शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील सरपंचपदाबाबतचे अपिल जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी फेटाळल्याने शिरुरच्या ७१ सरपंच निवडीचा प्रश्न मार्गी लागला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शिरुरची सरपंच निवड तारीख कधी जाहीर होते, याकडे आता गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
शिक्रापूर येथे अनुसुचित जाती-जमातीसाठी सरपंच आरक्षण निश्चित झाल्याने शिक्रापूरचे सरपंच आता बांदल गटाचे रमेश गडदेच होणार हे निश्चित झाल्याची माहिती गडदे यांचे वकील अॅड. एम. जे. शिर्के व अॅड. ज्योती डी. गायकवाड यांनी दिली. शिक्रापूरच्या सरपंच आरक्षण अनुसुचित जाती जमातीचे आल्याने याबाबतच उच्च न्यायालयात रमेश राघोबा थोरात, पूजा दिपक भुजबळ व मोहिनी संतोष मांढरे यांनी याचिका दाखल केल्याने सरपंच निवडीच्या कार्यक्रमावर निर्बंध येवून याबाबतची सुनावणी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या पुढे नुकतीच झाली.
मास्कच्या नियमांची सक्तीने अंमलबजावणी करणार#राजकीय #महाराष्ट्र #Sarkarnama #Viral #ViralNews #राजकारण #MarathiNews #MarathiPoliticalNewshttps://t.co/muUkRl9lda
— Sarkarnama (@SarkarnamaNews) February 17, 2021
थोरात, भुजबळ व मांढरे तसेच सरपंच पात्र ग्रामपंचायत सदस्य रमेश गडदे यांनीही आपली बाजू जिल्हाधिका-यांपुढे मांडली व त्याचा निकाल नुकताच जिल्हाधिका-यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार वरील तीनही याचिकाकर्त्यांचे अपिल फेटाळत असल्याचा त्यांनी निकाल दिला आहे. त्यानुसार आता शिक्रापूरचे सरपंचपदी रमेश गडदे हेच विराजमान होतील असा दावा गडदे यांचे वकील अॅड. एम. जे. शिर्के व अॅड. ज्योती डी. गायकवाड यांनी केला आहे.
अपिल सर्वोच्च न्यायालयात नव्हे तर आयुक्तांकडे...!
शिरुर तालुक्यातील ७१ सरपंचांचे भवितव्य टांगणीला लागलेल्या शिक्रापूरच्या प्रकरणाबाबत आता पुन्हा थोरात व इतर दोघे सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांच्या म्हणण्यानुसार सदर अपिल आता आयुक्तांकडे करणे शक्य आहे. न्यायालयाने निवडणूक शाखेकडे याबाबत निर्णय देण्यास सांगितलेली आहे. आयुक्तांच्या निर्णया नंतर हे प्रकरण तूर्तास सर्वोच्च न्यायालयात जाईल, पण अशी स्थिती नाही.
शिक्रापूरचा निकाल जिल्हाधिका-यांनी दिला असला तरी अध्याप तालुक्यातील ७१ सरपंच निवडीचा कार्यक्रम घेण्याचे वेळापत्रक जिल्हाधिकारी कायालयाकडून आलेले नाही. पुढील दोन दिवसात निवडणूक कार्यक्रम येईल, सर्व सदस्यांना याबाबतच्या निवडणूक कार्यक्रमाच्या सूचनापत्र जातील आणि मगच निवडणूक लागेल. अर्थात जास्तीत जास्त २८ तारखेपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होतील, असा अंदाज असल्याचे तहसिलदार लैला शेख यांनी व्यक्त केला आहे.

