मुक्ता टिळक यांच्याविरुद्ध शिंदे, रुपाली पाटील रंगला सामना - MLA Mukta Tilak criticized MNS leader Rupali Patil and Congress leader Arvind Shinde | Politics Marathi News - Sarkarnama

मुक्ता टिळक यांच्याविरुद्ध शिंदे, रुपाली पाटील रंगला सामना

महेश जगताप 
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

टिळक या आपल्या मतदारसंघात  फिरकल्या नाहीत. त्यामुळे आमदार टिळक घराच्या बाहेर निघणार की नाही ? लोकांना वाऱ्यावर सोडणार का असा प्रश्न मनसेच्या रणरागिणी रुपाली ठोंबरे-पाटील यांनी उपस्थित केला आहे.

पुणे : आमदार मुक्ता टिळक या कोरोना काळात घराबाहेर निघाल्या नाहीत, यावरून त्यांच्यावर मनसेच्या नेत्या रूपाली पाटील, काँग्रेसचे नेते अरविंद शिंदे यांनी टीका केली आहे. 'कसबा हा भाजपचा बालेकिल्ला आहे,' असे म्हणत अनेक आश्वासन देत मुक्ता टिळक यांनी मतदारांना मते मागितली व या मतदारसंघातील मतदारांनी भरघोस मतांनी निवडून दिले. मात्र, मार्च महिन्यात कोरोनामुळे नागरिकांचा जीवन , मरणाचा प्रश्न निर्माण झाला त्याचबरोबर पावसाने लोकांच्या घरात पाणी शिरले, त्यामुळे मोठं नुकसान झालं तरी टिळक या आपल्या मतदारसंघात  फिरकल्या नाहीत. त्यामुळे आमदार टिळक घराच्या बाहेर निघणार की नाही ? लोकांना वाऱ्यावर सोडणार का असा प्रश्न मनसेच्या रणरागिणी रुपाली ठोंबरे-पाटील यांनी उपस्थित केला आहे. 

कसबा मतदारसंघात हातावर पोट असणारा मोठा वर्ग आहे. विशेषतः प्रभाग १८ मध्ये शुक्रवार पेठ ,गुरुवार पेठ त्याचबरोबर रविवार, मंगळवार पेठेत मोठ्या प्रमाणात मजूर संख्या आहे. खऱ्या अर्थाने या वर्गाला कोरोनामुळे देश लॉकडाउन असल्याने प्रचंड आर्थिक फटका बसला पण याही काळात टिळक बाहेर पडून लोकांना आधार देताना दिसल्या नाहीत. 

"त्या आजारी आहेत, त्यांनी काळजी घ्यावी.. पण मतदार संघातील लोकांची जबाबदारी कोण घेणार ? तुम्ही लोकांना मत मागताना दिलेली आश्वासने ती कोण पूर्ण करणार, तुम्ही आजारी होतात तर का मतदारसंघाची जबाबदारी स्वीकारली.. तुम्ही जबाबदारी सोडून आराम करायला हवा.. अशी खोचक टीका काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवलेले या मतदारसंघातील उमेदवार अरविंद शिंदे यांनी केली आहे.

विरोधकांनी केलेल्या टीकेला टिळक यांनी उत्तर दिले आहे. टिळक म्हणाल्या, "कोरोनाच्या काळात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना मी माझ्या निधीतून पन्नास लाखाचे पीपीइ किट वाटप केले. हजारो नागरिकांना अन्नधान्याचे किट मतदार संघात वाटप केले. या काळात प्रशासनाशी वेळोवेळी संपर्कात राहिले आणि नागरिकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. ज्या वेळी पावसाने नागरिकांच्या घरात पाणी घुसले त्यावेळी कसबा, विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नागरिकांना तात्काळ मदत करण्याचा सूचना केल्या. विरोधकांना न केल्याला कामाची प्रसिद्धी करण्याची सवय आहे. त्यामुळे यांना केलेलं काम दिसणार नाही," असा टोला टिळक यांनी विरोधकांना हाणला आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख