पुण्यात राष्ट्रवादीचे भाजपविरोधात आत्मक्‍लेश आंदोलन  - NCP's agitation against BJP in Pune | Politics Marathi News - Sarkarnama

पुण्यात राष्ट्रवादीचे भाजपविरोधात आत्मक्‍लेश आंदोलन 

सरकारनामा ब्यूरो 
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

कोरोनाचा हॉट स्पॉट होत असताना पुणे महापालिका नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज (ता. 3 सप्टेंबर) महापालिका मुख्यालयात आत्मक्‍लेश आंदोलन करण्यात आले.

पुणे : कोरोनाचा हॉट स्पॉट होत असताना पुणे महापालिका नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आज (ता. 3 सप्टेंबर) महापालिका मुख्यालयात आत्मक्‍लेश आंदोलन करण्यात आले.

पत्रकार पांडुरंग रायकर व पुण्याचे माजी महापौर दत्ता एकबोटे यांना वेळेत उपचार न मिळाल्याने प्राण गमवावे लागले. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. 

राज्य सरकारच्या वतीने उभारण्यात आलेल्या जंबो कोविड सेंटरमधील असुविधांबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू असताना राष्ट्रवादीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. महापालिकेकडे केवळ तीन कार्डिओ रुग्णवाहिका आहेत. तज्ज्ञ डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.

कोणत्या रुग्णालयात नेमके किती बेड शिल्लक आहेत, याची नेमकी माहिती रुग्णांना मिळत नाही. एखाद्या रुग्णालयात दाखल होण्यासाठी गेल्यानंतर जायच्या आधीच तेथील शिल्लक बेड इतर रुग्णांना दिलेला असतो. त्यामुळे रुग्णाला या रुग्णालयातून त्या रुग्णालयात फिरावे लागते. 

याला महापालिकेतील सत्ताधाऱ्यांधील समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. माजी महापौर दत्ता एकबोटे तसेच पत्रकार पांडुरंग रायकर यांना वेळेत आरोग्य सुविधा मिळाली नाही, त्यालाही महापालिकेच्या यंत्रणेची दुरवस्था कारणीभूत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला आहे. 

महापौर मुरलीधर मोहोळ या संदर्भात कोणत्याही स्वरूपाची बैठक घेत नाहीत, तसेच माहितीदेखील देत नाहीत, असाही आरोप या वेळी करण्यात आला आहे. 

पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज भाजपच्या विरोधात आंदोलन केले. मात्र, ज्या कोविड सेंटरवरून गेल्या दोन दिवसांत आरोप होत आहेत, ते जंबो कोविड सेंटर "पीएमआरडीए'च्या वतीने उभारण्यात आलेले आहे. त्याचे संपूर्ण नियंत्रण "पीएमआरडीए'कडे असल्याची भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली आहे. 

"पीएमआरडीए'चे आयुक्त सुहास दिवसे, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी या कोविड सेंटरच्या कामात लक्ष घालण्याची गरज आहे. महापालिकेने खर्चाची 25 टक्के रक्कम दिली आहे, अशी भूमिका महापौर मोहोळ यांनी घेतली आहे. 

दरम्यान, आज झालेल्या आत्मक्‍लेश आंदोलनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे, खासदार वंदना चव्हाण, महापालिकेतील पक्षाच्या गटनेत्या दीपाली धुमाळ तसेच प्रदीप देशमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला होता. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख