बारामतीत खळबळ : आत्महत्येप्रकरणी नगरसेवक, माजी सभापती अटकेत - police arrest coroparator and ex chaiarman for abatement of suicide | Politics Marathi News - Sarkarnama

बारामतीत खळबळ : आत्महत्येप्रकरणी नगरसेवक, माजी सभापती अटकेत

मिलिंद संगई
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

बंगला नावावर करण्यासाठी दबाव

बारामती : शहरातील व्यापारी प्रीतम शशिकांत शहा यांना व्याजाच्या पैशासाठी बंगला नावावर करुन घेण्यासाठी मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी विद्यमान नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, एका निवृत्त पोलिसाच्या मुलासह नऊ जणांवर आज गुन्हा दाखल केला. या प्रकरणी प्रतिक प्रितम शहा यांनी फिर्याद दिली आहे. 

पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार  शहा यांना दिलेल्या व्याजाच्या पैशांपोटी त्यांचा सहयोग सोसायटीमधील बंगला नावावर करुन घेण्याच्या कारणावरुन त्यांना सतत मानसिक त्रास दिला गेला. त्या त्रासाला कंटाळून प्रितम शहा यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबला होता. प्रीतम यांनी स्वहस्ताक्षरात मृत्यूपूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवलेली होती. ही नोट त्यांच्या लेंगरेकर ट्रेडींग कॉर्पोरेशन या दुकानात होती. त्यांच्या मृत्यूनंतर दिवाळीच्या पाडव्याला जेव्हा दुकान उघडले गेले, तेव्हा दुकानात ही नोट सापडल्यानंतर त्यांचा मुलगा प्रतिक याने शहर पोलिसात फिर्याद दाखल केली. 

या फिर्यादीवरुन पोलिसांनी जयेश उर्फ कुणाल चंद्रकांत काळे (रा. भिगवण रोड, बारामती), विद्यमान नगरसेवक जयसिंग उर्फ बबलू अशोकराव काटे देशमुख (रा. देशमुख वस्ती, पाटस रोड, बारामती), कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजय कोंडीबा काटे (रा. काटेवाडी, ता. बारामती), विकास नागनाथ धनके (रा. इंदापूर रोड, बारामती), निवृत्त पोलिसाचे चिरंजिव मंगेश ओंबासे (रा. सायली हिल, बारामती), प्रवीण दत्तात्रय गालिंदे (रा. खाटिकगल्ली, बारामती), हनुमंत सर्जेराव गवळी (रा. अशोकनगर, जैन मंदीराशेजारी, बारामती), संघर्ष गव्हाळे (रा. बारामती), सनी उर्फ सुनील आवाळे (रा. खंडोबानगर, बारामती) या नऊ जणांवर पोलिसांनी महाराष्ट्र  सावकारी अधिनियम 2014 च्या कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या पैकी विकास धनके, मंगेश ओंबासे व संघर्ष गव्हाळे वगळता इतर सर्वांना पोलिसांनी अटक केल्याचे नामदेव शिंदे यांनी सांगितले. दरम्यान या बाबतच्या फिर्यादीत प्रतिक यांनी त्यांच्या वडीलांच्या व्यवहारांबाबतची सविस्तर माहिती नमूद केली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख