इंदापूरच्या राजकारणात गाजणाऱ्या लाकडी-निंबोडी योजनेसाठी अजित पवारांनी केली तरतूद 

या योजनेचे राजकारण करून अनेकांनी स्वत:ची पोळी भाजण्याचा प्रयत्न केला.
Provision made by Ajit Pawar in the budget for Lakdi-Nimbodi Irrigation Scheme
Provision made by Ajit Pawar in the budget for Lakdi-Nimbodi Irrigation Scheme

वालचंदनगर (जि. पुणे) : इंदापूर तालुक्‍याच्या राजकारणात गेल्या 25 वर्षांपासून गाजत असलेल्या लाकडी-निंबोडी सिंचन योजनेसाठी अर्थमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात तरतूद करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. या योजनेसाठी तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी तथा राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी संपूर्ण ताकदीने केलेला पाठपुरावा कामाला आला आहे. लाकडी-निंबोडी योजनेभोवती फिरणारे राजकारण आता थांबणार आहे. ह्या योजनेसाठी तरतूद होताच नागरिकांनी पेढे वाढून आनंद व्यक्त केला. 

इंदापूरचे राजकारण कायम पाणीप्रश्‍नाभोवती फिरत असते. तालुक्‍यात विद्यमान राज्यमंत्री भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यात कायम पाणीप्रश्‍नावरून आरोप-प्रत्यारोप रंगलेले आहेत. विधानसभा निवडणुकीतही आश्‍वासनाचे पतंग उडवत आजपर्यंत या लाकडी-निंबोडी सिंचन योजनेवरून राजकारण केले गेले आहे. त्यामुळे गेल्या 25 वर्षांपासून ही योजना मार्गी लागण्याऐवजी राजकारण करण्याचे केंद्रबिंदू बनली होती. 

माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही अनेकदा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात लाकडी-निंबोडी योजनेचा उल्लेख केला होता. पण ती योजना पुढे सरकत नव्हती. विद्यमान लोकप्रतिनिधी दत्तात्रेय भरणे यांनीही योजना मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यादृष्टीने त्यांनी पाठपुरावाही सुरू केला होता. इंदापुरात नुकत्याच झालेल्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेबाबत उल्लेख केला होता. त्यामुळे ही योजना मार्गी लागण्याबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. अजित पवारांनी त्या सभेत दिलेले आश्‍वासन या योजनेसाठी निधीची तरतूद करत पूर्ण केले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या प्रयत्नांमुळे पहिल्यांदाच इंदापूर तालुक्‍यासाठी भरीव निधीची तरतुद झाल्याने तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला. अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद झाल्यामुळे लाकडी-निंबोडी सिंचन योजनेला गती मिळणार आहे. या योजनेमुळे सुमारे 4. 5 हजार हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यात लाकडी, निंबोडी, काझड, लामजेवाडी, म्हसोबाचीवाडी, शेटफळगढे, निरगुडे, शिंदेवाडी या गावांचा समावेश असणार आहे. भवानीनगरमध्ये लाकडी-निंबोडीमधील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पेढे वाटून आनंद व्यक्त केला. 

भरणेमामांचे काम पिढ्यानपिढ्या लक्षात राहील 

इंदापूर खरेदी विक्री संघाचे संचालक व निंबोडी येथील शेतकरी अमोल भोईटे यांनी सांगितले की, गेल्या 25 वर्षांपासून लाकडी -निंबोडी जलसिंचन योजना रखडली होती. या योजनेचे राजकारण करून अनेकांनी स्वत:ची पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. मात्र राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी पहिल्यांदा मंत्री होताच योजनेचे काम मार्गी लावले आहे. या योजनेमुळे या परिसरातील शेतकऱ्यांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी सुटणार आहे. भरणेमामांचे काम पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांच्या लक्षात राहणार असल्याचे भोईटे यांनी सांगितले. 

इंदापूर तालुक्‍यातील शेतीच्या पाण्याचे व पिण्याच्या पाण्याचे प्रश्‍न कायमस्वरुपी सोडविणार आहे. तालुका सुजलाम सुफलाम करणार आहे. 

-दत्तात्रेय भरणे, राज्यमंत्री 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com