NCP MLA Dilip Mohite is angry with his own government | Sarkarnama

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते आपल्याच सरकारला वैतागले 

हरिदास कड 
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

आमदार दिलीप मोहिते यांनी आपण पक्षावर नाराज असल्याचे स्पष्ट केले आहे.

चाकण (जि. पुणे) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते हे पक्षावरच नाराज आहेत. राष्ट्रवादी राज्यातील सत्तेत सहभागी असूनही विकास कामे, अधिकाऱ्यांच्या बदल्या तसेच इतर कामे होत नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या बोलण्यातून ही नाराजी वारंवार स्पष्ट होत आहे. दरम्यान, यापूर्वी मोहिते यांनी तहसीलदाराच्या पतीने आपल्याला धमकी दिल्याची तक्रार केली होती. 

खेड तालुक्‍यातील जे महसुली अधिकारी गैरप्रकार करतात, त्या अधिकाऱ्यांची बदली करावी, अशी मागणी त्यांनी व इतर पदाधिकाऱ्यांनी खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. पण, संबंधित अधिकाऱ्यांची बदली झाली नाही. नागरिकांच्याही संबंधित अधिकाऱ्यांबाबत अनेक तक्रारी आहेत.

सांगूनही अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नाहीत. जे राजरोसपणे पैसे उकळतात, कोट्यवधी रुपये कमवतात, सरकारचा महसूल बुडवितात आणि दादागिरी करतात, अशा अधिकाऱ्यांचे मंत्र्यांना पुरावे दिले तरी त्यांच्या बदल्या होत नाहीत, अशी उद्विग्नता आमदार मोहिते यांनी व्यक्त केली. 

आमदारांची कामे झाली पाहिजेत, त्यामुळे नागरिकांच्या, कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतात. पण, ती कामे होत नाहीत, त्यामुळे आमदारांनी काय करायचे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 

पिंपरी चिंचवडचे तत्कालीन पोलिस आयुक्त पद्मनाभन यांनी केवळ हट्टाने चाकण औद्योगिक वसाहतीमधील महाळुंगे येथे दीड वर्षापूर्वी पोलिस ठाणे सुरू केले आहे. महाळुंगे येथे फक्त पोलिस चौकी ठेवावी आणि पोलिस ठाणे बंद करावे. या चौकीचा कारभार चाकण पोलिस ठाण्याच्या अंतर्गत करण्यात यावा, अशी मागणी आमदार मोहिते यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे वारंवार केली होती. पण, त्यांच्या मागणीला गृहमंत्री देशमुख यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी मोहिते यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावरही ते नाराज आहेत. 

खेड तालुका विकास कामांच्या बाबतीत मागे पडला आहे. इतर तालुक्‍यात निधी पळविला जात आहे, त्यामुळे राज्यातील सत्तेत असूनही तालुक्‍यात विकास कामे होत नाहीत, हे वास्तव आहे, असे सांगून आमदार मोहिते यांनी आपण पक्षावर नाराज असल्याचे स्पष्ट केले आहे.

आपली कामे होत नसल्याचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी तसेच इतर चर्चेच्या अनुषंगाने आपण येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहोत, असे आमदार मोहिते यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख