आमदार चेतन तुपे यांचा पुणे शहर राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा

शहरात पक्षाची संघटनात्मक बांधणी करणेही महत्त्वाचे आहे.
MLA Chetan Tupe resigns as Pune NCP city president
MLA Chetan Tupe resigns as Pune NCP city president

मांजरी (पुणे) :  पुणे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीला देण्याची मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आमदार चेतन तुपे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना लेखी स्वरूपात त्याबाबतचे निवेदन आमदार तुपे यांनी दिले आहे. गेली अडीच वर्षांपासून आमदार तुपे पक्षाचे पुणे शहराध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. 

पुण्याच्या हडपसर विधानसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत चेतन तुपे निवडून आलेले आहेत. निवडून आल्यानंतर एक पद एक व्यक्ती या पक्षाच्या धोरणानुसार चेतन तुपे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, पक्षाकडूनच त्यांना थांबविण्यात आले होते. त्यांच्याकडे विधानसभा निवडणुकीपूर्वी महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी होती.

हडपसर विधानसभा मतदारसंघात सुमारे पाच लाखांच्या वर मतदार आहेत. त्यामध्ये शेतकरी, मजूर, कंपनी कामगार, व्यवसायिक, वसाहती, झोपडपट्टी, टाऊनशीप, औद्योगिक वसाहती अशा स्वरूपात हा मतदारसंघ विस्तारलेला आहे. या सर्व घटकांशी संपर्क ठेवताना भरपूर वेळही द्यावा लागत आहे. माझ्या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये अधिक वेळ द्यावा लागतो. तसेच, मी स्वतः हितापेक्षा पक्षाच्या हिताला प्राधान्य देणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे वरील सर्व गोष्टींचा विचार करून पुणे शहराच्या अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मला मुक्त करण्यात यावे, अशी विनंती तुपे यांनी जयंत पाटील यांना पाठविलेल्या राजीनामा पत्रात केली आहे. 

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला सक्षम आणि सक्रीय शहराध्यक्ष निवडावा लागणार आहे. सध्याची कोविड परिस्थितीत काम करणारा आणि आगामी निवडणुका जिंकून देणारा सक्रीय नेता पक्षाला शहराच्या अध्यक्षपदी नेमावा लागणार आहे. निवडणुका जिंकण्याबरोबरच शहरात पक्षाची संघटनात्मक बांधणी करणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्याबाबत पक्षाला विचार करावा लागणार आहे. त्यामुळे आता ही जबाबदारी कोणाच्या खांद्यावर येऊन पडते, हे पाहावे लागणार अहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com