शिरूरमधील 'जनआरोग्य'चे वास्तव ऐकून राजेश टोपेंना धक्काच बसला! 

आता पुन्हा कळवा आणि तातडीने योजना राबविण्याच्या सूचना द्या, तरीही त्यांनी दाद न दिल्यास मला सांगा. मग, त्यांच्यावर काय कारवाई करायची, हे मी ठरवतो.
Rajesh Tope was shocked to hear the reality of 'Janaarogya' in Shirur!
Rajesh Tope was shocked to hear the reality of 'Janaarogya' in Shirur!

शिरूर : गोरगरीब व अल्पउत्पन्न गटातील घटकांवर विनामूल्य उपचार व्हावेत, या हेतूने सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजना जाहीर केली. मात्र, ही योजना शिरूर तालुक्‍यातील एकाही रुग्णालयात व दवाखान्यात लागू नसल्याच्या माहितीने दस्तुरखुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाच धक्का बसला. मंत्रिपातळीवरील महत्वाची व्हिडिओ कॉन्फरन्स आवरती घेऊन त्यांनी याबाबतची माहिती शिरूरच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली आणि या योजनेचे निकष शिथिल करण्याचे आदेश दिले. 

आरोग्य मंत्री टोपे हे मुंबईकडे निघाले असताना, नगर जवळ आल्यावर मंत्रिस्तरावरील महत्वाची व्हिडिओ कॉन्फरन्स अर्धा तासाने सुरू होत असल्याचे समजल्यावर प्रवासातील जवळचे गाव म्हणून त्यांनी शिरूर तहसील कार्यालयातून या कॉन्फरन्सला हजेरी लावली.

तत्पूर्वी तहसीलदार लैला शेख यांच्याकडून त्यांनी महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत तालुक्‍यातील किती रूग्णांना लाभ मिळाला, याबाबत विचारले. त्या वेळी तालुक्‍यातील एकाही रूग्णालयात ही योजना लागू नसल्याची माहिती शेख यांनी दिल्यावर त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. 

कॉन्फरन्स आटोपती घेऊन शहर व तालुक्‍यातील या योजनेचा आढावा स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून घेतला. त्यावेळी गोरगरीब जनतेला महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यास अनेक रूग्णालये टाळाटाळ करीत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. 

याबाबत तहसीलदार शेख यांना त्यांनी विचारणा केली असता, तालुक्‍यातील काही मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलना ही योजना राबविण्याबाबत पत्राद्वारे कळविले होते, तथापि, त्यांनी प्रतिसाद न दिल्याने त्यांना नोटीसा बजावल्या असल्याचे तहसीलदारांनी सांगितले. यावर मंत्री टोपे यांनी आता पुन्हा कळवा आणि तातडीने योजना राबविण्याच्या सूचना द्या, तरीही त्यांनी दाद न दिल्यास मला सांगा. मग, त्यांच्यावर काय कारवाई करायची, हे मी ठरवतो, असा इशारा दिला. 

महात्मा फुले जनआरोग्य योजना राबविण्यासाठी सरकारने लागू केलेले निकष शिथिल करण्याची घोषणाच त्यांनी येथे केली. केवळ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्येच ही योजना राबविण्याचा आग्रह न धरता पन्नास, पंचवीस किंवा अगदी दहा-वीस बेड असलेल्या रूग्णालयांना किंवा दवाखान्यांना या योजनेत बसवा, अशा सूचना त्यांनी केली. इतरत्र ही योजना मिळावी; म्हणून अनेक लोक आमचा पिच्छा पुरवतात, रूग्णालय प्रशासन आमच्या मागे लागते आणि शिरूर तालुक्‍यात अशी अवस्था असेल तर चौकशी करावी लागेल, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला. 

कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देण्यास खासगी डॉक्‍टर नकार देत असल्याची तक्रारही स्थानिक कार्यकर्त्यांनी केली असता, अशा प्रकारे आरोग्य विषयक सेवा कार्यास नकार दिल्यास नोंदणी रद्द होऊ शकते, याची कल्पना टाळाटाळ करणारांना द्या, अशा कडक शब्दांत त्यांनी आरोग्यविषयक सेवाकार्यातून पळ काढू पाहणाऱ्या डॉक्‍टरांना सुनावले. 

माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते मंगेश खांडरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष महिबूब सय्यद, मनविसेचे तालुकाध्यक्ष स्वप्निल माळवे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस राहिल शेख, शिवसेनेचे शहर संघटक राजेंद्र शिंदे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी यांनी आरोग्यमंत्री टोपे यांचे शहरात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आरोग्यविषयक अडीअडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com