पुणे झेडपीतील वाद : अजित पवार विरुद्ध खासदार संजय राऊत 'सामना' रंगण्याची चिन्हे

राष्ट्रवादीकडून कोंडी होत असल्याची शिवसेनेची खेडमध्ये तक्रार
sanjay-raut-ajit-pawar-ff.jpg
sanjay-raut-ajit-pawar-ff.jpg

राजगुरूनगर : खेड तालुका पंचायत समितीच्या नवीन इमारतीवरून खेडचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते आणि माजी आमदार सुरेश गोरे यांच्यामध्ये धुमसणारा वाद आता मुंबईत उच्च राजकीय स्तरावर पोहचला असून, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांचाही या वादनाट्यात प्रवेश झाला असल्याने, आता राऊत विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार असा सामना रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पंचायत समितीच्या नवीन मंजूर इमारतीचे काम सध्या निश्चित केलेल्या जागेवर करण्याचे थांबवावे आणि मूळ पंचायत समितीच्या परिसरातच ही इमारत बांधण्यासाठी नव्याने प्रक्रिया सुरू करावी, असे तोंडी आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १९ फेब्रुवारी रोजी राजगुरूनगर भेटीत अधिकाऱ्यांना दिले होते. त्यामुळे काम सुरु होता होता थांबले.

आता सुरेश गोरे यांच्या विनंतीवरून  खासदार संजय राऊत यांनी, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना १ सप्टेंबर रोजी एक पत्र देऊन,  हे काम पूर्वीच्या मंजुरीप्रमाणे ठरलेल्या जागीच, अगोदरच दिलेल्या कार्यारंभ आदेशाप्रमाणे त्वरित सुरू करण्याचे आदेश द्यावेत, असे सांगितले. त्यानुसार सत्तार यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद ताबडतोब काम सुरु करण्याचे आदेश दिले. 

खेड पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीला सेना-भाजप युतीचे सरकार असताना २०१९ साली मंजुरी मिळाली. त्यासाठी तत्कालीन ग्रामविकास मंत्री दादाजी भुसे यांनी साडेतीन कोटींचा निधी मंजूर केला. त्यानुसार
खेड पंचायत समितीच्या पुढील जागेत पंचायत समितीची प्रशासकीय इमारत बांधण्यात येणार होती. त्या कामाची निविदा मंजूर होऊन कार्यादेशही देण्यात आला. तसेच भूमिपूजनही झाले.मात्र सरकार बदलले. तालुक्यातही शिवसेनेचे आमदार गोरे पायउतार झाले तर माजी आमदार दिलीप मोहिते पुन्हा निवडून आले.

 त्यानंतर ही इमारत कोणत्या जागेत बांधायची यासाठी आजी माजी आमदारांमध्ये आणि त्यांच्याबरोबरीने  तालुक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाली. पंचायत समितीच्या इमारतीसाठी ही जागा योग्य नसल्याचे सांगत, या जागेत सर्व कार्यालये असलेले सचिवालय बांधावे व सध्या पंचायत समिती असलेल्या जागेतच पंचायत समितीची प्रशासकीय इमारत बांधावी असा आग्रह मोहिते यांनी धरल्याने हे काम रखडले. दरम्यान उपमुख्यमंत्री पवार यांनी १९ फेब्रुवारी रोजी खेड पंचायत समितीला भेट देऊन जुन्या इमारतीची पाहणी केली आणि काम थांबविण्याचे तोंडी आदेश दिले. तसेच त्या जागेत मोहिते यांच्या म्हणण्याप्रमाणे, प्रांत, तहसीलदार, बांधकाम इत्यादी सर्व कार्यालये एकत्र आणणारी सचिवालयाची इमारत बांधण्यासाठी अंदाजपत्रक तयार करावे, त्यासाठी निधी उपलब्ध करुन देऊ, असेही पवार यांनी सांगितले.  

त्यामुळे हे काम बंद होते. म्हणून मध्यंतरी शिवसेनेने पंचायत समिती आवारात आंदोलन करून काम करु करण्याची मागणी केली. तसेच त्या जागेतील झाडेही कापली. तरीही काम सुरू न झाल्याने, त्यांनी राऊत यांच्याकडे धाव घेतल्यावर राऊत यांनी या विषयात उडी घेऊन राज्यमंत्री अत्तारांना पत्र दिले. अत्तारांच्या या पत्रानंतर जिल्हा परिषद काय भूमिका घेणार, याकडे आता लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काॅंग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे येथे अडवणूक होत असल्याची शिवसेनेची तक्रार आहे. त्यावरून सेना नेत्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com