pune divisional commissioner dr deepak mhaisekar on private hospitals | Sarkarnama

रूग्णालये ताब्यात घेण्याऐवजी शुल्क कमी घेण्याचे आवाहन करण्याचे कारण काय?

उमेश घोंगडे  
सोमवार, 1 जून 2020

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रूग्णालयांचे प्रमुख तसेच वैद्यकीय आधिकाऱ्यांची बैठक आज डॉ. म्हैसेकर यांनी घेतली.

पुणे : पुण्या-मुंबईसह राज्यात मेस्मा कायदा लागू करण्यात आला असून आवश्‍यकतेनुसार राज्य सरकार खासगी रूग्णालये ताब्यात घेण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या आठवड्यात घेतला होता. मात्र, रूग्णालय ताब्यात न घेता खासगी रूग्णालयांनी सरकारने घालून दिलेल्या सूचनांनुसार दर आकारणी करावी, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज सांगितले. रूग्णालये शुल्क घेणार असतील तर खासगी रूग्णालये ताब्यात घेण्याच्या सरकारच्या निर्णयाचे काय झाले असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रूग्णालयांचे प्रमुख तसेच वैद्यकीय आधिकाऱ्यांची बैठक आज डॉ. म्हैसेकर यांनी घेतली. या बैठकीत रूग्णालयांनी सरकारी दरानुसार रूग्णांकडून शुल्क घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. मात्र, पुण्यात कोरोनामळे वैद्यकीय आणीबाणी असताना सरकारच्या आदेशानुसार गरजेनुसार खासगी रूग्णालये ताब्यात घेण्याचे आधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात आले आहेत. पुण्यातील वैद्यकीय सेवा कोलमडली आहे. या काळात विभागीय आयुक्तांनी रूग्णालये ताब्यात घेण्याऐवजी शुल्क कमी घेण्याचे आवाहन करण्याचे कारण काय ? असा प्रश्‍न करण्यात येत आहे.

दरम्यान, या बैठकीत बोलताना विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘‘राज्य शासनाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मेस्मा, आपत्कालिन व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायद्यांमधील तरतुदींच्या अनुषगांने खाजगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. खासगी रुग्णालयांनी शासनाच्या आदेशात दर निश्चित करून दिल्यानुसार दर आकारणी करावी. खाजगी रुग्णालयांनी रुग्ण सेवा चोखपणे बजवावी, तसेच कोरोना प्रतिबंधाबाबत समाजमाध्यमांमध्ये जनजागृती करावी, असे सांगून रुग्णालयांच्या अडचणी निश्चितच दूर केल्या जातील.’’

कोरोनावर उपचार करणा-या हॉस्पिटलचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका व अन्य वैद्यकीय सुविधांचे व्यवस्थापन व इतर आवश्यक माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी तयार केलेल्या ‘कोविड केयर सॉप्टवेअर’बाबत डॉ.म्हैसेकर यांनी बैठकीत माहिती दिली. पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण, उपचार करण्यात आलेले रुग्ण, हॉस्पिटलमधील सोयी-सुविधा, रुग्णवाहिका व्यवस्था, अधिक रुग्ण असलेली क्षेत्रे, रुग्णांचे समुपदेशन, मृत्यूदर कमी करण्यासाठी उपाययोजना, डॉक्टरांना आवश्यक सोयी-सुविधा, पीपीई किट, सॅनिटायझर आदी वैद्यकीय साधनसामग्रीची उपलब्धता, उपलब्ध आणि आवश्यक डॉक्टर व परीचारकांची संख्या अशा विविध बाबींचा डॉ. म्हैसेकर तसेचजिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आढावा घेतला.

 

राज्य शासनाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी मेस्मा, आपत्कालिन व्यवस्थापन कायदा, साथरोग नियंत्रण कायद्यांमधील तरतुदींच्या अनुषगांने खाजगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे.- डॉ. दीपक म्हैसेकर

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख