राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांनी दिला आपल्याच सरकारला इशारा  - NCP MLA Ashok Pawar warned his own government | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांनी दिला आपल्याच सरकारला इशारा 

जनार्दन दांडगे 
शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020

विरोध डावलून सरकारने निर्णय घेतल्यास त्याविरोधात रस्त्यावर उतरण्यास मागेपुढे पाहणार नाही.

लोणी काळभोर (जि. पुणे) : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लोणी काळभोर व लोणीकंद या दोन पोलिस ठाण्यांचा समावेश पुणे शहर पोलिस आयुक्तालयात करण्याबाबतचा आदेश गृहमंत्रालयाकडून अद्याप आलेला नाही. पण, काही वरिष्ठ पोलिस अधिकारी दिशाभूल करत आहेत. ही दोन्ही ठाणी पुणे आयुक्तालयास जोडण्यास पूर्व हवेलीतील नागरीक व स्थानिक लोकप्रतिनिधींचा विरोध आहे. हा विरोध डावलून सरकारने निर्णय घेतल्यास त्याविरोधात रस्त्यावर उतरण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अशोक पवार यांनी आपल्याच सरकारला दिला. 

वाघोली आणि उरुळी कांचन येथील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन, त्या ठिकाणी स्वतंत्र पोलिस ठाणे सुरु करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू करावेत, तसेच लोणी काळभोर व लोणीकंद ही दोन ठाणी ग्रामीण पोलिस दलात कायम राहावीत, यासाठी पुढील आठवड्यात गृहमंत्री देशमुख यांची भेट घेणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. 

पुणे पोलिस आयुक्तालयाच्या मागणीनसार गृह विभागाने पुण्याच्या पोलिस आयुक्तालयाची पाच विभागात पुनर्रचना करण्यास सोमवारी (ता. 26 ऑक्‍टोबर) परवानगी दिली आहे. या पुनर्रचेच्या आदेशात लोणी काळभोर व लोणीकंद या ग्रामीण पोलिस दलातील दोन ठाण्यांची नावे पुणे शहर पोलिस आयुक्तालयात दाखवली आहेत. त्यामुळे या दोन्ही पोलिस ठाण्यांचा समावेश पुणे आयुक्तालयात होणार असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र गृहमंत्रालयाकडून लेखी आदेश नसल्याने ही दोन्ही ठाणे ग्रामीण पोलिस दलात राहणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत आमदार पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी या निर्णयाविरोधात उतरण्याचा इशारा दिला. 

अशोक पवार म्हणाले, "लोणी काळभोर व लोणीकंद या दोन पोलिस ठाण्यांचा समावेश पुणे शहर पोलिस आयुक्तालयात करण्यास या भागातील बहुतांश नागरीक व लोकप्रतिनिधींचा विरोध आहे. ही दोन्ही ठाण्यांच्या हद्दीतील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन वाघोली व उरुळी कांचनसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे सुरु करावे, अशी मागणी गृहमंत्रालयाकडे यापूर्वीच केली आहे. लोणी काळभोर व लोणीकंद पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याशी चर्चाही केली आहे. वाघोली व उरुळी कांचन स्वतंत्र पोलिस ठाणे झाल्यास कामाचा बोजा कमी होऊन नागरिकांना चांगली सेवा मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ही ठाणी लवकरात लवकर सुरू करावीत, यासाठी पुढील आठवड्यात गृहमंत्र्यांची भेट घेणार आहे.' 

पुण्याच्या पोलिस आयुक्तालयाची पुनर्रचनेत लोणी काळभोर व लोणीकंद पोलिस ठाण्यांचा समावेश आयुक्तालयात करावा, असा कुठेही उल्लेख नाही. तरीही काही वरिष्ठ अधिकारी ही दोन्ही ठाणी शहरात घेण्याबद्दल बोलत आहेत. ही बाब योग्य नाही. तसा लेखी आदेश गृहमंत्रालयाकडून नसतानाही ही दोन्ही ठाणी पुणे आयुक्तालयात घेतल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा पवार यांनी दिला. 

शिवसेनेचाही विरोध 

याबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना जिल्हाप्रमुख माऊली कटके म्हणाले, "लोणी काळभोर व लोणीकंद पोलिस ठाण्यांचा समावेश पुणे आयुक्तालयात करण्यास शिवसेनेचाही विरोध आहे. मात्र, वाघोली पुढील काही दिवसांत पुणे महापालिकेत जाणार आहे, त्यामुळे वाघोलीसाठी स्वतंत्र पोलिस ठाणे सुरू व्हावे, ही आमची भूमिका आहे. वाघोलीचा शहरात समावेश झाल्यास पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या वाढेल आणि नागरिकांना चांगली सेवाही मिळेल. मात्र, वाघोली वगळता पूर्व हवेलीतील एकही गाव पुणे शहर पोलिस आयुक्तालयात सामाविष्ठ करण्यास आमचा विरोध राहणार आहे.' 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख