श्रीमंत कोकाटे यांच्या उमेदवारीस प्रवीण गायकवाडांचा पाठिंबा  - Praveen Gaikwad supports Shrimant Kokate's candidature | Politics Marathi News - Sarkarnama

श्रीमंत कोकाटे यांच्या उमेदवारीस प्रवीण गायकवाडांचा पाठिंबा 

मिलिंद संगई 
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिलेले उमेदवार राजकीय पार्श्वभूमी असलेले साखर सम्राट व विधानसभा लढवलेले आहेत.

बारामती : पुणे पदवीधर मतदार संघातून श्रीमंत कोकाटे यांची उमेदवारी कायम ठेवली असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आज (ता. 13 नोव्हेंबर) बारामतीत पत्रकारांशी बोलताना दिली. 

दरम्यान, श्रीमंत कोकाटे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून इच्छुक होते. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसने सांगली जिल्ह्यातील अरुण लाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतरही कोकाटे यांनी आपला अर्ज कायम ठेवत निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचे सांगितले आहे. 

श्रीमंत कोकाटे यांच्या उमेदवारीचे समर्थन करताना गायकवाड यांनी कोकाटे हे पदवीधरसाठी अत्यंत योग्य उमेदवार असल्याचे नमूद केले आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राजकीय पक्षांनी ढवळाढवळ करू नये. ही काही राजकीय स्वरूपाची निवडणूक नाही आणि राजकीय पक्षांनी यात हस्तक्षेप करणे योग्य नाही. पदवीधर मतदारसंघासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचे चिन्ह वापरले जात नाही. बहुजन समाजाचे प्रतिनिधी म्हणून ते निश्‍चित निवडून येतील, असा आपला विश्वास असल्याचे प्रवीण गायकवाड यांनी नमूद केले. 

पदवीधर मतदारसंघाची रचना ही वेगळी आहे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा किंवा विधान परिषद याहून हा मतदारसंघ वेगळा आहे. शिक्षणाशी संबंधित बाबी महत्वाच्या आहेत. दर्जेदार तसेच मोफत नाही तर माफक तरी शिक्षण मिळायला हवे. बेरोजगारांचा प्रश्न बिकट आहे, असे प्रश्न मांडणी करणाऱ्यांची गरज आहे. 

दरम्यान, भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिलेले उमेदवार राजकीय पार्श्वभूमी असलेले साखर सम्राट व विधानसभा लढवलेले आहेत. पदवीधर निवडणुकीत तरी किमान राजकारण येऊ नये, अशी माझी अपेक्षा आहे, प्रत्यक्षात तसे होत नाही, ही बाब निषेधार्ह आहे. 

ही निवडणूक साखर कारखान्यांची नव्हे; पदवीधरांची : डॉ. कोकाटे 

ही निवडणूक साखर कारखान्यांची नाही, तर सुज्ञ पदवीधरांची निवडणूक आहे. कोणाला निवडूण द्यायचे हे पदवीधरांनी आधीच ठरवले आहे. ज्या काळात काहीजण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना फितूर झाले होते. त्यावेळी, आम्ही भाजप आणि आरएसएस विरुध्द बंड पुकारले होते. दोन वर्षापासून पदवीधरांच्या संपर्कात आहे. त्यामुळे आता माघार नाही, तर पदवीधरांच्या हितासाठी स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार असल्याची माहिती डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी "सरकारनामा'शी बोलताना दिली. 

डॉ. कोकाटे यांनी राष्ट्रवादीतून उमेदवारी मागितली होती. अरुण लाड आणि डॉ. कोकाटे हे या उमेदवारीसाठी इच्छुक होते. पण, राष्ट्रवादीकडून काल अरुण लाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे कोकाटे यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

डॉ. कोकाटे म्हणाले, "गेल्या दोन वर्षापासून पदवीधरांची नाव नोंदणी, त्यांच्या समस्या जाणून घेणे, ज्यावेळी या मतदार संघाकडे पाहत नव्हते, त्यावेळेपासून आपण पदवीधरांच्या संर्पकात आहोत. त्यांच्या सर्व अडचणी माहिती आहेत. त्याचा स्वतंत्र अजेंडा घेवूनच ही निवडणूक लढवणार आहे. पदवीधर हे सुज्ञ आहे. त्यांना त्यांच्या मागण्या किंवा अडचणी दूर करणारा उमेदवार माहिती आहे." 

पदवीधरची निवडणूक म्हणजे साखर कारखान्याची निवडणूक नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. पश्‍चिम महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्‍यात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र उभारले पाहिजे. गावगावात उच्च शिक्षित अधिकारी तयार झाला पाहिजे, हाच उद्देश ठेवून निवडणूक लढविली जाईल.

तरुणांच्या हातात लेखनी आणि पुस्तक द्यायचे आहेत. त्यादृष्टीनेच वाटचाल केली जाईल. हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून दिड लाख पदवीधरांची नोंदणी केली असल्याचेही डॉ. कोकाटे यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख