पांडुरंगाने माझी हाक ऐकली अन् नीलमताई मदतीसाठी धावून आल्या  

फोन आला तेव्हा नीलमताई मुंबईत होत्या.
Neelam Gorhe helped a destitute woman in Daund
Neelam Gorhe helped a destitute woman in Daund

केडगाव (जि. पुणे) : अनेकदा नेतेमंडळींचे फोन लागत नाही. लागला तर उचलला जात नाही. फोन उचलला तर अपेक्षित मदत मिळलेच याची खात्री नसते. असा सर्वसाधारण अनुभव आहे. परंतु पारगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथील निराधार वृद्धेला याबाबत वेगळाच अनुभव आला. या वृद्धेने मदतीसाठी चक्क विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम  गोऱ्हे यांना फोन केला. नीलमताई यांनी लगेच तो फोन उचलला आणि मदतही केली. नीलमताई निराधारांना मदत करतात, असे या वृद्धेने ऐकले होते. त्याच आशेने तीने फोन केला अन् त्या निराधार वृद्धेचा विश्वास खरा ठरला. (Neelam Gorhe helped a destitute woman in Daund)

पारगाव येथे शोभाताई अनंता (वय ६६) या निराधार महिला राहतात. मोलमजुरी करून त्या उदरनिर्वाह करतात. लॅाकडाऊनमध्ये जवळचे पैसे संपून गेल्याने आर्थिक परिस्थिती हालाखिची झाली. हाताला काम मिळेना. कोणाचाच आधार नसल्याने शोभाताई हतबल झाल्या होत्या. नीलमताई यांचा मोबाईल नंबर त्यांनी फार वर्षांपूर्वी घेऊन ठेवलेला होता. अडचणीतील महिलांना त्या मदत करतात, असे त्यांनी ऐकले होते. त्यामुळे शोभाताई यांनी बिचकत बिचकत मदतीसाठी नीलमताईंना फोन केला. फोन आला तेव्हा नीलमताई मुंबईत होत्या. कामात व्यस्त असूनही नीलमताई यांनी फोन उचलला. तेव्हा शोभाताई यांनी आपली व्यथा त्यांच्यापुढे मांडली, नीलमताईंनी त्यांना मदतीचे आश्वासन दिले. 

फोन ठेवल्यानंतर नीलमताई यांनी लगेच दौंड येथील शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी तालुकाप्रमुख अनिल सोनवणे यांना दूरध्वनीवरून महिलेची माहिती देत मदत करण्यास सांगितले. गोऱ्हे यांच्या सूचनेनंतर सोनवणे यांनी पारगाव येथे जाऊन निराधार महिलेला पुढील तीन महिन्यांचा किराणा व धान्य दिले.  

मदत मिळाल्यानंतर शोभाताई यांना अश्रू अनावर झाले होते. शोभाताई या वारकरी सांप्रदयातील आहेत. कार्यकर्त्यांना हात जोडत त्या म्हणाल्या ‘पांडुरंगाने माझी हाक ऐकली अन् मदत मिळाली. या वेळी शिवसेना दौंड विधानसभा संघटक संतोष जगताप, उपतालुका प्रमुख सदानंद लकडे, रमेश निवांगुणे, सर्जेराव म्हस्के, विभागप्रमुख भाऊ बोत्रे, शहर संघटक नामदेव राहिंज, हरीश खोमणे, देवेंद्र कानपिळे उपस्थितीत होते.

डॉ. गोऱ्हे यांच्या उपसभापती कार्यालयाचे सचिव रवींद्र खेबुडकर यांनी महिलेला संजय गांधी निराधार योजनेत नाव नोंद करण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करण्याची सूचना केली. यानंतर सोनवणे यांनी तहसीलदार संजय पाटील व तलाठी वेताळ यांची भेट घेऊन कागदपत्रांची पूर्तता केली. पुढील महिन्यापासून मानधन सुरू होईल, असे वेताळ यांनी सांगितले. भविष्यात काहीही मदत लागली तर आम्हाला फोन करा, असे उपतालुका प्रमुख सदानंद लकडे यांनी शोभाताई यांना सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in