बापटांचा अजितदादांवर आरोप : माझ्या अगोदरच्या पालकमंत्र्यांचा सर्व निधी बारामतीलाच जायचा!  - MP Girish Bapat criticizes Deputy Chief Minister Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

बापटांचा अजितदादांवर आरोप : माझ्या अगोदरच्या पालकमंत्र्यांचा सर्व निधी बारामतीलाच जायचा! 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 11 फेब्रुवारी 2021

भोर तालुक्‍यातील 40 ते 45 हजार स्थालांतरित मुंबई, पुण्यात आहेत. ते रिक्षा चालवणे, हमाली करणे अशी कामे करत आहेत. हे येथील नेतृत्वाचे कर्तृत्व आहे.

नसरापूर (जि. पुणे) : "भारतीय जनता पक्षाने कायम जनतेसाठी काम केले आहे. माझ्या अगोदरच्या पालकमंत्र्यांचा (उपमुख्यमंत्री अजित पवार) सर्व निधी फक्त बारामतीला जायचा. मी पालकमंत्री झाल्यावर संपूर्ण पुणे जिल्ह्यासाठी निधी वाटला. आजही ती कामे चालू आहेत. दिल्ली, मुंबईत काही होऊद्या. आपल्याला आपल्या गावचा विकास करायचा आहे, हे लक्षात ठेवून कार्यकर्त्यांनी काम करावे,'' असे आवाहन पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केले. 

भाजप बूथ संपर्क अभियानात भोर तालुक्‍यातील निगडे येथे कार्यकर्ता मेळाव्याचे अयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात खासदार बापट बोलत होते. या वेळी निगडे येथील विनोद चौधरी, सुनील मालुसरे, रोहिदास मालुसरे, लक्ष्मण मालुसरे, महेश मालुसरे, बाजीराव जाधव आदींसह सुमारे 70 कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. 

"भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे कार्यकर्ते पद मिळो न मिळो समाजासाठी व राष्ट्रासाठी काम करत असतात, त्यामुळेच भाजप आज जनसामान्यांत लोकप्रिय झाला आहे. निगडे गावातील भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी गावच्या विकासासाठी प्रयत्न करावा, आम्ही त्यांच्या मागे आहोत,'' अशी ग्वाहीही बापट यांनी दिली. 

जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी भाजपत नव्याने प्रवेश करणाऱ्या तरुणांचे स्वागत करून बूथ संपर्क अभियान यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या बूथवर लक्ष केंद्रीत करावे. भोर तालुक्‍यात एमआयडीसी नाही, शेतीला पाणी नाही, रस्त्याची दुरवस्था आहे, पर्यटनाला चालना नाही. मग, येथील नेतृत्व काय करते आहे. जनतेला भूलथापा देऊन फसवले जात आहे. आता मात्र जनता जागृत झाली आहे, ती जाब विचारेल, अशा शब्दांत भेगडे यांनी आमदार संग्राम थोपटे यांचे नाव न घेता टीका केली. 

तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांनी प्रास्तविकात सांगितले की, भोर तालुक्‍यातील 40 ते 45 हजार स्थालांतरित मुंबई, पुण्यात आहेत. ते रिक्षा चालवणे, हमाली करणे अशी कामे करत आहेत. हे येथील नेतृत्वाचे कर्तृत्व आहे, अशी टीका करुन येथील महामार्गावर हरिश्‍चंद्री व धांगवडी येथील उड्डाणपुलाबाबत ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना लक्ष घालण्यास सांगावे, अशी मागणी त्यांनी खासदार बापट यांच्याकडे केली. 

या वेळी माजी मंत्री बाळा भेगडे, पश्‍चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जालिंदर कामठे, राहुल शेवाळे, सुनील माने, विश्वास ननावरे, भोर तालुकाध्यक्ष जीवन कोंडे, महिला तालुकाध्यक्षा दीपाली शेटे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख