पूजा चव्हाण प्रकरणी पीआय लगड यांना निलंबित करा...  - pune police Suspend PI Lagad in Pooja Chavan case | Politics Marathi News - Sarkarnama

पूजा चव्हाण प्रकरणी पीआय लगड यांना निलंबित करा... 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 25 फेब्रुवारी 2021

वानवडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक दिपक लगड यांना निलंबित करा, अशी मागणी वाघ यांनी केली आहे.

पुणे : "पूजा चव्हाण प्रकरणात कुणाला वाचविण्याचे आदेश दिले जात आहेत, पोलिस अॅक्शन मोडमध्ये का येत नाही, आदी प्रश्न भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज उपस्थित केले आहेत. चित्रा वाघ यांनी पूजा राहत असलेल्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या."ही शिवशाही आहे की मोगलाही, हे तुमच्या कृतीतून दिसू द्या," असे आवाहन वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे. वानवडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिपक लगड यांना निलंबित करा, अशी मागणी वाघ यांनी केली आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, "पूजा चव्हाण प्रकरणात प्रत्यक्षदर्शीनी पोलिसांना सर्व माहिती दिल्यानंतरही पोलिसांनी कारवाई का केली नाही, पोलिस कुणाच्या आदेशाची वाट पाहत आहेत. संजय राठोड यांना वाचविण्यासाठी हे केले जात आहे. वानवडी पोलीस रगेलपणे बोलत आहेत, असे चित्रा वाघ म्हणाल्या.   

  
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहानानंतर भाजपने आपला मोर्चा पुढे ढकलला. पण त्यांच्याच मंत्र्यांने आपण निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यासाठी गर्दी जमविली. मुख्यमंत्र्यांचे नियम धाब्यावर बसवून या मंत्र्यांनी कोरोना पसरविण्याचे काम केलं आहे. बलात्कारी नेत्यांना वाचविण्यासाठी सरकारच्या घटक पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे, असा आरोप वाघ यांनी यावेळी केला. 
 
चित्रा वाघ यांनी वानवडी पोलिसांवर आरोप केले. या प्रकरणाची चैाकशी करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी त्यांनी केली. वाघ म्हणाल्या की पोलिस हे रक्षक नसून भक्षक आहेत. या प्रकरणात साधी तक्रारही वानवडी पोलिसांनी दाखल केली नाही, वानवडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक लगड यांची भूमिका संशयास्पद आहे.  

 

या घटनेमागे संजय राठोड आहेत, हे १०० नंबरला कॉल करून सांगण्यात आलं होतं, पण पुणे पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही. घटनेच्या दिवशी सकाळी ७ ते ७:३० दरम्यान १०० क्रमाकांवर आलेले कॉल पोलिसांनी जाहीर करावेत. यवतमाळ हॉस्पिटल येथे ज्या डॉक्टरची शिफ्ट नव्हती त्या डॉक्टरने पूजावर ट्रीटमेंट केली. इतके योगायोग कसे असू शकतात का ? असे वाघ म्हणाल्या. 

 
मी शरद पवार यांच्या तालमीत मी तयार झाले आहे, त्याचा मला अभिमान आहे. शरद पवार साहेबांना मी ओळखते, त्यांना पूर्ण माहिती मिळाली असेल तर ते हा प्रकार सहन करणार नाहीत.
- चित्रा वाघ

चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेले प्रश्न... 

 1. विलास चव्हाण आणि अरुण राठोड कुठं आहेत?
 2. दोघांची चौकशी का गेली नाही? त्या दोघांना का सोडून दिलं?
 3. पोलिसांनी तपासच करायचा नाही? असं ठरवलं आहे का?
 4. पीआय लगड यांचा बोलविता धनी कोण आहे.?   
 5. अरुण राठोडचा मोबाइल कुठं आहे?
 6. संजय राठोड यांची चौकशी झालीच नाही? मग अहवाल कसा? 
 7. अरुण राठोडचे कॉल्स डिटेल्स का उपलब्ध नाहीत?
 8. अरुण राठोडच्या घरी चोरी कशी काय झाली?
 9. यवतमाळच्या डॉक्टरांनी लगेचच सुट्टीवर जाण्याचा निर्णय का घेतला?
   
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख