मोहन जोशी म्हणतात, 'नोटाबंदीची आज चौथी पुण्यतिथी'  - Mohan Joshi criticizes denomination decision | Politics Marathi News - Sarkarnama

मोहन जोशी म्हणतात, 'नोटाबंदीची आज चौथी पुण्यतिथी' 

सरकारनामा ब्यूरो 
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

उलट गेली चार वर्षे या निर्णयाचे दुष्परिणामच देशाला भोगावे लागले आहेत.

पुणे : "सामान्य माणसाचे कंबरडे मोडणारा नोटबंदीचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला, त्याची आज (ता. 8 नोव्हेंबर) चौथी पुण्यतिथी आहे,' अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी यांनी केली. 

कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आजचा दिवस (ता. 8 नोव्हेंबर) हा विश्वासघात दिन म्हणून पाळला जात आहे, असे सांगून मोहन जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नोटबंदी लागू केल्यामुळे काळा पैसा बाहेर काढला जाईल, भ्रष्टाचार संपेल, अर्थपुरवठा रोखला गेल्याने दहशतवाद मोडून पडेल, असे दावे पंतप्रधान मोदी यांनी केले. परंतु, यातील काहीच घडले नाही.

उलट गेली चार वर्षे या निर्णयाचे दुष्परिणामच देशाला भोगावे लागले आहेत. अनेक उद्योग बुडाले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, देशाची आर्थिक घसरण होत गेली. अनेक अर्थतज्ज्ञ पंतप्रधानांच्या निर्णयापासून दूर झाले, त्यातून देशाचीच हानी झाली. 

सध्या तर अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोट्यवधींच्या आर्थिक पॅकेजच्या घोषणा केल्या. मात्र, सामान्य माणसांसाठी त्या कुचकामी ठरल्या आहेत. सध्या सणावाराचे दिवस असूनही बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे.

कोरोना महामारीच्या साथीमुळे आर्थिक उलाढालीवर परिणाम झाला, हा दावा पूर्णपणे मान्य होणारा नाही. नोटबंदीपासूनच अर्थव्यवस्था ढासळत आली आहे, ती आत्ताच्या काळात पूर्णपणे कोलमडली, असे मोहन जोशी यांनी पत्रकात नमूद केले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख