NCP @ 22 ..कार्यकर्त्यांना बळ..कामाचे आणि निर्णयाचे पूर्ण स्वातंत्र्य..  - Prashant Jagtap on the occasion of the anniversary of the Nationalist Congress Party  | Politics Marathi News - Sarkarnama

NCP @ 22 ..कार्यकर्त्यांना बळ..कामाचे आणि निर्णयाचे पूर्ण स्वातंत्र्य.. 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 10 जून 2021

प्रत्येक नेत्याच्या, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये १० जून १९९९चा शिवाजी पार्कवरील भव्य सोहळ्याची आठवण येते.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिन. यानिमित्ताने पुण्याचे माजी महापैार, राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप Prashant Jagtap यांनी राष्ट्रवादीच्या २२ वर्षांच्या प्रवाशांचा मागोवा घेतला आहे. त्यांनी राष्ट्रवादी कॅाग्रेसची स्थापना, पुण्याच्या विकासातील राष्ट्रवादीचे योगदान, यावर जगताप यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. Prashant Jagtap on the occasion of the anniversary of the Nationalist Congress Party

प्रशांत जगताप म्हणतात...

राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिन. दरवर्षी वर्धापन दिन जवळ येतो. त्या-त्या वेळी माझ्यासह पक्षाच्या प्रत्येक नेत्याच्या, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये १० जून १९९९चा शिवाजी पार्कवरील भव्य सोहळ्याची आठवण येते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांनी पक्षाची स्थापना केली. त्यांनी केलेली ही घोषणा केवळ एका राजकीय पक्षाची स्थापना नव्हती, तर तो स्वाभिमानाचा एक हुंकार होता, सामाजिक समता जपत पुढील वाटचाल करण्याचा निर्धार होता आणि विकासाच्या वाटेवर सर्वांना नेण्याचे एक स्वप्न होते. शिवाजी पार्कवरील त्या ऐतिहासिक सभेला मी उपस्थित होतो. त्या वेळी माझे वय २१ होते. सामाजिक-राजकीय विचार नुकतेच मनामध्ये आकार घेत होते. विशेषतः देशातील राजकीय-सामाजिक दृष्टीकोनातून तो काळ एकदम धामधुमीचा होता आणि त्या सर्व काळामध्ये माझ्यासारख्या तरुणांसमोर शरद पवार साहेब दाखवत असलेली दिशा दिसत होती. त्यांच्याबरोबर दीर्घ काळ काम केलेल्या नेत्यांना त्यांच्यावर विश्वास होताच, पण तरुणांनाही या नेत्याविषयी विश्वास वाटत होता. त्यामुळेच, शिवाजी पार्कवरील सभा अनेक अर्थांनी ऐतिहासिक होती आणि त्यानंतरच्या २२ वर्षांमध्ये राज्याच्या व देशाच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने बजावलेल्या भूमिकेवरून हे नेहमीच सिद्ध होत आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होत असतानाचा काळ पाहिला, तर संपूर्ण देशामध्ये असणारी अस्थिरता आणि दिशाहिन गोंधळाची परिस्थिती लक्षात येते. त्या वेळी केंद्रामध्ये कोणत्याच एका पक्षाचे सरकार येण्याची शक्यता नव्हती. तर, छोट्या-छोट्या प्रादेशिक पक्षांकडून स्थानिक मुद्द्यांवरून केंद्र सरकारला वेठीस धरण्याचे धोरण अवलंबण्यात येत होते. या परिस्थितीमध्ये राष्ट्रहित आणि दीर्घकालीन दृष्टिकोन असणाऱ्या धोरणांवर परिणाम होण्याची परिस्थिती होती. या विशिष्ट परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. आतापर्यंतचा इतिहास पाहिला, तर एखाद्या राजकीय पक्षाची स्थापना होत असताना, त्यामध्ये एखाद्या विशिष्ट समाजघटकाचा किंवा प्रदेशाचा प्रामुख्याने विचार झालेला दिसून येतो. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करत असतानाच, समाजाचा सर्वांगीण विकास कसा करता येईल, हे निश्चित दिसून येते. शरद पवार यांचा दीर्घ राजकीय, सामाजिक अनुभव, सहकार, कला-सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील वावर या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब या ध्येयधोरणांमध्ये दिसत होते.

तरुणांना प्रचंड संधी
अगदी सुरुवातीच्या स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस हा तरुण नेत्यांचा पक्ष आहे, याकडे पत्रकार, विश्लेषक, राजकीय अभ्यासक लक्ष वेधतात. पक्षाच्या स्थापनेनंतर राज्यातील सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग झाल्यानंतरही, या काळामध्ये राज्याच्या पटलावर समोर आलेल्या नेत्यांची यादी पाहिली, तर ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित करावी वाटते. यामध्ये छगन भुजबळ आणि अन्य काही ज्येष्ठ नेत्यांबरोबरच अजित पवार, जयंत पाटील, दिवंगत आर. आर. पाटील, दिलीपराव वळसे पाटील, राजेश टोपे यांसारख्या नेत्यांना संधी मिळाली. विशेष म्हणजे, या सर्वच नेत्यांनी अतिशय धडाडीने काम केले आणि राजकारणामध्ये ठसा उमटवला. यामध्ये अजितदादांनी वित्त, जलसंपदा यांसारख्या क्षेत्रामध्ये धडाडीचे काम केले. राज्याच्या विजेची वाढती मागणी लक्षात घेऊन, वळसे-पाटील यांनी ऊर्जामंत्री म्हणून धोरण आखले आणि राज्याला भारनियमनमुक्त केले. अन्य राज्यांमध्ये आजही बिजली-सडक यांसारख्या मुद्द्यांवर निवडणुका लढवल्या जात असताना, महाराष्ट्रामध्ये वीज हा प्रचारातील मुद्दाच गैरलागू झाला आहे, यामध्ये वळसे-पाटील यांनी केलेले काम आहे, हे आवर्जून नमूद करावेसे वाटते.

सुप्रिया सुळे महाराष्ट्राचा बुलंद आवाज 
आर. आर. पाटील यांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले. देशामध्ये ‘स्वच्छता अभियाना’चा विचार होत असताना, राज्यातील ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेसाठी चढाओढ सुरू होती आणि त्यामागे कोणा राजकीय नेत्यांपेक्षा संत गाडगेबाबांचा विचार होता, ही गोष्ट महत्त्वाची वाटते. आजच्या करोनाच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये, अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी धोरणीपणाने आणि कणखर निर्णय घेतल्यामुळे, राज्याची अर्थव्यवस्था स्थिर आहे. विशेषतः जीएसटी आणि अन्य निर्णयांमुळे राज्याच्या महसुलासाठी अतिशय मर्यादित स्रोत उपलब्ध असताना, ही कामगिरी करण्यामध्ये यश आले, याचे कारण कोणताही निर्णय घेताना सर्वांगीण विचार करणे आवश्यक असते आणि प्राधान्यक्रम करायचे असतात, हेच दिसून येते. राजेश टोपे यांनी आरोग्यमंत्री म्हणून केलेल्या कामाची दखल सर्वांनीच घेतली आहे.  खासदार सुप्रिया सुळे या संसदेतील महाराष्ट्राचा बुलंद आवाज आहेत. केवळ राज्यातीलच नव्हे, तर देशातील अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करून ते तडीस लावण्याचे काम त्यांनी केले आहे. बचतगटाच्या माध्यमातून महिलांना त्यांनी मिळवून दिलेली स्वतंत्र अस्तित्वाची ओळखही वेगळा ठसा उमटवणारी आहे. राजकीय पक्षांचा प्रवास सुरू असताना, तरुणांना संधी देताना, त्यांना भविष्यातील जबाबदारीसाठी तयार करणे काय असते, हे राष्ट्रवादी काँग्रेसने सोदाहरण दाखवून दिले आहे.

एका सामान्य घरातील व्यक्ती महापौरपदावर विराजमान
राज्यामध्ये त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था रुजवण्यामध्ये थोर नेते यशवंतराव चव्हाण यांचे धोरण कारणीभूत आहे. स्थानिक राजकीय महत्त्वाकांक्षांना स्थानिक पातळीवरच संधी मिळवून देणे आणि त्यातून भविष्यातील नेतृत्व तयार करणे, हा मुख्य उद्देश होता, असे राजकीय अभ्यासक सांगतात. अगदी त्याच पद्धतीने मी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना आणि त्यानंतरच्या राजकीय प्रवासाकडे पाहतो. राजकीय अस्थिरतेच्या त्या काळामध्ये राज्यातील तरुणांमध्ये अस्वस्थता होती. त्याचबरोबर, संधी मिळाली तर राजकारणामध्ये येऊन बदलासाठी प्रयत्न करणे, विधायक कामे उभारणे यासाठीही हे तरुण तयार होते. मात्र, तत्कालीन राजकीय पक्ष पाहिले, तर या तरुणांना त्यांची क्षमता पाहून संधी मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यामध्ये पारंपरिक चौकटीतून या तरुणांकडे पाहिले जात होते किंवा एखाद्या संस्था-संघटनातून शिफारस यावी, अशी व्यवस्था निर्माण झाली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर, तरुणांना ही संधी मिळाली. या संधीचा फायदा घेतलेली आणि राज्याच्या राजकारणामध्ये स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण केलेली असंख्य उदाहरणे या निमित्ताने आपण पाहू शकतो. शिवाजी पार्कवर झालेल्या स्थापना सभेच्या वेळी मी उपस्थित होतो, त्यावेळी पक्षामध्ये सहभागी होऊ पाहणारा कार्यकर्ता होतो. त्यावेळीही माझ्या मनामध्ये राजकीय महत्त्वकांक्षा नव्हती. घरामध्ये राजकीय पार्श्वभूमी नव्हती. मात्र, माझ्या धडपडीची, राजकीय कामाची कोणीतरी दखल घेत होते. त्यातून मला संधी मिळाली आणि एका सामान्य घरातील प्रशांत जगताप महापौरपदावर विराजमान झाला. विशेष म्हणजे महापौरपदावर काम करत असताना, स्वतंत्रपणे काम करण्याचे स्वातंत्र्य मिळाले.  

सर्व घटकांचा विचार
राष्ट्रवादी काँग्रेस हा केवळ एक पक्ष नव्हे, तर तो एक विचार आहे. संविधानाचा आदर, लोकशाही संकेतांची जपणूक, उपेक्षित वंचित बहुजनांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध, सहकाराचे सूत्र अवलंबत गरीब शेतकरी व कामगारांच्या हिताचे समाजकारण, महिला सक्षमीकरण व बालकल्याण हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचाराचा गाभा राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आणि महात्मा जोतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गांवर पक्षाची अविरतपणे वाटचाल सुरू आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राष्ट्रवादी युवती काँग्रेस, सामाजिक न्याय विभाग, राष्ट्रवादी किसान सभा, राष्ट्रवादी ओबीसी काँग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, सेवा दल, राष्ट्रवादी अपंग विभाग, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग, चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग, भटके विमुक्त अनुसूचित जाती-जमाती विभाग, डॉक्टर्स सेल, लिगल सेल, वक्ता प्रशिक्षण विभाग अशा फ्रंटल संघटनांच्या माध्यमातून पक्षाची वाटचाल सुरू आहे. पक्षाच्या या यशस्वी वाटचालीमागे असलेले खंबीर नेतृत्व म्हणजे शरद पवार. त्यामुळेच, देशात अनेक प्रादेशिक पक्ष रसातळाला जात असताना साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपले स्थान टिकवून ठेवले आहे. इतकेच नव्हे, तर साहेबांनी केंद्र सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. केंद्र सरकारमध्ये, महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांकडून राखला जाणारा साहेबांच्या शब्दांचा मान याचीच प्रचिती देते. 

शेतीचे उत्पादन विक्रमी टप्प्यावर पोहोचले. 
आज, महाराष्ट्रात शरद पवार साहेबांच्या तोडीचा कोणताही नेता नाही. साहेब सत्तेत असोत वा नसोत दिल्लीत साहेबांचा दबदबा कायमच राहिला आहे. त्यामुळेच, साहेबांचे दिल्लीतील निवासस्थान हे चर्चेचे आणि तोडग्याचे बेट राहिले आहे. त्यामागील मुख्य कारण म्हणजे, साहेबांचे मोठेपण. मुख्यमंत्री असताना, त्यांनी अनेक शिक्षण संस्थांसाठी जागा उपलब्ध करून दिल्या. त्यांच्या गरजा ओळखून, प्रसंगी त्यांच्याकडून प्रस्ताव येण्याची वाट न पाहता, पुढाकार घेऊन पवार साहेबांनी या शिक्षणसंस्थांना मदत केली. कृषिमंत्री म्हणून साहेबांनी केलेले काम वादातीत आहे. त्या काळामध्ये विदर्भासह देशाच्या अनेक भागांमध्ये लहरी हवामानाने शेतकरी चिंतेत होते. त्यावेळी साहेबांनी पुढाकार घेतला आणि कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला भाग पाडले. त्यातून, शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला. त्यांच्या कृषिमंत्रिपदाच्या काळामध्येच, शेतीचे उत्पादन विक्रमी टप्प्यावर पोहोचले. या काळामध्ये देशातून अन्नधान्याची निर्यात करण्यात येऊ लागली. त्यामुळे, आतापर्यंत अन्य देशांतून होणाऱ्या अन्नधान्याच्या आयातीवर अवलंबून असणारा भारत निर्यात करू लागला, ही त्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील कारकिर्दीतील सर्वांत महत्त्वाचा टप्पा आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

प्रत्येक घरातील समाधान हाच विकास
प्रत्येक राजकीय पक्षाकडून राजकारणाची ध्येयधोरणे सांगत असताना, विकास करण्याचा शब्द नेहमी उच्चारला जातो. राष्ट्रवादी काँग्रेस नेते-कार्यकर्ते एकत्र आल्यानंतर मात्र त्यांच्यामध्ये हा शब्द थोडासा बदलून, ‘काम काय उभारले’ असा झाला आहे. याचाच अर्थ सहकार, शैक्षणिक संस्था, सामाजिक क्षेत्र यांसारख्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये कोणते काम उभे केले आहे आणि ते काम दीर्घकाळ कशा पद्धतीने चालवले आहे, ही गोष्ट विचारात घेण्यात येते. सहकारी साखर कारखाने, सहकारी बँका, शैक्षणिक संस्था, दूध संस्था यांतून ग्रामीण भागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्था राहिली आहे. यातून, ग्रामीण भागातील चलनवलनाला चालना मिळालीच, त्यापेक्षाही प्रत्येक घरामध्ये समाधान पोहोचले, ही गोष्ट आवर्जून नमूद करावी वाटते. प्रत्येक नागरिकाला रोजगार मिळावा, त्याच्या कष्टाला पुरेसा दाम मिळावा, त्याच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात, हा त्यामागील उद्देश आहे. प्रत्येक वेळी निवडणुकीच्या राजकारणाचा विचार न करता, सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान निर्माण करणे, ही सर्वांत कठीण गोष्ट आहे. हे आव्हान पेलण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यशस्वी झाले आहेत, ही गोष्ट निश्चितपणे विचारात घ्यावी वाटते. राज्याच्या विविध भागांमध्ये ‘एमआयडीसी’च्या रुपामध्ये उद्योगांना प्राधान्य दिले. मोठे उद्योग आणि त्यांना पूरक लघुउद्योगांतून रोजगाराचे जाळे निर्माण करण्यात यश आले आहे. हिंजवडी आयटी पार्क ही आज पुण्याची ओळख आहे आणि जगभरामध्ये पुण्याचे नाव त्यातून गेले आहे. मात्र, माहिती तंत्रज्ञानाचे युग हे भविष्य आहे, याचा नेमका अंदाज घेत साहेबांनी हिंजवडीला हे आयटी पार्क आणले. त्यामुळेच, बेंगळुरू आणि हैदराबाद या शेजारी राज्यांच्या राजधान्यांच्या बरोबरीने पुण्याचा विकास झाला. मुंबईबरोबरच पुणे हे सुद्धा महानगर म्हणून उदयाला आले आहे.
 
शहरात अनेक प्रकल्प मार्गी 
राजकारणाचा विचार करताना, बहुतांश वेळा ग्रामीण भागातील मुद्दे समोर आणण्यात येतात. त्यामध्ये शहरातील नागरिकांचे प्रश्न बाजूला पडण्याची भीती असते. मात्र, महाराष्ट्रासारख्या देशातील सर्वाधिक शहरीकरण असणाऱ्या राज्यातील शहरांच्या विकासामध्येही राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेले योगदान विसरता येणार नाही. अजितदादांच्या नेतृत्वाखाली पिंपरी-चिंचवड हे शहर कसे उभे राहिले, हा आदर्श देशातील प्रत्येक शहरासमोर आहे. पुण्यामध्येही, २००७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यानंतर शहरात झालेला बदल आणि शहराची वाढती गरज लक्षात घेऊन घेण्यात आलेले निर्णय यामुळे झालेले बदल सहज दिसून येतात. पुण्यासारख्या शहरामध्ये रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतुकीची कोंडी यांमुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले होते. दिवसभराचे काम केल्यापेक्षाही या प्रचंड वाहतुकीतून घरी पोहोचण्यासाठी करावी लागणारी कसरत या नागरिकांना नकोशी होत होती. मात्र, वाहतुकीचा प्रश्न संपवण्याचा निर्धार अजितदादांच्या नेतृत्वाखाली पक्षाने घेतला आणि शहरात अनेक प्रकल्प मार्गी लावले. संचेती चौक ग्रेड सेप्रेटर, सीओईपी चौक ते संचेती हॉस्पिटल उड्डाणपूल, हडपसर, स्वारगेट चौकातील उड्डाणपूल, धनकवडी-बालाजीनगर येथे उभारण्यात आलेला उड्डाणपूल असे जाळेच निर्माण होते. 

शहराचा विस्तार चारही दिशांना
दरवर्षी पावसाळ्यामध्ये रस्त्यांना पडणारे खड्डे आणि त्यानंतरच्या दुरुस्तीमध्ये येणारा कोट्यवधींचा खर्च ही नित्याची बाब झाली होती. मात्र, बांधण्यात आलेले रस्ते दीर्घकाळ टिकावेत, यासाठी काँक्रिटचे रस्ते तयार करण्याची संकल्पना सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच मांडण्यात आली. त्यानुसार पहिल्या टप्प्यात पुणे शहरातील २०० किलोमीटरचे काँक्रिटचे रस्ते तयार करण्यात आले. परिणामी पावसाळ्यात खड्डे पडण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. हे सर्व राष्ट्रवादीने त्यावेळी घेतलेल्या निर्णयाचे फलित आहे. शहराचा विस्तार चारही दिशांना होत आहे. त्यामुळे सध्याच्या व्यवस्थेवर ताण येत आहे, तर भविष्यामध्ये पाण्याची गरज वाढणार आहे, हे लक्षात घेऊन अजितदादांनी भामा आसखेडची योजना आखली. त्या वेळी अनेकांनी या योजनेविषयी शंका घेतल्या. मात्र, आज याच व्यक्ती ही योजना किती महत्त्वाची आहे, हे सांगत आहेत. यातच, या योजनेमागील धोरणीपणाचे यश आहे. विकास हा केवळ रस्ते किंवा उड्डाणपूल यांसारख्या भौतिक गोष्टींवर अवलंबून नसतो. तर, सामान्य नागरिकांना विरंगुळ्याची ठिकाणेही असली पाहिजेत, त्यांच्या मनोरंजनातून सामाजिक जाणिवा विस्तारल्या पाहिजेत, याचाही विचार करण्यात आला. त्यामुळे या काळात पुण्यातील उद्यानांची संख्या ११० वरून १९८ वर गेली. नागरिकांना शहराच्या मध्यवर्ती भागातील नागरिकांना तसेच उपनगरामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी मोठ्या प्रमाणात उद्यानाची उभारणी राष्ट्रवादीने सत्तेत असताना केली. सिंहगड रोड, बालाजीनगर, कात्रज, कोंढवा, कोरेगाव पार्क, वडगाव शेरी, खराडी यांसह औंध, बाणेर, बालेवाडी या भागातील नागरिकांना उपयोगी पडतील अशी क्रीडा संकुले व उद्याने राष्ट्रवादीने उभारली. शहराच्या विविध भागांमध्ये सात नवीन सांस्कृतिक सभागृहे उभारली.

गावांच्या भागातील विकास 
झोपडपट्टीत राहणाऱ्या आणि सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी रुग्णालयांची संख्याही वाढविण्यात आली. आरोग्य सेवक कमी खर्चात उपलब्ध व्हावेत, यासाठी ही आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी भर देण्यात आला. सध्या महापालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येणारी शहरी गरीब योजना हे त्याचे फळ आहे या योजनेची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातच सुरू झाली. शहरात १५ नवीन दवाखाने महापालिकेने सुरू केले. पुण्याच्या विकासाबरोबर अन्य राज्यांतून येणारा नागरिकांचा ओघ सुरू होता. यातून, शहराचा विस्तार अपरिहार्य होता आणि त्यातून शेजारच्या नवीन गावांचा शहरात समावेश होणे स्वाभाविक होते. या गावांना महानगराचा भाग करून घेताना, त्यामध्ये पायाभूत सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे, ही गरज होती. ती पूर्ण करण्यामध्ये धोरणीपणाने आखणी करण्यात आली आणि ही गावे कधी पुण्याचा भाग झाली, हे समजलेच नाही. या गावांच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नेत्यांनी पुढाकार घेऊन निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे, शहराच्या मुख्य भागांपेक्षा या गावांच्या भागातील विकास अधिक चांगल्या पद्धतीने झाला म्हटले, तरीही चुकीचे ठरणार नाही.

कार्यकर्त्यांना बळ व वडिलकीचा सल्ला
राष्ट्रवादी काँग्रेसने जसे अनेक कार्यकर्ते घडवले, स्थानिक पातळीवर नेतृत्व उभे केले, तसेच त्यांना कार्य करण्याची संधीही दिली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या असंख्य कार्यकर्त्यांना पदे दिली. मात्र, एखादा कार्यकर्ता एखाद्या पदावर कार्य करीत असताना त्याला कामाचे आणि निर्णयाचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. जर चुकीचे काही घडत असेल, तर वडीलकीचा सल्ला दिला. साहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांवर पुत्रवत प्रेम केले. मला माझ्याबाबतीत घडलेल्या अनेक प्रसंगांपैकी दोन प्रसंग आजही आठवतात. मी राष्ट्रवादीत काम करण्यास सुरुवात केल्यानंतर दोनच वर्षांत राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी साहेबांची वेळ घेण्यात आली होती. परंतु, त्या वेळी नेपाळच्या राजाची हत्या झाल्यानंतर देशात राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला होता. साहेब शासकीय प्रोटोकॉल पाळणारे असल्याने या कार्यक्रमास येऊ शकत नसल्याचा निरोप त्यांच्याकडून शहराध्यक्ष रवींद्र माळवदकर यांच्याकडे देण्यात आला होता. त्यामुळे, मी अस्वस्थ झालो होतो. त्यानंतर माळवदकर यांनी साहेबांना फोनवरून पुन्हा कार्यक्रमास येण्याची विनंती केली होती. त्यावर, साहेबांनी मी येऊ शकत नाही. पण, बक्षीस वितरण कार्यक्रम जंगीच होईल, असे आश्वस्त केले होते. मात्र, कार्यक्रमाची वेळ जवळ येऊ लागली तशी आमची धाकधूक वाढत होती. इतक्यात राज्यातील तत्कालीन जलसंपदामंत्री अजितदादा, पालकमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, नगरविकास राज्यमंत्री सुनील तटकरे, आमदार शशिकांत शिंदे कार्यक्रमस्थळी दाखल झाले. साहेबांना कार्यक्रमास येणे शक्य न झाल्याने त्यांनी राज्यातील तीन मंत्र्यांना कार्यक्रमास पाठविले होते. 

 Edited by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख

टॅग्स

पुणे राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party काँग्रेस indian national congress वर्धा wardha प्रशांत जगताप वर्षा varsha विकास वन forest anniversary congress nationalist congress party शरद पवार sharad pawar स्वप्न विषय topics राजकारण politics ncp research सरकार government solapur छगन भुजबळ chagan bhujbal अजित पवार ajit pawar जयंत पाटील jayant patil राजेश टोपे rajesh tope महाराष्ट्र maharashtra वीज सुप्रिया सुळे supriya sule आर. आर. पाटील बाबा baba आरोग्य health खासदार महिला women यशवंतराव चव्हाण संघटना unions शिवाजी महाराज shivaji maharaj शाहू महाराज युवक काँग्रेस सामाजिक न्याय विभाग विभाग sections चित्रपट साहित्य literature प्रशिक्षण training शिक्षण education शेती farming दिल्ली मुख्यमंत्री शिक्षण संस्था पुढाकार initiatives विदर्भ हवामान कर्जमाफी भारत साखर रोजगार employment हिंजवडी हैदराबाद नगर पिंपरी-चिंचवड सीओईपी हडपसर स्वारगेट खड्डे मनोरंजन entertainment उद्यान सिंहगड बाणेर क्रिकेट cricket स्पर्धा विजयसिंह मोहिते पाटील सुनील तटकरे sunil tatkare आमदार शशिकांत शिंदे