अजितदादा म्हणतात..कुणीतरी ही बातमी सोडली... - Politics pune Ajit pawar statment about bjp corporator | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादा म्हणतात..कुणीतरी ही बातमी सोडली...

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 21 जानेवारी 2021

पक्षांतर बंदींचा कायदा असल्याने कोणत्याही पक्षाच्या सदस्याला बाहेर पडता येणार नाही, असे अजित पवार म्हणाले.

मुंबई : "पुण्यातील भाजपचे 19 नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची काल राजकीय वर्तुळात चर्चा होती. याबाबत मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की मी उद्या पुण्यात आहे. ही ऐकीव माहित असून कुणीतरी ही बातमी सोडली आहे. पक्षांतर बंदींचा कायदा असल्याने कोणत्याही पक्षाच्या सदस्याला बाहेर पडता येणार नाही." 

भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्र आहेत. कुणी आतला-बाहेरचा असा भेद आमच्यात नाही. पदांच्या वाटपातही सर्वांना समान न्याय हे धोरण कायम आहे. त्यामुळे नगरसेवकांच्या फुटीची चर्चा हा निव्वळ खोडसाळपणा आहे, असे स्पष्टीकरण महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काल केले आहे.

मोहोळ म्हणाले, "काही लोकांकडून गेल्या काही दिवसांत जाणीवपूर्वक अशा प्रकारची चर्चा करून वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, यात कोणत्याही स्वरूपाचे तथ्य नाही. महापालिका निवडणुकीला अद्याप एक वर्ष बाकी आहे. मात्र, त्याआधीच जाणीवपूर्वक अशाप्रकारचे वातावरण तयार करण्यात येत आहे. असा कितीही प्रयत्न केला तरी आमच्यात फाटाफूट होणार नाही. 

सर्व नगरसेवक एकत्र आहेत. गेल्या चार वर्षात आतला-बाहेरचा असा कोणताही भेद करण्यात आलेला नाही. सर्वांना जबाबदारीचे वाटप करण्यात आले आहे. विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी आमच्यात फाटाफूट होणार नाही, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

भारतीय जनता पक्ष ज्या 100 नगरसेवकांच्या बळावर महापालिकेत सत्तेत आहे. त्यापैकी ६० नगरसेक राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षातून ऐनवेळी भाजपात गेलेले आहेत. या ६० पैकी अनेकजण संपर्कात असून काहीजण पालकमंत्री अजित पवार यांना थेट भेटत असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे यांनी केला आहे. आकड्यांत बोलण्यापेक्षा या सरकारच्या विरोधातील कल नगरसेवकांच्या लक्षात आला असून त्यामुळेच अनेक विद्यमान नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, असेही ते म्हणाले.

चार वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पुणे महापालिकेत ऐतिहासिक यश मिळाले. तब्बल 98 नगरसेवक निवडून आले. इतके यश महापालिकेच्या इतिहासात यापूर्वी कुणालाही मिळालेले नव्हते. गेल्या निवडणुकीच्या काळात राज्यात भाजपची सत्ता होती. त्यामुळे महापालिकेत पक्षाला प्रचंड यश मिळाले. या निवडणुकीत काँग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून सुमारे 40 ते 50 जणांनी भाजपमध्ये येऊन महापालिकेची उमेदवारी मिळविली.

यातील काही नगरसेवकांना सत्तेची पदे मिळाली. तर काहीजण सत्तेपासून दूर राहिले. महापालिका निवडणुकाला एकच वर्ष बाकी आहे. त्यामुळे पालकमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीची जोरदार तयारी राष्ट्रवादीकडून सुरू आहे. त्या दृष्टीने पक्षाकडून भाजपातील नगरसेवकांचा अंदाज घेण्यात येत आहे. राष्ट्रवादीतून गेल्यावेळी भाजपात गेलेले तसेच इतर इच्छुकांना गळ टाकण्याची व्यूव्हरचना राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे. त्याला काही प्रमाणात यश मिळत असून त्यातून आलेल्या काही नावांवर कालपासून माध्यमांत चर्चा सुरू झाल्याने राजकीय वादळ सुरू झाले आहे.
 Edited  by : Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख