मंगलदास बांदलांच्या तीन घरांवर पोलिसांची छापेमारी; महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याची माहिती 

या कारवाईबाबत जिल्हा पोलिसांनी अत्यंत गोपनियता पाळली आहे.
Pune District Police raid on three houses of Mangaldas Bandal
Pune District Police raid on three houses of Mangaldas Bandal

शिक्रापूर (जि. पुणे) : पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या अटकेनंतर त्यांच्या शिक्रापूर, बुरुंजवाडी व हडपसर येथील घरांची झाडाझडती जिल्हा पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने नुकतीच करण्यात आली. या धाडसत्रात फारसे काही हाताला लागले नसल्याचा दावा शिक्रापूर पोलिस करीत असले तरी काही स्थावर व जंगम मालमत्तांची कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखने ताब्यात घेतल्याची माहिती आहे. पोलिस दलाच्या मोठ्या फौजफाट्याकडून झालेल्या या कारवाईबाबत जिल्हा पोलिसांनी अत्यंत गोपनियता पाळली आहे. (Pune District Police raid on three houses of Mangaldas Bandal)

बांदल यांना 26 मे रोजी एका गुन्ह्यातील अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याची कागदपत्रे जमा करायला गेले हेाते. त्या वेळी दत्तात्रेय मांढरे यांच्या तक्रारीवरुन बांदल यांच्यासह  त्यांच्या पत्नी, जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, गोविंद शंकर झगडे, मोहन जयसिंग चिखले व आणखी एकावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. त्यात बांदलांना अटक होवून १ जूनपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. 

याच पार्श्वभूमिवर जिल्हा पोलिसांनी बांदलांची आणखी सखोल चौकशी करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार घरांची झाडाझडती घेतली. त्यानुसार बांदल यांच्या शिक्रापूर, बुरुंजवाडी (ता. शिरूर) तसेच हडपसर (पुणे) येथील बंगल्यांची झाडाझडती घेतली. उपलब्ध माहितीनुसार आर्थिक गुन्हे शाखा व स्थानिक गुन्हे शाखेचे पाच अधिकारी व जवळपास 22 कर्मचारी संपूर्ण दिवसभर झाडाझडती घेत होते. 

या कारवाईतील एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई आम्ही केली. यात जमिनी व स्थावर मालमत्तांबाबत काही वाद, कुणाच्या तक्रारी आणि जमिनींच्या व्यवहारांच्या फसवणुकीच्या अनुषंगाने आम्ही सर्व कागदपत्रे त्यांच्या तीनही घरातून मिळाली आहेत. त्या सर्व कागदपत्रांची चौकशी करुन पुढील कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. 

दरम्यान शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांची भेट घेतली असता त्यांनी या कारवाईला दुजोरा देताना सांगितले की, बांदलांवरील सर्व गुन्ह्यांची चौकशी आणि पुढील कारवाई याबाबत पोलिस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख व इतर सर्व वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत. आर्थिक गुन्हे शाखा व स्थानिक गुन्हे शाखा तसेच शिक्रापूर पोलिस असे एकत्रित कामकाजाचे स्वरूप आहे.
 
बांदलांच्या विरोधात पोलिसांकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी येत होत्या. सध्याही अनेक जण तक्रारी करीत आहेत, त्या कागदावर आल्या तर पोलिस कारवाई होणारच, असे शेडगे यांनी सांगितले. 

त्या पोलिस कर्मचाऱ्यांना मुद्दाम दूर ठेवले 

शिक्रापूर पोलिस ठाण्यात उभ्या ट्रकमधून नऊ महिन्यांपूर्वी वाळू चोरी झाल्यापासून ते येथील काही कर्मचारी पोलिस दलाच्या विरोधातच उद्योग करीत असल्याचे एव्हाना जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्याच लक्षात आले होते. त्यामुळे बांदलांवरील कारवाईत अत्यंत गोपनियता पाळली जात आहे. गेल्या पंधरा दिवसांतील घडामोडींमध्ये शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ज्या-ज्या पोलिस कारवाया झाल्या, त्या प्रत्येक कारवाईत संबंधित मंडळींना दूर ठेवण्यात आल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com