प्रदीप कंद अजितदादांच्या नव्हे; फडणवीसांच्या जवळ गेले !  - Pradip Kand is not close to Ajit Pawar; Close to Fadnavis | Politics Marathi News - Sarkarnama

प्रदीप कंद अजितदादांच्या नव्हे; फडणवीसांच्या जवळ गेले ! 

भरत पचंगे 
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

लिलावतीमध्ये दररोज फोनद्वारे संपर्क साधून चौकशी करणे आणि उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांना सूचना देणे, हे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी अनाकलनीय होते.

शिक्रापूर (जि. पुणे) : हवेली तालुक्‍यातील लोणीकंदचे घर ते पुण्यातील कोलंबिया हॉस्पिटल, तेथून पुना हॉस्पिटल ते मुंबईतील लिलावती हॉस्पिटल असा दोन महिन्यांपूर्वी माझा कोरोनाचा गंभीर रुग्ण म्हणून उपचार प्रवास झाला. या गंभीर परिस्थितीत प्रत्येक दिवशी माझ्यावरील उपचाराचा आढावा घेणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मला आश्‍चर्य वाटायचे. 

लिलावतीमध्ये दररोज फोनद्वारे संपर्क साधून चौकशी करणे आणि उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांना सूचना देणे, हे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी अनाकलनीय होते. कार्यकर्त्याची काळजी कशी घ्यावी, याचा धडाच फडणवीस यांनी त्यातून घालून दिला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, अशा शब्दांत पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीतून भाजपत आलेले प्रदीप कंद यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 

प्रदीप कंद यांचा दोन महिन्यांपूर्वी कोविडचा अहवाल पॉझिटिव्ह झाल्यावर ते सुरुवातीच्या काळात होम क्वारंटाइन होते. पुढे आजार बळावल्याने ते पुण्यातील कोलंबिया व पुना हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. तरीही त्यांचा कोरोना आटोक्‍यात येत नसल्याने त्यांना मुंबईत लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. कोविडवर उपचार घेताना त्यांना फडणवीसांबाबत आलेले अनुभव त्यांनी शिक्रापूर (ता. शिरूर) येथील कार्यक्रमात कथन केले. 

प्रदीप कंद हे राष्ट्रवादीच्या मुशीत वाढलेले आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. अजितदादांमुळे त्यांना पुणे जिल्हा परिषदेत 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरूवातीला उपाध्यक्ष आणि त्यानंतर अध्यक्षपदाची संधी मिळाली. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर कंदांना 2014 मध्ये विधानसभा उमेदवारीची अपेक्षा होती.

दादांनी त्यांना शब्द दिल्याचे ते आजही सांगतात. मात्र अशोक पवारांसाठी थांबा, असे त्यावेळी त्यांना पक्षाकडून सांगण्यात आले. त्यानंतर 2019 मध्ये त्यांना शिरूर लोकसभेची ऑफर होती. परंतु त्यांनी लोकसभेसाठी नकार दिला होता. विधानसभेलाही अशोक पवार यांना पुन्हा संधी दिल्याने कंद यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपत उडी मारली. त्याठिकाणीही बाबूराव पाचर्णे हे विद्यमान आमदार होते, त्यामुळे त्यांनाच उमेदवारी मिळाली. 

शिरूर-हवेली मतदारसंघात भाजप उमेदवाराचा पराभव झाल्याने कंद पुन्हा राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आजही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कंद हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नव्हे; तर देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी आपल्या अनुभवकथनातून स्पष्ट केल्याची चर्चा आहे. 

कंपन्यांच्या साहाय्याने कोविड सेंटर उभारायला हवे होते 

शिरूर तालुक्‍यात महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू नसल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मागील आठवड्यात लक्षात आले. स्वत:ला कार्यक्षम म्हणवून घेणाऱ्या नेत्यांनी याकडे लक्ष द्यावे. शिरूर तालुक्‍यात पंचतारांकीत एमआयडीसी आहे, त्यातील कंपन्यांच्या मदतीने कोविड सेंटर उभारणीसाठी पुढाकार घ्यायला हवा होता, अशी टीका प्रदीप कंद यांनी अशोक पवार यांचा नामोल्लेख टाळून केली. भाजप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, तालुकाध्यक्ष बाबा दरेकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रोहीत खैरे यांच्या पुढाकाराने शिक्रापुरात व्हेंटिलेटरसह 50 बेडचे कोविड सेंटर सुरू करण्याची त्यांनी सूचना केली आणि त्यासाठी लगेच पन्नास हजार रुपये रोख दिले. 

मी कागदाने बोलतो : संजय पाचंगे 

शिरूरमध्ये व्हेंटिलेटर प्रकरणावरून भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्याबद्दल पाचंगे यांनी सांगितले की, थांबा आणि वाट पहा, मी कागदाने बोलतो आणि या पुढील काळात कागद काय चमत्कार करतो, त्याचा अनुभव राष्ट्रवादीच्या नेते, पदाधिकाऱ्यांना येईल. त्यानंतरच मी बोलेन. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख