ज्या सुरेश गोरेंनी निवडून आणलं, त्यांच्याशीही शिवसेना सदस्यांनी इमान राखलं नाही 

ज्योती अरगडे यांचे पती केशव अरगडे यांना अटक करण्यात आली आहे.
Panchayat Samiti member Jyoti Argade burst into tears after the no-confidence motion was passed
Panchayat Samiti member Jyoti Argade burst into tears after the no-confidence motion was passed

राजगुरूनगर (जि. पुणे) : खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्याविरोधात शिवसेना सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव अनेक नाट्यमय घडामोडीनंतर ११ विरूद्ध ३ मतांनी मंजूर झाला. अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर सभागृहाबाहेर आल्यावर शिवसेनेच्या सदस्या ज्योती अरगडे यांना मात्र रडू कोसळले. (स्व.) माजी आमदार सुरेश गोरे यांच्याशी त्यांनी निवडून आणलेल्या शिवसेनेच्या सदस्यांनी इमान राखलं नाही, असा घाणाघाती आरोप ज्योती अरगडे यांनी केला आहे. तसेच, आपले पती केशव अरगडे यांना विनाकारण या गुन्ह्यात गोवण्यात आल्याचाही आरोप अरगडे यांनी केला आहे. (Panchayat Samiti member Jyoti Argade burst into tears after the no-confidence motion was passed)

अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर आज (ता. ३१ मे) सभापती पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाला. खेड तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सभापतींवर अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. अविश्वास ठरावाच्या सभेसाठी बोलावलेल्या सभेस सर्व १४ पंचायत समिती सदस्य उपस्थित होते. अटक असतानाही सभापती पोखरकरांना न्यायालयाच्या आदेशानुसार मतदानासाठी आणण्यात आले होते. 

दरम्यान, अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्षाचे सदस्य हे डोणजे येथील रिसॉर्टवर मुक्काम होते. हे कळल्यानंतर चिडलेल्या सभापती पोखरकर व त्यांच्या समर्थकांनी तिथे जाऊन राडा घातला होता. सभापती पोखरकर यांच्या भावाने गोळीबार केल्याचा आरोपही आमदार दिलीप मोहिते यांनी केला हेाता. या प्रकरणी सभापती पोखरकर आणि त्यांच्यासोबत असलेले पंचायत समितीच सदस्या ज्योती अरगडे यांचे पती केशव अरगडे यांना अटक करण्यात आली आहे. त्यावर अविश्वास ठरावानंतर ज्योती अरगडे यांनी भाष्य केले. 

सभापती पोखरकर, कॉंग्रेसचे सदस्य अमोल पवार, शिवसेनेचे बंडखोर सदस्य अंकुश राक्षे यांची सभा सुरू झाल्यानंतर भाषणे झाली. अविश्वास ठराव मंजूर करणे तालुक्याच्या इभ्रतीच्या दृष्टीने योग्य नाही. सभापती येथेच राजीनामा देतील, ठराव मागे घ्या, असा प्रस्ताव अमोल पवार यांनी मांडला. पोखरकरांनीही तशी विनंती केली, पण त्यांना अविश्वास ठरावावर सह्या केलेल्या ११ सदस्यांनी प्रतिसाद दिला नाही.

पीठासीन अधिकाऱ्यांनी ठराव मंजुरीसाठी मांडल्यानंतर ११ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने हात वर करून पाठिंबा दिला. शिवसेनेचे सुभद्रा शिंदे, अमर कांबळे, वैशाली जाधव, सुनीता सांडभोर, अंकुश राक्षे, मच्छिंद्र गावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण चौधरी, मंदाबाई शिंदे, नंदा सुकाळे व वैशाली गव्हाणे आणि भाजपचे सदस्य उपसभापती चांगदेव शिवेकर यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. तर शिवसेनेचे सभापती पोखरकर, ज्योती अरगडे आणि काँग्रेसचे अमोल पवार यांनी ठरावाच्या विरुद्ध मतदान केले. 
 

माझ्याविरुद्ध षडयंत्र : सभापती पोखरकर

पंचायत समितीच्या इमारतीचे काम थांबविण्यास मी आमदार दिलीप मोहिते यांना विरोध केला, म्हणून माझ्याविरुद्ध षडयंत्र रचून हा अविश्वास ठराव आणला गेला, असे सभापती पोखरकर यांनी सांगितले. ते अधिक बोलू इच्छित होते, पण त्यांना पोलिसांनी बोलू दिले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com