ऑक्सिजन वाचविण्यासाठी पुण्यात उचलले धोकादायक पाऊल... (पण काळजीपूर्वक)

साडे तेरा टन ऑक्सिजन वाचल्याचा दावा...
corona pune jumbo covid center
corona pune jumbo covid center

पुणे : संपूर्ण राज्यात आॅक्सिजनच्या टंचाईने रुग्णालयांचे धाबे दणाणले आहेत. पंतप्रधानांपासून ते पालिका आयुक्तांपर्यंत सर्वांचीच नजर या आॅक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्याकडे लागली आहे. आहे तो साठा बचत करून वापरण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. मात्र त्याची बचत कशी करायची, हे निश्चित नव्हते. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमध्ये यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले आणि काही तासांत एक-दोन नव्हे तर साडेतेरा टन ऑक्सिजनचा साठा वाचला.

जिल्ह्याजिल्ह्यांत आॅक्सिजनसाठी वाद सुरू झाले आहेत. नगर आणि पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींत एका आॅक्सिजनच्या टॅंकरवरून शाब्दिक बाचाबाची झाल्याची चर्चा आहे. या परिस्थितीत जम्बो कोविड सेंटरमधील ही कामगिरी नजरेत भरणारी आहे.

काय केले गेले?

रुग्णांची ऑक्सिजनची पातळी वाढताच त्यांच्याकडील ऑक्सिजनचा मास्क काढला; तेव्हा काही मिनिटे पुरवठ्याचा वेग कमी केला अन ऑक्सिजनची पातळी कमी होताच, पुन्हा मास्क लावला. रुग्णांची प्रकृती सुधारताना काही मिनिटे ऑक्सिजनचा पुरवठा कमी किंवा बंद केल्याने त्याची बचत होऊ शकते, असा प्रयोग शिवाजीनगरमधील जम्बो हॉस्पिटलमध्ये बुधवारी रात्री केला गेला; तो यशस्वी झाला आणि सकाळी टँकरमध्ये २० पैकी १३ टनांहून अधिक साठा शिल्लक राहिल्याचे दिसून आले.

जम्बो हॉस्पिटलमध्ये ६५० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे रोज १८ ते २० टन ऑक्सिजनची गरज लागते. मात्र, टंचाई असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या पुरवठा सुरळीत असला तरी, तो कधीही कमी पडू शकण्याची भीती आहे. त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी दाखल करून घेण्यास रुग्णालयांकडून नकार दिला जात आहे. त्यावर ‘जम्बो’च्या प्रमुख आणि महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, समन्वयक राजेंद्र मुठे यांनी ज्यांची प्रकृती सुधारत आहे, अशा रुग्णांचा ऑक्सिजन मास्क काढून, पुरवठा बंद करण्याची कल्पना मांडली आणि त्यात यशही आले.

‘व्हिडिओ कॉलिंग’द्वारे नियंत्रण
रुग्णांचा मास्क काढून, ऑक्सिजन पुरवठ्याचा वेग कमी करण्याचा धोका घेताना प्रत्येक तीन रुग्णांच्या बेडजवळ एका कर्मचाऱ्याची रात्रभरासाठी नेमणूक केली. प्रत्येक तासांनी ऑक्सिजन पातळी मोजून म्हणजे, ज्या रुग्णांचे ऑक्सिजनचे प्रमाण ९४-९५ पर्यंत आहे, त्यांचे मास्क काढण्यात आले. किमान १० ते १२ मिनिटे ते बाजूला ठेवले. जेव्हा-केव्हा ऑक्सिजन ९४ पेक्षा कमी झाला; तेव्हा लगेचच मास्क लावून पुरवठा सुरळीत करण्यात आला. रुग्णांची काळजी घेतली जाते का, किती वेळ मास्क काढला, त्या वेळेतील ऑक्सिजन पातळी, यावर रात्रभर तेही प्रत्यक्ष आणि काही वेळा ‘व्हिडिओ कॉलिंग’द्वारे नियंत्रण ठेवले गेले. परिणामी, जम्बोतील ऑक्सिजन बचतीचा हा प्रयोग गरजेनुसार केला जाणार असल्याचे मुठे यांनी सांगितले.

ही पण बातमी वाचा : राजेश टोपे यांची केंद्राला साद

राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असताना विविध जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हिरचा प्रचंड तुटवडा जाणवू लागला आहे. आज अनेक भागांमधील लशी संपल्याने लसीकरण देखील ठप्प झाले होते, अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रांवर लोकांना दोन ते तीन तास ताटकळत उभे राहून घरी परतावे लागले. केंद्राने तातडीने ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर उपलब्ध करून द्यावे, आम्ही केंद्राच्या पाया देखील पडायला तयार आहोत, असे विधान आरोग्यमंत्री राजेश टोपे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेता या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्राने पुरेसे रेमडेसिव्हिर आणि प्राणवायू पुरवावा, यासाठी आपण केंद्राच्या पाया पडायलाही तयार आहोत. संसर्ग रोखण्यासाठी आम्ही आवश्‍यक त्या उपाययोजना करू पण केंद्राने आम्हाला साथ द्यावी, असे भावोत्कट उद्गार आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना काढले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com