CBIने कितीही खळखळाट केला तरी देशमुख  शांत किनाऱ्याप्रमाणे खंबीर : रुपाली चाकणकर - NCP leader Rupali Chakankar statement to CBI Anil Deshmukh | Politics Marathi News - Sarkarnama

CBIने कितीही खळखळाट केला तरी देशमुख  शांत किनाऱ्याप्रमाणे खंबीर : रुपाली चाकणकर

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 एप्रिल 2021

लाटांनी कितीही खळखळाट केला तरीही किनारा मात्र धीरोदात्तपणे उभा असतो.

पुणे : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयचे छापे मारण्याच्या घटनेचे राजकीय पडसाद उमटू लागले असून राष्ट्रवादी कॅाग्रेसने या कारवाईचा निषेध केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टि्वट करुन सीबीआयच्या या कारवाईबद्दल संशय व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अनिल देशमुखांवर कारवाई करणाऱ्या केंद्रीय यंत्रणेला (सीबीआय) टोला लगावला आहे. 

आपल्या टि्वटमध्ये रुपाली चाकणकर म्हणतात, ''लाटांनी कितीही खळखळाट केला तरीही किनारा मात्र धीरोदात्तपणे उभा असतो. भरतीनंतर लाटांना ओहोटी येतेच किनारा मात्र निश्चल असतो. केंद्रीय यंत्रणांनी कितीही चौकशीचा खळखळाट केला तरी देशमुख साहेब शांत किनाऱ्याप्रमाणे खंबीर आहेत.'' 

जयंत पाटील यांनी म्हटले आहे की अनिल देशमुख यांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर राखत पदाचा राजीनामा दिला आणि सीबीआयच्या चौकशीला पूर्ण सहकार्य केले. याबाबतीत एकूण चार जणांची चौकशी झाली व चारही जणांनी समाधानकारक उत्तरे दिली. उच्च न्यायालयाने केवळ ‘प्राथमिक चौकशी’करण्याचे आदेश दिलेले होते. या प्राथमिक चौकशीतून काय निष्पन्न झाले, याचा अहवाल कोर्टासमोर मांडण्यात आल्याचे अद्याप पर्यंत ऐकिवात नाही. परंतु ॲन्टीलिया व हिरेन हत्या प्रकरणात ज्यांना अटक करण्यात आली आणि ज्यांच्यावर संशयाची सुई आहे, त्यांच्या विधानावरून ही चौकशी सुरू करण्यात आलेली आहे. या चौकशीच्या मिळालेल्या परवानगीचा उपयोग सीबीआय धाडसत्र घालून राजकीय उद्दिष्टे साध्य करताना दिसत आहे. अशा धाडींचा राजकीय नेत्याला बदनाम करण्यासाठीच वापर होत आहे, आम्ही याचा तीव्र निषेध करतो.

''केवळ मानसिक त्रास देऊन बदनाम करण्याचा हा प्रकार होता. तोच प्रकार देशमुखांच्या बाबतीत होत आहे. माझ्यासह अन्य नेत्यांच्या मागे ईडीची चौकशी लावली होती. त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. त्यामुळे लवकरच दूध का दूध, पानी का पानी होईल. अनिल देशमुख या प्रकरणातून लवकरच निर्दोष बाहेर पडतील,'' असे  राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
Edited by : Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख