खेडमध्ये सेना-भाजपचे 'तुझ्या वाचून करमेना'.. तर सेना-राष्ट्रवादीत 'तुझं माझं जमेना'  - pune politics Shiv Sena BJP friendship in Khed Shiv Sena NCP dispute | Politics Marathi News - Sarkarnama

खेडमध्ये सेना-भाजपचे 'तुझ्या वाचून करमेना'.. तर सेना-राष्ट्रवादीत 'तुझं माझं जमेना' 

रुपेश बुट्टेपाटील 
शनिवार, 27 मार्च 2021

खेड तालुक्यात  सेना आणि भाजपामध्ये  'तुझ्या वाचून करमेना' अशी परिस्थिती आहे.

आंबेठाण : राज्यात महाविकास आघाडीत राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्ष एकत्र आहेत. परंतु स्थानिक पातळीवर मात्र यांच्यात विस्तवही जात नसल्याचे चित्र आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत तालुका पातळीवर 'तुझं माझं जमेना' अशी अवस्था आहे. मात्र, राज्यात एकमेकांचे कट्टर विरोधक असणाऱ्या सेना आणि भाजपामध्ये खेड तालुक्यात मात्र 'तुझ्या वाचून करमेना' अशी परिस्थिती आहे.

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर राज्यासह तालुक्यात भाजप काहीशी बॅकफूटवर गेलेली पहायला मिळाली. खेड तालुक्यात पंचायत समितीच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सुरू असलेला संघर्ष सर्वश्रुत आहे. राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र खेड तालुक्यात सगळे काही आलबेल असल्याचे अजिबात चित्र नाही.

राज्यात सत्ताधारी म्हणून त्यांच्यात अजिबात सुसंवाद दिसत नाही. मागील काही महिन्यांपासून पंचायत समिती इमारतीच्या बांधकामाच्या जागेवरून उभा राहिलेला वाद राज्य पातळीपर्यंत जाऊन पोहचला आहे. सध्याच्या पंचायत समितीच्या समोर असणाऱ्या जागेवर नवीन इमारत उभी राहावी हे स्व. माजी आमदार सुरेश गोरे यांचे स्वप्न होते आणि तीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. याशिवाय त्यासाठी निधी देखील मंजूर आहे, असे शिवसेनेचे म्हणणे आहे.

दुसरीकडे सर्व सरकारी कार्यालये एकत्र आणून आताच्या पंचायत समितीच्या समोरच्या जागेवर नवीन प्रशासकीय इमारत व्हावी आणि आताच्या पंचायत समितीच्या जागेवर (मागे सारून) नवीन पंचायत समितीची इमारत व्हावी, असे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे यावरून तालुक्यात दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे एकीकडे राज्यात सत्तेत राहून सत्ता उपभोगायची आणि दुसरीकडे मात्र तालुक्यात भांडायचे अशी सद्यस्थिती दोन्ही पक्षांची आहे. शिवसेना एकीकडे राज्यातील सत्तेत सहभागी असणाऱ्या राष्ट्रवादी बरोबर तालुक्यात भांडत आहे तर दुसरीकडे राज्यात कट्टर विरोधक असणाऱ्या भाजप बरोबर मात्र तालुक्यातील शिवसेना लोकप्रतिनिधी दौरे करताना दिसत आहे. 

तालुक्यात भाजपचे जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या गटात नुकत्याच झालेल्या विविध विकासकामांच्या उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमाला हे दोन्ही पक्षांचे नेते एकाच गाडीत फिरताना दिसत होते. त्यामुळे सत्तेत एकत्र असणाऱ्या सत्ताधारी पक्षाची साथ सोडून राज्यात विरोधी असणाऱ्या भाजप बरोबर सेना नेत्यांनी लोकांमध्ये जाणे म्हणजे तालुक्यात नव्या समीकरणाची नांदी तर नाही ना ? असा सवाल निर्माण होत आहे. 

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते यांनी आढळराव यांना भाजपमध्ये जाण्याची घाई झाली आहे, असे विधान केले होते. त्यानंतर शिवसेना पदाधिकारी भाजप नेत्यांच्या समवेत तालुक्यात फिरत असल्याने एकप्रकारे मोहिते यांच्या विधानाला बळकटी येत आहे. काही दिवसांवर बाजार समिती निवडणूक आणि त्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यातच सेना-भाजपची वाढलेली जवळीक म्हणजे तालुक्यात 'हवा बदल रही है' चा प्रत्यय येत आहे.

अनेकांच्या भुवया उंचावल्या 

भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील आणि अतुल देशमुख यांच्या जिल्हा परिषद गटात नुकतेच विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन झाले. त्याला शिवसेनेचे नेते आणि पंचायत समिती सभापती भगवान पोखरकर ,उपसभापती चांगदेव शिवेकर, शिवसेनेचे माजी सभापती अंकुश राक्षे यांची उपस्थिती होती. 
जरी हा कार्यक्रम राजकीय नसला तरी सेना भाजपचे आघाडीचे नेते एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Edited  by :  Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख