

एवढे सारं घडलेले असताना राजकारण राजकारणाच्या जागी ठेऊन रमेश थोरात यांचे पुत्र तुषार यांनी आमदार कुल यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या. तुषार यांनी रमेश थोरात व राहुल कुल यांच्या एकाच व्यासपीठावरील फोटो शेअर केला आहे. 

या शुभेच्छांचे सोशल मीडियावर चांगले स्वागत झाले आहे. अनेकांनी ही पोस्ट शेअर केली आहे. कुल यांच्या कार्यकर्त्यांनी तुषार यांना धन्यवाद दिले आहेत. तर थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी कुल यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

गेल्या वर्षी आमदार राहुल कुल व तुषार थोरात हे सुपे ( ता.बारामती ) येथे एका लग्न समारंभात एकत्र आले होते. संयोजकांनी फेटा दिल्यानंतर तुषार हे फेटा बांधताना अडखळत असताना आमदार कुल यांनी पुढे येऊन त्यांना फेटा बांधला होता. या बातमीचे नेटक-यांनी सोशल मीडियावर जोरदार स्वागत केले होते. एकूणच कुल-थोरात यांच्या राजकीय हाडवैरामुळे कार्यकर्त्यांची फार मोठी फरफट झालेली आहे.

निवडणुकांपुरते राजकारण ठिक आहे. मात्र, दौंड तालुक्यात ही फरफट निवडणुका संपल्यानंतरही चालू असते. या दोन प्रसंगातून राजकारणाचा ट्रेंड बदलताना दिसत आहे. त्यामुळे कार्यकर्ते सुखावत आहेत. हा ट्रेंड असाच टिकून रहावा अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. तालुक्यात खेळीमेळीचे राजकारण असावे, असे मत कुल-थोरात यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. आगामी काळात या दोन तरूण नेत्यांमध्ये राजकारणाव्यक्तिरिक्त संवाद राहिला तर कार्यकर्त्यांची फरफट थांबेल, असे जाणकारांचे मत आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com