राज्यमंत्री भरणेंच्या गावातील कोरोना येईना आटोक्‍यात : प्रशासनावर व्यक्त केली नाराजी  - Minister of State Dattatreya Bharne upset on the administration for not controlling Corona | Politics Marathi News - Sarkarnama

राज्यमंत्री भरणेंच्या गावातील कोरोना येईना आटोक्‍यात : प्रशासनावर व्यक्त केली नाराजी 

राजकुमार थोरात 
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

इंदापूर तालुक्‍यात अनेक नागरिक मास्क वापरत नाहीत. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर तातडीने कारवाईचा बडगा उगारा, अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली. 

वालचंदनगर (जि. पुणे) : राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या अंथुर्णे गावासह इंदापूर तालुक्‍यात कोरोनाची साखळी तुटत नसल्याने भरणे यांनीही प्रशासनावर उघड नाराजी व्यक्त केली. तसेच, तालुक्‍यातील कोरोनाची साळखी तोडण्यासाठी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्याची सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिली. 

इंदापूर तालुक्‍यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 2400 वर पोचला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर राज्यमंत्री भरणे यांच्या उपस्थितीत वालचंदनगरमध्ये आढावा बैठक रविवारी (ता. 27 सप्टेंबर) झाली. बैठकीला प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकासधिकारी विजयकुमार परीट उपस्थित होते. 

राज्यमंत्री भरणे यांच्या अंथुर्णे गावातील कोरोना विषाणूची साखळी तुटत नसल्याने भरणे यांनी कोरोनाची साखळी का तुटत नाही? याची विचारणा केल्यानंतर अधिकारी निरुत्तर झाले. सध्या तालुक्‍यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी होत नाही. तसेच, त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यही तपासणीसाठी जाताना सरकारी वाहनाचा वापर न करता खासगी वाहनाने जातात, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबाला तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी या वेळी केली. 

तालुक्‍यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाय योजना कराव्यात, अशी सूचना भरणे यांनी अधिकाऱ्यांना दिली. तालुक्‍यात अनेक नागरिक मास्क वापरत नाहीत. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर तातडीने कारवाईचा बडगा उगारा, अशी सक्त ताकीदही त्यांनी दिली. 

अंथुर्णे गावातील रुग्णांची साखळी तोडण्यासाठी एक दिवसाचा कन्टेमेंट झोन जाहीर करून सर्व रुग्णांची तपासणी करण्यात करावी. एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील "हाय रिस्क' व "लो रिस्क'च्या 50 नागरिकांची यादी करुन त्यांचीही तपासणी करण्यात यावी, असे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले. 

हेही वाचा : प्रदीप गारटकरांची नाराजी प्रशासनावर; मात्र रोख कुणाकडे? 

"कोरोनाबाधित रुग्णांना इंदापूर तालुक्‍यात पुरेशा सुविधा मिळत नाहीत, बेडशीटसुद्धा उपलब्ध होत नाहीत, याबाबत तहसीलदारांकडे विचारणा केली असता पैसे नाहीत, असे सांगितले जाते,' असे सांगून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्यासमोरच प्रशासनाला धारेवर धरले.

गारटकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले असले तरी त्यांच्या रोख कोणाकडे होता, अशी कुजबूज तालुक्‍यात सुरू आहे. कारण, तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच आहेत. 

इंदापूर तालुक्‍यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यमंत्री भरणे यांच्या उपस्थितीत वालचंदनगर येथे आढावा बैठक झाली. बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

इंदापूरमधील उपजिल्हा रुग्णालयातील कोरोनाग्रस्त रुग्णांना सुविधा मिळत नसल्याचे जाहीरपणे बैठकीत सांगितले. वीज गेल्यानंतर जनरेटरची सोय नसल्याने भाडोत्री जनरेटर आणावा लागला. आम्ही जनतेची सेवा करणार असून वेळप्रसंगी जनरेटरचे भाडेही देण्यास तयार आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना बेडशीट व इतर सुविधा मिळत नाहीत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख