आता मतभेद नाही, तर कॉंग्रेस वाढवा : पुण्यातील बैठकीत नेत्यांची हाक  - Now there are no differences, but increase the Congress: Leaders call in Pune meeting | Politics Marathi News - Sarkarnama

आता मतभेद नाही, तर कॉंग्रेस वाढवा : पुण्यातील बैठकीत नेत्यांची हाक 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 18 ऑक्टोबर 2020

आगामी 2022 मध्ये पुणे महापालिकेत कॉंग्रेस पक्षाची सत्ता आणून विकास फक्त कॉंग्रेसच करू शकते, हे दाखवून देण्यासाठी एकीने काम करण्याची गरज व्यक्त केली. 

पुणे : पुणे महापालिकेत सत्ताधारी भाजपचा नाकर्तेपणा पुणेकरांपुढे मांडून त्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीच्या निमित्ताने कॉंग्रेस नेत्यांनी एकजूट दाखवत "मतभेद नाहीतच, आता कॉंग्रेस वाढवा,' अशी हाक देण्यात आली. 

पुणे शहराचा विकास, प्रलंबित प्रकल्प आणि महापालिकेच्या कामकाजात भाजपला आलेले अपयश यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी ही बैठक बोलावली होती. महापालिकेच्या सभेपुढील कार्यपत्रिकेवर चर्चा करण्याची परंपरा कॉंग्रेस पक्षात होती. ही खंडित झालेली परंपरा आबा बागुल पुन्हा यांनी सुरू केली आहे. 

शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी शहरातील अनेक महत्वाचे प्रलंबित प्रश्न, विकासकामे व सत्ताधारी पक्षाकडून होणारे दुर्लक्ष याबाबत चर्चा केली. तसेच, आगामी 2022 मध्ये पुणे महापालिकेत कॉंग्रेस पक्षाची सत्ता आणून विकास फक्त कॉंग्रेसच करू शकते, हे दाखवून देण्यासाठी एकीने काम करण्याची गरज व्यक्त केली. 

माजी आमदार उल्हास पवार यांनी कॉंग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, हे या बैठकीच्या माध्यमातून सिद्ध होते. अशाच एकजुटीने शहरातील विकासाची कामे मार्गी लावा, असे आवाहनही त्यांनी केले. 

आगामी 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत कॉंग्रेसला अधिक जागा कशा प्रकारे मिळवता येतील, याबाबतही बैठकीत विचारविनिमय झाला. याशिवाय पुण्याच्या वेगवेगळ्या प्रश्‍नांवर चर्चा झाली. त्यात सध्या कोरोना आटोक्‍यात असला तरी आगामी काळात त्यात वाढ झाल्यास काय केले पाहिजे, पुणे शहरातील वाहतुकीचे नियोजन करत असताना एचसीएमटीआर रखडलेला रस्ता लवकरात लवकर मार्गी लावणे, पावसाळ्यात वारंवार शहरात येणाऱ्या पुरावर सत्ताधारी भाजप गप्प का आहे? सीमाभिंत बांधण्यासाठी टेंडर काढले असून काम सुरू का होत नाही? भाजपच्या अंतर्गत भांडणामुळे पुणेकरांना वेठीस का धरण्यात येत आहे. सीमाभिंतीचा प्रश्न लवकर सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याचे या वेळी ठरले. 

महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल म्हणाले, "शहरामध्ये आत्तापर्यंत दिसत असलेला विकास हा कॉंग्रेच्या कार्यकाळातच झाला आहे. त्याची घडी भाजपच्या नाकर्तेपणामुळे मोडली आहे. महापालिकेत कॉंग्रेस सत्तेवर आल्यावर पुणेकरांना अपेक्षित असलेला विकास पुन्हा दिसू लागेल.' 

बैठकीस मोहन जोशी, दिप्ती चवधरी, श्रीकांत शिरोळे, डॉ. सतीश देसाई, नीता रजपूत, शिवा मंत्री, विरेंद्र किराड, कमल व्यवहारे, रजनी त्रिभुवन, मनीष आनंद, गोपाळ तिवारी, अविनाश बागवे, रफिक शेख, चंदू कदम, सुजाता शेटटी, लता राजगुरू, रवींद्र धंगेकर, संजय बालगुडे, नरेंद्र व्यवहारे, भीमराव पाटोळे, विशाल मलके, सोनाली मारणे, भूषण रानभरे, तसेच पदाधिकारी उपस्थित होते. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख