कोथरूडमध्ये भाजपला धक्का देण्याची राष्ट्रवादीची बाणेर-बालेवाडीतून तयारी?

भाजप नगरसेवकांचे फोटो राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत झळकू लागले...
Baburao Chadere-saykar-kalmkar
Baburao Chadere-saykar-kalmkar

पुणे : वर्षभरावर आलेल्या पुणे महापालिका निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला असून राजकीय वतुर्ळात विविध हालचाली होत आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपाला जोरदार धक्का देण्याची पूर्वतयारी सुरू केल्याची चर्चा रंगली आहे.

बाणेर-बालेवाडी-पाषाण प्रभागातील भाजपच्या नगरसेविका स्वप्नाली सायकर व ज्योती कळमकर यांची राष्ट्रवादीशी वाढती जवळीक चर्चेची ठरली आहे. या प्रभागातील राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्यासोबत त्यांचे एकत्रित कार्यक्रम,  तिघांचेच फ्लेक्सवरील फोटो यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याच कोथरूड विधानसभा मतदारसंघात काही राजकीय घडामोडी तर घडत नाहीत ना, अशी शंका व्यक्त होत आहे. मात्र यात कोणतेही राजकारण नसून विकासकामांसाठी सर्वांच्या सहभागातून पाठपुरावा सुरू असल्याचे स्पष्टीकरण या दोन्ही नगरसेविकांच्या वतीने देण्यात आले.

राज्य शासनाने 23 गावांचा समावेश पुणे महापालिकेत केल्यानंतर राष्ट्रवादीच्या पुन्हा सत्ता मिळविण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यासाठी भाजपातील काही नगरसेवकांनाही गळ घातली जात असल्याचे बोलले जात आहे. आमदार सुनिल टिंगरे यांनी नुकतीच भाजपाचे नगरसेवक बापूराव कर्णे गुरूजी यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेट घालून दिली. प्रभागातील स्थानिक कामानिमित्त ही भेट झाली असली तरी या भेटीला राजकीय वलय प्राप्त झाले. त्याचप्रमाणे बाणेर-बालेवाडी-पाषाण प्रभागही आता चर्चेत आला आहे.

या प्रभागामध्ये बाबूराव चांदेरे हे राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक आहेत. तर अमोल बालवडकर, स्वप्नाली सायकर व ज्योती कळमकर हे तिघेही भाजपचे नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील या प्रभागातील लढत गेल्या निवडणुकीत चर्चेची ठरली होती.  पण राजकीय वारे फिरल्याने  मागील काही दिवसांत चांदेरे यांच्यासोबत दोन्ही महिला नगरसेवकांची नावे व छायाचित्रे विविध विकासकामांचे फलक व बातम्यांवर झळकत आहेत. मुंबई-पुणे महामार्गावरील बाणेर परिसरातील भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर या कामाचे फलक बाणेरमध्ये अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यावर हे तिघेच नगरसेवक झळकत आहेत. तसेच चांदेरे यांच्याकडून त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर मागील काही महिन्यांत सुरू असलेल्या विविध विकासकामांची माहिती व छायाचित्रे टाकली आहेत. त्यामध्येही या दोघींच्या नावाचा आवर्जून उल्लेख केल्याचे दिसते. त्यात कुठेही बालवडकर यांचा उल्लेखही नाही.

दरम्यान, सायकर यांनी यामध्ये कसलेही राजकारण नसल्याचे सांगितले. पुलाचे काम हे गरजेचे होते. स्मार्ट सिटीकडून हे काम केले जात होते. आम्ही सर्वांनी त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. भाजपाचे नगरसेवक म्हणून आम्ही लोकांसाठी हे काम केले. त्यामुळे या चर्चेला काही अर्थ नसून आम्ही भाजपासोबतच आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर ज्योती कळमकर यांचे पती गणेश कळमकर यांनीही यात कसलेही राजकारण नसल्याचे म्हटले आहे. आम्हाला प्रभागाचा विकास करायचा आहे. विकासकामांसाठी महापालिकेत सातत्याने पाठपुरावा करतो. सगळ्यांशी सहकार्याशी भूमिका असून यात कोणतेही राजकारण नाही, असे त्यांनी सांगितले. मी कालही भाजपमध्ये होतो. आजही आहे आणि उद्याही भाजपमध्ये असणार आहे. राष्ट्रवादीत जाण्याचा प्रश्नच नाही, असे कळमकर यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com