अजितदादांचा केंद्र सरकारला टोला..लस दुसऱ्या देशाला देण्याची गरज नव्हती.. - modi govt send covid-vaccines to other countries there will be no shortage today ajit pawar | Politics Marathi News - Sarkarnama

अजितदादांचा केंद्र सरकारला टोला..लस दुसऱ्या देशाला देण्याची गरज नव्हती..

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 मे 2021

सिरम, भारत बायोटेकला एकरकमी पैसे देण्यासही तयार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पुणे  : "सुरवातीला तयार होणारी लस दुसऱ्या देशाला देण्याची गरज नव्हती, त्यामुळे आपल्याला लशींची कमतरता भासली नसती," असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात व्यक्त केले. ते पत्रकारांशी बोलत होते. 

अजित पवार म्हणाले की, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरणाचा सुरवात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी 5 कोटी 71 लाख, म्हणजे 6 कोटी लशींची आवश्यकता आहे. यासाठी एक रकमी पैसे भरण्याचे आमचे नियोजन होते. लस देण्याचा पूर्ण अधिकार केंद्राकडे आहे. 

केंद्र सरकारने परवानगी दिल्यास आम्ही फायझर, स्पुटनिक, मॉडर्ना या परदेशी कंपन्यांच्या लसीही विकत घेऊ शकतो. तसेच 12 कोटी लसींच्या खरेदीसाठी महाराष्ट्र सरकार सिरम किंवा भारत बायोटेकला एकरकमी पैसे देण्यासही तयार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

भारत बायोटेककडे ही आपण प्रयत्न करतोय,  आजच्या दिवशी फक्त 3 लाख लस मिळाली त्यात पुण्याला 20 हजार मिळाली आहे. लसीकरणासाठी  दुर्गम भागात ऑनलाईन नोंदणीची अडचण येत आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबधितांना  सूचना दिल्या आहेत. ऑक्सिजन किंवा रेमडिसिव्हीआर चा पुरवठा कमी होणार नाही याची काळजी घेत आहोत. लशींचे उत्पादन लक्षात घेता परदेशाततील लस ही आपल्याकडे आयात करता येतील का याबाबत विचार सुरु असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 
 
अजित पवारांनी महाराष्ट्र दिना निमित्ताने राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. हे हीरक महोत्सवी वर्ष असूनही कोरोनामुळे आपण साजरे करु शकलो नाही, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख