आमदार अनिल भोसले यांना 'ईडी'कडून अटक 

बॅंकेत 71 कोटी 78 लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
MLA Anil Bhosale arrested by ED
MLA Anil Bhosale arrested by ED

मुंबई : पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्यासह चौघांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. बॅंकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुण्यातील येरवडा कारागृहात त्यांचा ताबा घेण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयाने आरोपींना 11 मार्चपर्यंत "ईडी' कोठडी सुनावली आहे. 

अनिल भोसले हे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर विधान परिषदेवर निवडून आलेले आहेत. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळात त्यांची भाजपशी जवळीक वाढली होती. शिवाजीराव भोसले बॅंकेमार्फत बेनामी कर्जवाटप केल्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने भोसले यांच्यासह चौघांना ता. 25 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. भोसले हे पुण्यातील येरवडा कारागृहात होते. यानंतर शिवाजीराव भोसले बॅंकेतील या गैरव्यवहारप्रकरणी "ईडी'ने गुन्हा दाखल केला होता. 

आमदार अनिल भोसले हे शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेचे संचालक आहेत. त्यांच्यासह बॅंकेचे दुसरे संचालक सूर्याजी जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी पडवळ, "चीफ अकाउन्टंट' शैलेश भोसले यांना अटक करण्यात आली आहे. त्याप्रकरणी बॅंकेत 71 कोटी 78 लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. लेखापाल योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जानेवारी महिन्यात फिर्याद दिली होती. 

या प्रकरणी "मनी लॉन्डरिंग' झाल्याचा संशय "ईडी'ला आहे. त्यामुळे "ईडी'ने पुण्यात शोध मोहीमही राबवली होती. यातील जाधव हे सत्तरीत असल्याने त्यांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना "ईडी'ला करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी सर्व संशयित आरोपींना 11 मार्चपर्यंत "ईडी'ची कोठडी सुनावण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com