MPSC च्या परीक्षा पुढे ढकलल्या हा तर भाजपचा डाव : नानांचे अजब विधान - Nana Patole criticizes BJP over MPAC exam | Politics Marathi News - Sarkarnama

MPSC च्या परीक्षा पुढे ढकलल्या हा तर भाजपचा डाव : नानांचे अजब विधान

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 11 मार्च 2021

एमपीएसीची परीक्षा अवघ्या तीन दिवसांवर आली असताना अचानक पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा अवघ्या तीन दिवसांवर आली असताना अचानक पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा आहे. राज्य सरकारने या निर्णयाचा फेरविचार करावा. कोरोनाचे संकट असले तरी कोरोना संदर्भातील नियमांची अंमलबजावणी करत एमपीएससीच्या परीक्षा घ्याव्यात अशी मागणी करून आपण यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली असून मुख्यमंत्र्यांनी मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. 

फातिमाची झाली गीता अन् निघाली नायगावची राधा वाघमारे...
 

यासंदर्भात नाना पटोले म्हणाले की, ''एमपीएससीची पूर्व परीक्षा अचानक पुढे ढकलण्यात आल्यामुळे उमेदवारांमध्ये मोठा असंतोष दिसत असून त्यांचा संताप योग्यच आहे. मागील वर्षी मार्च महिन्यामध्ये होणाऱ्या एमपीएससीच्या पूर्व परीक्षा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. नंतर ऑक्टोबर महिन्यात या परीक्षा घेण्याचे ठरले होते. पण, त्यावेळीही या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आता पुन्हा या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत''. 

''एमपीएसच्या परिक्षेसाठी गाव-खेड्यातून लाखो विद्यार्थी परिक्षेची तयारी करत असतात. अनेकांचे आई, वडील शेतात काम करून, मोलमजुरी करून त्यांना एमपीएसीच्या अभ्यासासाठी शहरात पाठवतात. त्यांची या निर्णयामुळे मोठी आर्थिक व मानसिक अडचण होणार आहे. तरुणांच्या करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या परीक्षा वारंवार पुढे ढकलल्याने त्यांचे भवितव्य अंधारकारमय होईल. यामुळे उमेदवारांच्या वयोमर्यादेचा प्रश्नही निर्माण होत आहे. इतर विभागाच्या परीक्षा घेतल्या जात असताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला परीक्षा घेण्यात काय अडचण आहे'', असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला.  

ममतांवर सायंकाळी ५ नंतर हल्ला होईल, भाजप खासदाराने आधीच केली होती भविष्यवाणी
 

''एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर होताच काही राजकीय पक्षाचे लोक त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपचे एक आमदार या परीक्षा ठरल्याप्रमाणेच झाल्या पाहिजेत असे म्हणत असताना दुसरे आमदार मात्र परिक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे समर्थन करत आहेत. विद्यार्थ्यांच्या करिअरचा प्रश्न असतानाही भाजप वेगवेगळी मते मांडून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे हे दुर्दैवी आहे. काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या पाठीशी असून सरकारने परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा तात्काळ फेरविचार करावा'', असेही पटोले म्हणाले.

Edited By - Amol Jaybhaye  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख