मोका लावलेला रवींद्र बऱ्हाटे पोलिसांच्या हाती लागेना  - Pune police could not find Ravindra Barhate | Politics Marathi News - Sarkarnama

मोका लावलेला रवींद्र बऱ्हाटे पोलिसांच्या हाती लागेना 

सरकारनामा ब्यूरो 
सोमवार, 9 नोव्हेंबर 2020

अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. मात्र, तेथेही त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे

पुणे ः महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मोका) कारवाई करण्यात आलेला तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलिसांनी त्याला फरारी घोषित करून आज (ता. 9 नोव्हेंबर) 17 दिवस उलटले आहेत. 

बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी यांच्याकडे खंडणी मागून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात झाला होता. या प्रकरणात आठ आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. 

खंडणी, धमकाविणे, बेकायदा सावकारी आणि आर्थिक फसवणूक असे विविध गुन्हे बऱ्हाटेवर दाखल आहेत. या गुन्ह्यांत अटकपूर्व जामीन मिळावा; म्हणून त्याने अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. मात्र, तेथेही त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यानंतर तो पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे त्याला पुणे पोलिसांनी 23 ऑक्‍टोंबर रोजी फरारी घोषित केले आहे. 

बऱ्हाटे व त्याच्या साथीदारांच्या विरोधात विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्याच्या अनेक साथीदारांना अटक करण्यात आली आहे. मात्र बऱ्हाटे हा पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून शहरातून पसार झाला आहे. बऱ्हाटेची लुल्लानगर, धनकवडीतील तळजाई पठार येथे घरे आहेत. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी तेथे छापा टाकून काही कागदपत्रे जप्त केली आहेत. मात्र, बऱ्हाटे पोलिसांच्या हाती सापडला नाही. 

बऱ्हाटेबाबत माहिती मिळाल्यास कळवा 

बऱ्हाटेबाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी त्वरित कोथरूड पोलिसांशी (दूरध्वनी क्रमांक 020-25391010 किंवा 25391515 ) संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन कोथरूडच्या पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी केले. 

कोर्टात हजर राहण्याच्या फर्मानाचे शहरात फलक 

बऱ्हाटे याने न्यायालयात हजर होण्याचे फर्मान जाहीर करण्यात आले होते. त्याचे फलक शहरातील काही भागात लावण्यात आले आहेत. बऱ्हाटे याने सात नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर न्यायालयातील न्यायालय क्रमांक एकसमोर उपस्थित व्हावे, असे या फलकातील फर्मानात नमूद आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख