आढळराव-कोल्हे तुम्हाला भाजपात यायचंय; पण भाजपाला तुम्हाला घ्यायचयं का? - MP Kolhe and Adhalrao wish to join to BJP but BJP want them asks Bhegade | Politics Marathi News - Sarkarnama

आढळराव-कोल्हे तुम्हाला भाजपात यायचंय; पण भाजपाला तुम्हाला घ्यायचयं का?

भरत पचंगे
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

भाजपने असा सवाल विचारून या वादात उडी घेतली आहे.. 

शिक्रापूर : ’आढळराव-कोल्हे तुमची इच्छा आहे भाजपात यायची, पण भाजपाची इच्छा आहे का तुम्हाला घ्यायची?, अशा शब्दांत भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी त्यांना सवाल केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कोरोनाशी संबंधित राज्यभर गाजलेल्या एका डायलॉगची आठवण करुन देणा-या भाषेत गणेश भेगडे यांनी आढळराव-कोल्हे यांच्या भाजपात जाण्याबद्दलच्या वादात उडी घेतली व दोघांनाही छेडले आहे. आम्हाला तुम्हा दोघांही गरज नाही. आम्ही सक्षम असून सेना-राष्ट्रवादी सोडून दोघेही भाजपाचा विचार करताय हेच आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे यश असल्याचेही त्यांनी यावेळी दोघांनाही सुनावले.

शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे लवकरच भाजपात जाणार असून त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली असल्याचे एक वृत्त चार दिवसांपूर्वी सोशल मिडियात चांगलेच व्हायरल झाले होते. हे वृत्त कुठेही छापून आलेले नसून वृत्तपत्रातील छपाईसारखे डिजाईन करुन हे चपखलपणे व्हायरल झाल्याचीही जोरदार चर्चा सोशल मिडियात होवून तसा दावाही आढळराव यांनी केला होता व हे सर्व ’कोल्हे-टिम’ करतेय, असाही दावाही शिवसेनेकडून करण्यात आला होता.

यावर पुन्हा तशाच पद्धतीचे एक वृत्त कोल्हेंच्या बाबतीत व्हायरल झाले व त्यात शिरुर-ग्रामिण मधील चार आमदारांनी हैराण केल्याने कोल्हे भाजपात जात असल्याचे सांगितले गेले होते. यावर खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी थेट आढळराव यांना टॅग करुन एवढा मोठा विनोद गेल्या पंधरा वर्षात चित्रपटसृष्टीतही अनुभवला नसल्याचे सांगत  हा वाद तसाच पुढे चालू ठेवला होता.

कोरोनाकाळात कोल्हेंनी मतदार संघात फिरकणेही टाळल्याचा आरोपही सेनेकडून एक सारखा होत असल्याने दोघांचे ’सोशल मिडिया वार’ मतदार संघात चर्चेचा विषय आहे. पर्यायाने हा वाद एकसारखा वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने एकसारखा चालूच असतो. त्यामुळेच या वादात भाजपाने उडी घेणे हा वाद आणखी रंजक होण्याच्या दिशेने निघणार हे नक्की.

एकमेकांविरोधात त्वेषाने लढणे, निवडणूकीनंतर आपल्या ’परमप्रिय नेत्यांनी’ त्यांची गरज म्हणून एकत्र येवून महाआघाडी करुन सरकार स्थापन करणे हे पारंपारीक राजकीय शत्रुत्व जपलेल्या राष्ट्रवादी-शिवसेना नेते-पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सहजपणे स्वीकारणे वाटते तेवढे सोपे नाही. याचा प्रत्यय शिरुर लोकसभा मतदारसंघातील सेना-राष्ट्रवादीच्या दैनंदिन वार्तालापावरुन लक्षात येत राहतो. त्यातच या महाआघाडीमुळे पुढील काळात स्थानिक ग्रामपंचायती, पंचायत समिती-जिल्हा परिषद व इतर सर्व सहकारातील निवडणूकांमध्ये एकमेकांना जुळवून घेणे वाटते तेवढे सोपे नाही. त्याचेच प्रतिबिंध शिरूरमधील या वादात उमटत आहे.

दोघांना गोंजारुन भाजपाही सावधच...!
शिवसनेने नोव्हेंबर २०१९ मध्ये ऐन वेळेस सत्तेचा घास भाजपच्या तोंडातून काढून घेवून कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत जावून राज्यात महाआघाडी स्थापन केली. त्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते ते थेट केंद्रीय नेतेही सेनेवर खवळून आहेत. पर्यायाने भाजपाकडून कोल्हे-आढळराव यांना गोंजारुन दोघांबाबत संशय-संभ्रम निर्माण होणे दोन्ही पक्षांच्या पक्षश्रेष्ठींना यातना दिल्यासारखेच आहे. यातून कोल्हे-आढळराव यांच्या भाजपाच्या नेत्यांसोबत बैठका होत असतील तर तेही वावगे समजणे गैरलागू आहे. पर्यायाने वचपा काढण्याच्या भाजपाच्या रणनितीमुळे कोल्हे-आढळराव वाद एकसारखा पुढे येत असेल तर तो भाजपा आपल्या पथ्यावर पाडून घेण्यासाठी काही गोष्टी करीत असणार हेही तितकेच खरे. म्हणूनच कोल्हे-आढळराव या दोघांनाही खेळवून ’आढळराव-कोल्हे तुमची इच्छा आहे भाजपात यायची, पण भाजपाची इच्छा आहे का तुम्हाला घ्यायची..!’ असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या स्टाईलने म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे आणि एकुणच भाजपा पदाधिकारी या वादाला आणखी चिथावणी देत राहणार असल्याचे दिसून येत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख