गुंडाला श्रद्धांजलीबद्दल `महाप्रसाद`.. पण गुंड मारणेच्या मिरवणुकीकडे पोलिसांचे महादुर्लक्ष - pune police have not taken strict action against supporter of gangster Gaja Marane | Politics Marathi News - Sarkarnama

गुंडाला श्रद्धांजलीबद्दल `महाप्रसाद`.. पण गुंड मारणेच्या मिरवणुकीकडे पोलिसांचे महादुर्लक्ष

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्राचा किंग म्हणून मारणेच्या पाठिराख्यांनी बिरूद लावले होते. 

पुणे :  कुख्यात गुंड सचिन शिंदेच्या खूनानंतर त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठे फ्लेक्स फलक लावणाऱ्या  युवकांना शिक्रापूर पोलिसांनी यथेच्च चोप देवून पुणे जिल्हा पोलिसांनी गुन्हे दाखल केले. दुसरीकडे एका गुंडांने एका खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका झाल्यानंतर मुंबईतील थेट तळोजा कारागृह ते पुणे अशी तीनशे वाहनांची रॅली काढण्याचे धाडस दाखवले. पोलिसांनी या रॅलीला वेळीच अटकाव का केली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला. पुण्यात काही दिवसांपूर्वी येरवडा पोलिस ठाण्यातून सुटका झालेल्या गुंडाच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती.

पुणे जिल्हा पोलिसांनी जशी कठोर भूमिका गुंडाच्या उदात्तीकरणाविरोधात घेतली तशी पुणे शहर पोलिसांनी का केले नाही, अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली. अमोल बधे आणि पप्पू गावडे यांच्या खूनातून निर्दोष मुक्तता झालेल्या मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजानन मारणेची थेट तळोजा कारागृहापासून त्याची पुण्यापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. पुणे पोलिसांनी मारणे टोळीला मोक्कानुरास कारवाई केली होती. तब्बल तीन वर्षे मारणे याला कारागृहात डांबले होते. त्याच्याविरोधातील खुनाच्या गुन्ह्यात एकही साक्षीदार खटल्याच्या सुनावणी दरम्यान पोलिस टिकवू शकले नाहीत आणि या सगळ्या गुन्ह्यातून त्याची निर्दोष सुटका झाली. गजाच्या समर्थकांनी मुंबई आणि पुणे जिल्हा ग्रामीण आणि शहराच्या पोलिसांना आव्हान देत तब्बल 300 पेक्षा जास्त चार चाकी गाड्या घेऊन सव्वाशे किलोमीटर मिरवणूक काढली.

मुंबई, रायगड, पुणे जिल्हा, पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहर या पाच पोलिसांच्या हद्दीतून मारणे नाकासमोर मिरवणुकीने गेला तरी कोणीच अटकाव केला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.  या मिरवणुकीचे ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शूटिंग करण्यात आले. पोलिसांनी गर्दी जमवल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर नंतर गुन्हे दाखल केले. 

दुसरीकडे वाघोली येथे शिंदेचा खून झाल्यानंतर त्याच्यावर स्तुतीसुमने उधळणारे व त्याच्या गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे अनेक फलक पुणे-नगर महामार्गासह गावागावांमध्ये लागले होते. या सर्व फलकांची पोलिसांनी माहिती घेतली व ज्या फलकांवर श्रध्दांजली अर्पण करणारांची नावे होती त्या युवकांना शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये बोलावून घेवून सर्वांना यथेच्छ चोप देण्यात आला. या शिवाय या सर्वांवर सरकारी जागेचे विद्रुपीकरण तसेच याच अनुषंगाने काही गुन्हे दाखल करण्यात आले व तात्काळ अटकसत्रही सुरू करण्यात आले. पुणे पोलिस मात्र गजा मारणेच्या पाठिराख्यांवर अशी कारवाई करण्यात कमी पडले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख