राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही आधीच सांगितले होते की, आमचे अस्तित्व स्वतंत्र राहील! - NCP director takes anti-party stance in Malegaon co-operative sugar factory | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीच्या नेत्यांना आम्ही आधीच सांगितले होते की, आमचे अस्तित्व स्वतंत्र राहील!

कल्याण पाचांगणे
गुरुवार, 10 जून 2021

सभासद शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात अधिकचे दोन पैसे मिळण्यासाठी आम्ही आग्रही राहणे, यात गैर काय? 

माळेगाव (जि. पुणे) : राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या तिकीटावर निवडून आलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या दोन संचालकांसह शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या एका विश्वस्ताने उसाच्या कांडे पेमेंटच्या मुद्दयावर प्रथमच राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घेत आपले स्वतंत्र अस्तित्व दाखविले आहे. त्यामध्ये संचालक सुरेश खलाटे, राजेंद्र ढवाण, तसेच विश्वस्त रामदास आटोळे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे संचालिका अलका पोंदकुले यांचे पती तानाजी पोंदकुले यांनीही या मुद्द्यावर निर्णायक भूमिका घेतली आहे. सहाजिकच या बदलत्या राजकीय समीकरणावरून बहुतांशी सभासदांच्या भूवया उंचविल्याचे दिसून येते. (NCP director takes anti-party stance in Malegaon co-operative sugar factory)

माळेगाव सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होऊन दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. कारखान्यात सत्तांतर झाल्याने राष्ट्रवादीचे नेते, कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, उपाध्यक्ष तानाजी कोकरे यांच्या अधिपत्याखाली संचालक मंडळ कार्यरत आहे. सत्ताधारी संचालक मंडळामध्ये सुरेश खलाटे, राजेंद्र ढवाण, तसेच शिवनगर संस्थेत राष्ट्रवादीच्या कोट्यातील विश्वस्त रामदास आटोळे सध्या काम करीत आहेत. 

हेही वाचा : ते दोन हात ठरले अविश्वास ठराव स्थगित होण्यास कारणीभूत!

पण, कांडे पेमेंट सभासद शेतकऱ्यांना कारखाना प्रशासनाने द्यावे, अन्यथा आंदोलनाचा मार्ग आम्ही स्वाकारू, असा इशारा देवून संबंधित पदाधिकाऱ्यांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिला आणि त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला. वास्तविक याआगोदरच अध्यक्ष तावरे यांनी कांडे पेमेंट देण्याबाबत कारखान्याची अर्थिक स्थिती कशी आहे, या बाबतचा अर्थ विभागाला अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे. असे असताना ह्या संचालकांनी मांडलेला मुद्दा कारखान्याच्या सभागृहात चर्चिला जाऊ शकत होता, परंतु जाहिररित्या संबंधित संचालकांनी आपली भूमिका मांडल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

याबाबत संचालक सुरेश खलाटे म्हणाले, ``कांडे पेमेंटचा विषय हा अर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. त्याबाबत आम्ही संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षांच्या निदर्शास आणून दिलेले आहे. राहिला प्रश्न प्रसार माध्यमांमध्ये आमच्याबद्दल आलेल्या टिकात्मक प्रतिक्रियेचा. वास्तविक राष्ट्रवादीच्या तिकीटावर जरी आम्ही निवडून आलो असतो तरी सभासद शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात अधिकचे दोन पैसे मिळण्यासाठी आम्ही आग्रही राहणे, यात गैर काय? कारखाना निवडणूकीच्या आगोदरच आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगितले होते, की आमचे अस्तिव हे स्वतंत्र राहिल. त्यामुळे कांडे पेमेंटच्या मुद्यांवर कोणाला राग लोभ वाटल्यास आम्ही महत्व देत नाही.`` 
 
मते मागताना गळ्यात गळे; आता कटकारस्थान

सोशल मीडियात कांडे पेमेंटची मागणी करणाऱ्या संचालकांच्याविरुद्ध काहींनी गुरूवारी (ता. १० जून) आपली मते नोंदविली. ते असे म्हणतात, की कोरोनामुळे शेतकरी अडचणीत आहेत हे जरी खरे असले तरी मोठ्या प्रमाणात साखर पोती विक्रीअभावी पडून आहेत. अशा प्रतिकूल स्थितीतून कारखानाही अर्थिक संकटातून बाहेर येत आहे.

सध्याला कांडे पेमेंटची काही संचालकांनी केलेली मागणी योग्य असेलही आणि अध्यक्ष या मागणीचा सहानभूतीपुर्वक विचारही करतील. परंतु एका गोष्टीचे दुर्देव असे आहे, की मागणी करणारे संचालक हे राष्ट्रवादीपुरस्कृत विचाराचे सत्ताधारी संचालक मंडळात कार्य़रत आहेत. विशेषतः मते मागताना मात्र एकत्र गळ्यात गळे घालून मते मागितली आणि आता आपल्याच संचालक मंडळाच्या विरोधात कटकारस्थान करताना ते आढळून येतात. संबंधितांचे कटकारस्थान फक्त स्वतःचे राजकिय अस्तित्व टिकविण्यासाठी चालले आहे. पक्षविरोधी काटकारस्थान करणाऱ्या व्यक्तीपासून खरेतर आत्तापासून सावध होण्याची गरज आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख